ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. त्याला अखेर बुधवारी केंद्र सरकारने परवानगी दिली.


याबाबत अधिक माहिती देताना केंद्राचे वकील महाधिवत्का तुषार मेहता यांनी सांगितले की, या प्रकरणाचा CBI ने तपास करावा ही बिहार सरकारची शिफारस मान्य करण्यात आली आहे.
दरम्यान सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सांगत होते. त्यादरम्यानच पाटण्यात सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार मुंबईत पोहोचले आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. यावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसात संघर्षही झाला होता. पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केल्याने हा संघर्ष शिगेला पोहोचला. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांचा जबाब नोंदवला आहे.