Tarun Bharat

‘सूर्य’ तळपला, मुंबई इंडियन्स जिंकली!

आयपीएल साखळी सामना : 43 चेंडूत नाबाद 79 धावांच्या खेळीसह सुर्यकुमार यादव विजयाचा शिल्पकार, आरसीबीची निराशा, मुंबई अव्वलस्थानी कायम

वृत्तसंस्था / अबु धाबी

विराट-रोहित यांच्यातील कथित शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण वातावरणात खेळवल्या गेलेल्या आयपीएल साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या आरसीबी संघाला 5 गडी राखून धूळ चारली. आरसीबीने 6 बाद 164 धावा केल्यानंतर मुंबईने 19.1 षटकात 5 गडय़ांच्या बदल्यात 166 धावांसह शानदार विजय संपादन केला. सुर्याप्रमाणे तळपलेल्या सुर्यकुमार यादवची 43 चेंडूतील 79 धावांची खेळी निर्णायक ठरली. रोहित शर्मा या लढतीतही खेळू शकला नाही. या विजयासह मुंबईच्या खात्यावर 16 गुण झाले असून ते अव्वलस्थानी विराजमान आहेत.

षटकामागे 9 च्या सरासरीने शेवटच्या 3 षटकात 27 धावांची गरज असताना स्टीनने 18 व्या षटकात 3 वाईड टाकले व मुंबईने यात एकूण 11 धावा केल्या. शेवटच्या 12 चेंडूत 16 धावा, असे समीकरण असताना ख्रिस मॉरिसला 13 धावा मोजाव्या लागल्या आणि शेवटच्या षटकात 3 धावा, असा विजय मुंबईच्या आवाक्यात आला. त्यानंतर सुर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शानदार चौकार फटकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.

तत्पूर्वी, विजयासाठी 165 धावांचा पाठलाग करताना डी कॉक (18) व इशान किशन (25) यांनी 5.3 षटकात 37 धावांची किरकोळ सलामी देता आली. सिराजने डी कॉकला तर चहलने इशान किशनला बाद करत मुंबईला प्रारंभी धक्के दिले. पण, तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरलेल्या सुर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक झळकावत आरसीबीवर दडपण कायम राखले. मधल्या फळीतील सौरभ तिवारी (5) व कृणाल पंडय़ा (10) स्वस्तात बाद झाले. पण, त्यानंतर सुर्यकुमारच्या साथीने हार्दिक पंडय़ाने देखील फटकेबाजी सुरु केली आणि विराटियन संघाच्या हातातून हा सामना निसटत गेला.

देवदत्त पडिक्कल (45 चेंडूत 74) व जोश फिलीप (33) या सलामीवीरांच्या धडाकेबाज खेळीनंतर मधली फळी गडगडल्यानंतर आरसीबीला मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 6 बाद 164 धावांवर समाधान मानावे लागले. पडिक्कलच्या तुफानी फटकेबाजीमुळे आरसीबीचा संघ एकवेळ 180 धावांचा टप्पा सहज सर करु शकेल, असे संकेत होते. पण, प्रत्यक्षात मधल्या फळीपासून पडझड सुरु झाली आणि अंतिमतः आरसीबीला 164 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईतर्फे जलद गोलंदाज जसप्रित बुमराहने 4 षटकात 14 धावातच 3 बळी घेतले. कर्णधार रोहित शर्मा या लढतीतही खेळू शकला नाही.

प्रारंभी, मुंबईचा हंगामी कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि या संधीचा पुरेपूर लाभ घेत जोश फिलीप व देवदत्त पडिक्कल यांनी 7.5 षटकात 71 धावांची सलामी दिली होती.

या उभयतांनी षटकामागे जवळपास 10 धावांची सरासरी राखत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जोश फिलीपने 24 चेंडूत 4 चौकार व एका षटकारासह 33 धावा वसूल केल्या. अखेर दीपक चहरने डावातील आठव्या षटकात त्याची खेळी संपुष्टात आणली.

जोश फिलीपचा पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी फसला आणि डी कॉकने त्याला यष्टिचीत केले. वास्तविक, डी कॉकचे यष्टीरक्षण अगदी धोनीइतके चपळ नसल्याने फिलीपला वेळीच क्रीझमध्ये परतण्याची संधी होती. पण, त्याने आपला मागील पाय आत घेण्यास काही अवधी दवडला आणि डी कॉकने यष्टी उदध्वस्त केली, त्यावेळी फिलीप बाहेर असल्याचे स्पष्ट झाले.

कर्णधार विराट कोहलीला मात्र या लढतीत सूर सापडला नाही. 14 चेंडूत 9 धावा अशा किरकोळ योगदानावर तो तंबूत परतला. येथे क्रीझवर आल्यापासूनच त्याला सूर सापडत नव्हता आणि दडपण झुगारुन टाकण्याच्या प्रयत्नात त्याने तिवारीकडे सोपा झेल दिला. विराटला बाद करत बुमराहने आयपीएलमध्ये आपला 100 बळींचा माईलस्टोन देखील सर केला. आखूड टप्प्याच्या चेंडूवर विराटचा पूल करण्याचा प्रयत्न येथे फसला.

