क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव


कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने धारवाड विभागीय ए डीव्हिजन क्रिकेट स्पर्धेत सीसीआय बेळगाव संघाने सीसीके धारवाड संघाचा 50 धावाने पराभव करून 4 गुण मिळविले. शतकवीर अमनखान व 6 गडी बाद करणाऱया वैभव कुरूबागी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर सीसीआय बेळगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 44.3 षटकात सर्व बाद 209 धावा जमविल्या. 4 बाद 32 अशी दैना उडाली असताना अमनखान व वैभव कुरूबागी यांनी डाव सांभाळत पाचव्या गडय़ासाठी 75 धावांची भागीदारी केली. अमन खानने 2 षटकार 15 चौकारासह 115 धावा करून स्पर्धेतील आपले दुसरे शतक झळकविले. त्याला वैभव कुरूबागीने 41 तर नवीन आर. एस. ने 10 धावा करून योग्य साथ दिली. सीसीआय धारवाडतर्फे लिखित बन्नूरने 39 धावात 5, अनिलगौडा पाटीलने 38 धावात 3 तर मोईनखान व श्रीहरी मुदलीहार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल सीसीके धारवाड संघाचा डाव 34.3 षटकात 159 धावात आटोपला. आदित्य शंभोगीने 9 चौकारासह 47, सुचतसिंग रजपूतने 6 चौकारासह 31, श्रीहरी मुदलीहारने 4 चौकारासह 26, लिखीत बन्नूरने 3 षटकार 1 चौकारासह 24 धावा केल्या. सीसीआय बेळगावतर्फे वैभव कुरूबागीने 39 धावात 6 तर झिनत एबीएमने 39 धावात 4 गडी बाद केले.