

बेळगाव : टिप्पणी, कात्रण, निरीक्षण, परीक्षण या चौकस मनाची व्यासपीठावरून सूत्रसंचालन करताना गरज आहे. सूत्रसंचालन उठावदारपणे होण्यासाठी आवाजातील चढ-उतार, नक्कल आणि आवाजावर संस्कार असणे आवश्यक आहे. सूत्रसंचालनाची छाप रसिकांच्या मनावर उमटण्यासाठी नीटनेटकेपणादेखील गरजेचा आहे, असे विचार प्रा. अनिल चौधरी यांनी मांडले. हा कार्यक्रम शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात झाला.
राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या अनुदान योजनेंतर्गत वसंत व्याख्यानमाला सोसायटी आयोजित व्याख्यानात ते सूत्रसंचालन कार्यशाळेत बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षा मीना खानोलकर, उपाध्यक्षा स्वरुपा इनामदार उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक मीना खानोलकर यांनी केले. परिचय स्वरुपा इनामदार यांनी केले.
प्रा. अनिल चौधरी म्हणाले, सूत्रसंचालनामध्ये संयम महत्त्वाचा पैलू असून, बोलताना आपल्या शब्दावर आत्मविश्वास असला पाहिजे. याबरोबरच आपल्या आजुबाजूची भाषादेखील अवगत असली पाहिजे. आपल्या आजुबाजूला वेगवेगळय़ा व्यक्ती भेटतात. त्यांचे निरीक्षण करा आणि टिप्पणी करा, त्याचा भविष्यात उपयोग होईल. चिंतन, मनन वाढवा आणि चांगले विचार प्रकट करा, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला.
निधी केळकर यांनी इशस्तवन सादर केले. अध्यक्षा मीना खानोलकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. प्रियांका केळकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी रसिक श्रोते उपस्थित होते.