एबी डीव्हिलियर्सने 12 चेंडूत 15 धावांच्या खेळीत काही महत्त्वाकांक्षी फटके जरुर लगावले. पण, पोलार्डच्या एका फुलटॉसवर त्याने स्क्वेअर लेगवरील चहरकडे सोपा झेल देत तंबूचा रस्ता धरला होता.

 डीव्हिलियर्स या चेंडूवर बराच आश्चर्यचकित झाला आणि पंच तो नोबॉल देणार का, याचीही त्याला प्रतीक्षा होती. पण, पंचांनी रिप्लेनुसार तो बाद असल्याचा निर्वाळा दिला आणि आरसीबीला आणखी एक धक्का बसला.

एका बाजूने पडझड सुरु असताना दुसरीकडे, देवदत्त पडिक्कलचा धमाका मात्र सुरुच होता. त्याने संधी मिळेल तेथे फटकेबाजी केली आणि धावफलक सातत्याने हलता ठेवला. शिवम दुबे (2) व ख्रिस मॉरिस (4) मात्र स्वस्तात बाद झाले. दुबेला बुमराहने तर मॉरिसला बोल्टने बाद केले. देवदत्त पडिक्कलही पाचव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. त्याला बुमराहने लाँगलेगवरील बोल्टकरवी झेलबाद केले.

धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : जोश फिलीप यष्टीचीत डी कॉक, गो. चहर 33 (24 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), देवदत्त पडिक्कल झे. बोल्ट, गो. बुमराह 74 (45 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), विराट कोहली झे. तिवारी, गो. बुमराह 9 (14 चेंडू), एबी डीव्हिलियर्स झे. चहर, गो. पोलार्ड 15 (12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शिवम दुबे झे. यादव, गो. बुमराह 2 (6 चेंडू), ख्रिस मॉरिस झे. पॅटिन्सन, गो. बोल्ट 4 (2 चेंडूत 1 चौकार), गुरकिरत सिंग नाबाद 14 (11 चेंडूत 2 चौकार), वॉशिंग्टन सुंदर नाबाद 10 (6 चेंडूत 1 चौकार). अवांतर 3. एकूण 20 षटकात 6 बाद 164.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-71 (फिलीप, 7.5), 2-95 (विराट, 11.2), 3-131 (डीव्हिलियर्स, 15.2), 4-134 (दुबे, 16.3), 5-134 (पडिक्कल, 16.5), 6-138 (मॉरिस, 17.2)

गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट 4-0-40-1, जसप्रित बुमराह 4-1-14-3, कृणाल पंडय़ा 4-0-27-0, पॅटिन्सन 3-0-35-0, राहुल चहर 4-0-43-1, केरॉन पोलार्ड 1-0-5-1.

मुंबई इंडियन्स : क्विन्टॉन डी कॉक झे. गुरकिरत, गो. सिराज 18 (19 चेंडूत 1 षटकार), इशान किशन झे. मॉरिस, गो. चहल 25 (19 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), सुर्यकुमार यादव नाबाद 79 (43 चेंडूत 10 चौकार, 3 षटकार), सौरभ तिवारी झे. पडिक्कल, गो. सिराज 5 (8 चेंडू), कृणाल पंडय़ा झे. मॉरिस, गो. चहल 10 (10 चेंडूत 1 चौकार), हार्दिक पंडय़ा झे. सिराज, गो. मॉरिस 17, केरॉन पोलार्ड नाबाद 4 (1 चेंडू). अवांतर 8. एकूण 19.1 षटकात 5 बाद 166.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-37 (डी कॉक, 5.3), 2-52 (किशन, 7.5), 3-72 (तिवारी, 10.4), 4-107 (कृणाल, 13.5), 5-158 (हार्दिक, 18.5). गोलंदाजी : ख्रिस मॉरिस 4-0-36-1, डेल स्टीन 4-0-43-0, वॉशिंग्टन सुंदर 4-0-20-0, मोहम्मद सिराज 3.1-0-28-2, यजुवेंद्र चहल 4-0-37-2.

Related Stories

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक

Rohit Salunke

इस्त्राईल, यूएई, बहारिनमध्ये ऐतिहासिक शांती करार

datta jadhav

जिहादींचे समर्थन करणाऱ्या गिलानींना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार

datta jadhav

चमिंडा वासचा राजीनामा मागे

Patil_p

अश्विन-अक्षर ‘फिफ्टी-फिफ्टी’, अडीच दिवसातच भारत भारी!

Patil_p

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर उत्तर कोरियात आणीबाणीची घोषणा

datta jadhav