ऑनलाईन टीम नवी दिल्ली :
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सुनावणी पूर्ण झाली. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश राखून ठेवला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना येत्या गुरुवारपर्यंत (13 ऑगस्ट) बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ दिला आहे त्यामुळे आता पुन्हा गुरुवारी सुनावणी होईल.


सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व पक्षांच्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद संक्षिप्त स्वरुपात लेखी देण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी म्हटलं की, सीआरपीसी CrPC 174 अंतर्गत सुरू झालेल्या घटनेच्या मृत्यूची चौकशी फारच थोड्या काळासाठी सुरु राहते. मृतदेहाकडे पाहून आणि घटनास्थळी जाऊन मृत्यूचे कारण संशयास्पद आहे की नाही हे पाहिलं जातं. मग FIR नोंदवला जातो. मुंबई पोलिस जे करत आहेत ते योग्य नाही.
श्याम दिवाण यांनी रिया चक्रवर्तीची बाजू मांडताना म्हटले की, आपल्या याचिका कर्त्या रिया हिचे मयत सुशांत सिंह राजपूत याच्यावर प्रेम होते. मात्र, आता तिला ट्रोल करुन तिचा बळी दिला जात आहे.
प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी महाराष्ट्र सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांबाबत सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी कोणतीही तक्रार केली नाही. हे प्रकरण म्हणजे निव्वळ राजकारण आहे, दुसरं काही नाही. बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते सुरु आहे. एकदा निवडणूक संपली की कोण लक्षही देणार नाही, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.