Tarun Bharat

सुपरओव्हरमध्ये दिल्लीच ‘सुपर’!

हंगामात प्रथमच सुपरओव्हरचा अवलंब, निर्धारित षटकांच्या लढतीत बरोबरी, सुपरओव्हरमध्ये पंजाब किंग्स इलेव्हनचे लोटांगण

वृत्तसंस्था/ दुबई

निर्धारित षटकांच्या लढतीत रोमांचक टायनंतर सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. प्रारंभी 20 षटकांची लढत टाय झाल्यानंतर सुपरओव्हरचा अवलंब करण्यात आला. त्यात पंजाबला 2 बाद 2 धावा करता आल्या तर दिल्लीने पाच चेंडूंचा खेळ बाकी राखत विजय संपादन केला.

विजयासाठी 3 धावांची गरज असताना शमीने पहिला चेंडू वाईड टाकला तर पुढील चेंडूवर ऋषभ पंतने दोन धावा घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

 प्रारंभी, रबाडाने टाकलेल्या सुपरओव्हरमध्ये केएल राहुलने पहिल्या चेंडूवर दुहेरी धावा घेतल्यानंतर दुसऱया चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल दिला तर तिसऱया चेंडूवर पूरनचा त्रिफळा उडला. पहिले दोन फलंदाज बाद झाल्यानंतर इथेच पंजाबच्या डावाची सांगता झाली आणि दिल्ली कॅपिटल्सला एका षटकात केवळ 3 धावांची गरज होती.

तत्पूर्वी, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली दिल्ली कॅपिटल्स व किंग्स इलेव्हन पंजाब संघातील आयपीएलमधील निर्धारित 20 षटकांची साखळी लढत रोमांचकरित्या टाय झाली. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 8 बाद 157 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात पंजाबला देखील 20 षटकात 8 बाद 157 धावाच जमवता आल्या.

शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची आवश्यकता असताना मयांकने जोरदार फटकेबाजी करत पहिल्या 3 चेंडूत 12 धावा वसूल केल्या. मात्र, चौथा चेंडू निर्धाव गेला आणि पाचव्या चेंडूवर तो बाद झाल्याने या सामन्याला नाटय़मय वळण मिळाले. शेवटच्या चेंडूवर पंजाबला विजयासाठी एका धावेची आवश्यकता असताना जॉर्डनचा रबाडाने अचूक झेल टिपला आणि यामुळे हा सामना टाय झाला. अशा रितीने पहिल्या 3 चेंडूत 12 धावा जमवल्यानंतरही उर्वरित 3 चेंडूत 2 धावा करता न आल्याने पंजाबला टायवर समाधान मानावे लागले. निर्धारित षटकातील लढत टाय झाल्यानंतर या सामन्यात सुपरओव्हरचा अवलंब करण्यात आला होता.

मार्कस स्टोईनिसने अवघ्या 20 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावल्यानंतर रविवारी आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 157 धावांपर्यंत मजल मारली. स्टोईनिसने 21 चेंडूत 53 धावांची आतषबाजी केली. त्यात शेवटच्या षटकातील आतषबाजीचा प्रामुख्याने समावेश राहिला.

स्टोईनिसशिवाय, कर्णधार श्रेयस अय्यर (32 चेंडूत 3 षटकारांसह 39), ऋषभ पंत (29 चेंडूत 4 चौकारांसह 31) यांनीही समयोचित फटकेबाजी केली. दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. प्रारंभी, रनिंग बिटविन द विकेटमध्ये समन्वयाचा गोंधळ उडाल्यानंतर शिखर धवन पायचीत झाला तर पृथ्वी शॉला 5 धावांवरच तंबूत परतावे लागले. तिसऱया स्थानावरील शिमरॉन हेतमेयर देखील (7) स्वस्तातच गारद झाला. त्यानंतर कर्णधार अय्यर व पंत यांनी आश्वासक भागीदारी साकारली.

या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांचा हा निर्णय बऱयाच अंशी सार्थही ठरला. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात शिखर धवनने विकेट बहाल केली. धवनचा अंदाज चुकल्यानंतर चेंडू मिडविकेटकडे गेला आणि धवनने धाव घेण्यास सुरुवात केली. पण, पृथ्वी शॉने धाव घेण्यास नकार दिल्याकडे त्याचे लक्ष गेलेच नाही आणि मिडविकेटवरुन गौतमने थ्रो केल्यानंतर यष्टीरक्षक-कर्णधार केएल राहुलने यष्टी उदध्वस्त केली, त्यावेळी धवन बराच बाहेर होता.

धवन धावबाद झाल्यानंतर सहकारी सलामीवीर पृथ्वी शॉला आपली नाराजी लपवता आली नाही. पण, स्वतः शॉ देखील फार काळ तग धरु शकला नाही. शमीच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर शॉचा उत्तूंग फटका मारण्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि मिडऑनवरील जॉर्डनने सोपा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली.

 शमीच्या बाहेर जाणाऱया चेंडूवर फ्लिक मारण्याच्या प्रयत्नात त्याने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरील अगरवालकडे झेल दिला. 29 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावा जमवणारा ऋषभ पंत स्लॉग स्वीप करताना त्रिफळाचीत झाला. रवी बिश्नोईसाठी ही जवळपास प्राईज विकेट ठरली. कर्णधार श्रेयस अय्यरने शमीच्या गोलंदाजीवर जॉर्डनकडे झेल देण्यापूर्वी 32 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. जॉर्डनने मिडऑफवर त्याचा झेल टिपला. अक्षर पटेल दिल्लीच्या डावात बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. त्याला 9 चेंडूत 6 धावा जमवता आल्या.

स्टोईनिस क्रीझवर आल्यानंतर मात्र त्याने सारी समीकरणेच बदलून टाकली. चौफेर फटकेबाजी करताना त्याने पंजाबच्या एकाही गोलंदाजाला सैल सोडले नाही. विशेषतः जॉर्डनचे गोलंदाजी पृथकरण तर त्याने पार बिघडून टाकले.

दिल्लीने शेवटच्या षटकात कुटल्या 30 धावा!

प्रारंभी, खराब फलंदाजी साकारणाऱया दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या डावातील शेवटच्या डावात मात्र जोरदार धमाका केला. त्यांनी जॉर्डनने टाकलेल्या या शेवटच्या षटकात 30 धावा वसूल केल्या. त्यात दोन अवांतर धावांचा अपवाद वगळता स्टोईनिसची फटकेबाजी निर्णायक ठरली. स्टोईनिसने 2 षटकार, 3 चौकार वसूल केले आणि जॉर्डनच्या वाईड-नोबॉलमुळे त्यात आणखी भर पडली. स्टोईनिसने या फटकेबाजीसह 20 चेंडूतच अर्धशतकही साजरे केले.

Related Stories

भारतीय महिला संघ प्रथमच ‘गुलाबी’ कसोटी खेळणार

Amit Kulkarni

मुंबईचा पंच; दिल्लीला धक्का देत IPL 2020 वर कब्जा

Archana Banage

प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राला सुवर्ण

Patil_p

सेरेना, हॅलेप, ओसाका, व्हेरेव्ह, जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

ला लिगा फुटबॉल हंगाम 12 सप्टेंबरपासून

Patil_p