Tarun Bharat

सुयश प्रभुदेसाईची आयपीएल लिलावासाठी निवड

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

गोव्याचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुयश प्रभुदेसाई याची आयपीएल लिलावासाठी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लिलावासाठी जाहीर केलेल्या 292 क्रिकेटपटूंच्या यादीत गोव्याच्या सुयश प्रभुदेसाईला स्थान मिळाले आहे.

या वर्षाच्या एप्रिल महिन्यात होणाऱया आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे. एकूण 1114 क्रिकेटपटूंनी आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली होती. गोवा क्रिकेट संघटनेकडून क्रिकेटपटूंच्या नोंदणीसाठी अमित वर्मा, सुयश प्रभुदेसाई, दर्शन मिसाळ, एकनाथ केरकर, अशोक दिंडा, फॅलिक्स आलेमाव, वीजेश प्रभुदेसाई, लक्षय गर्ग, आदित्य कौशिक, स्नेहल कवठणकर आणि दीपराज गावकर यांची नावे पाठविण्यात आली होती.

हल्लीच इंदूरात झालेल्या मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्यासाठी सुयश प्रभुदेसाईने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. मध्यप्रदेशविरूद्धच्या पहिल्या लढतीत नाबाद 48 धावांची स्फोटक खेळी करताना रिव्हर्स स्वीप, कव्हर्स आणि स्कूपद्वारे षटकार ठोकले होते. राजस्थानविरूद्ध 34 धावांची खेळीही सुयशने केली.  मात्र मध्यप्रदेशविरूद्धच्या खेळीनंतर त्याने आपले लक्ष वेधून घेतले होते. पाच सामन्यांतून केवळ 85 धावा जरी या स्पर्धेत सुयशने जमविल्या, तरी त्याने मारलेले आक्रमक फटके त्याची लिलावासाठी निवड होण्यास पुरेसे ठरले, असे म्हणावे लागेल.

मुंबईत जेव्हा त्याला चाचणीसाठी आमंत्रण आले तेव्हाच त्याची आयपीएल लिलावासाठी निवड होणार हे निश्चित झाले होते. गेल्या डिसेंबरमध्ये वयाची 23 वर्षे पूर्ण केलेल्या सुयशने 2016-17 क्रिकेट मोसमात प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. 2017 मध्ये विजय हजारे एकदिवशीय स्पर्धेत त्याने गोव्याचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर त्याची 2018-19 मध्ये टी-20 आणि रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी त्याची निवड झाली. कामगिरीत सातत्य राखल्यामुळे तो आता गोवा सीनियर क्रिकेट संघाचा नियमित सदस्यही बनला आहे.

शिरोडा येथील सुयश प्रभुदेसाई आपले शालेय क्रिकेट मडगावच्या महिला नूतन हायस्कूलतर्फे खेळला. त्यानंतर आर. एम. एस. उच्च माध्यमिक आणि दामोदर कॉलेजतर्फे तो महाविद्यालयीन क्रिकेट खेळला. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे फातोर्डास्थित सीनियर क्रिकेट प्रशिक्षक संदीप नाईक यांच्या तालमीत तयार झालेल्या सुयशने आयपीएलच्या लिलावात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सध्या तो गोव्याच्या संघासमवेत विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी सूरतमध्ये आहे. लिलावात बहुदा त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर किंवा मुंबई इंडियन्स संघ घेण्याची शक्यता आहे. सुयशला आयपीएलमध्ये कुठल्याही संघाने करारबद्ध केले तर स्वप्नील अस्नोडकर आणि शदाब जकाती यांच्यानंतर आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणारा तो तिसरा गोमंतकीय क्रिकेटपटू बनणार आहे.

Related Stories

मांद्रे पंचायतीत औट घटकेच्या खुर्चीचा खेळ

Amit Kulkarni

म्हापशात चपलाच्या गोदामाला आग लागून लाखोंची नुकसानी

Amit Kulkarni

दिशा रवीला अटक प्रकरणी महिला काँग्रेसकडून निषेध

Amit Kulkarni

डॉ. दिलीप वेर्णेकर अनंतात विलीन

Amit Kulkarni

रवींद्र केळेकर ज्ञानपीठ केंद्राचे उद्या लोकार्पण

Omkar B

काणकोणात नगराध्यक्ष- उपनगराध्यक्षपदांसाठी रस्सीखेच

Amit Kulkarni
error: Content is protected !!