Tarun Bharat

सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताचे आठवे अजिंक्यपद

कर्णधार छेत्रीची मेसीच्या विक्रमाशी बरोबरी, जेतेपदाचे श्रेय युवा खेळाडूंना

वृत्तसंस्था/ माले

शनिवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने नेपाळचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत सॅफ फुटबॉल स्पर्धेचे आठव्यांदा अजिंक्यपद पटकाविले. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने अर्जेंटिनाच्या मेसीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या स्पर्धेतील जेतेपदाचे श्रेय कर्णधार छेत्रीने संघातील युवा खेळाडूंना दिले.

शनिवारचा या स्पर्धेतील अंतिम सामना एकतर्फी झाला. दरम्यान पूर्वार्धात नेपाळचा खेळ दर्जेदार झाल्याने भारताला मध्यंतरापर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या सामन्यातील भारताचे तिन्ही गोल उत्तरार्धात नोंदविले गेले. या विभागीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. आतापर्यंत झालेल्या तेरा सॅफ फुटबॉल स्पर्धांमध्ये भारताने 12 वेळा अंतिम फेरी गाठली आहे तर आठवेळा सॅफ फुटबॉल चषकावर आपले नाव कोरले.

या सामन्यामध्ये कर्णधार सुनील छेत्रीने 49 व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. सुरेश सिंगने 50 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. सेहल अब्दुल समादने 90 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल करून नेपाळचे आव्हान एकतर्फी फरकाने संपुष्टात आणले.

37 वर्षीय छेत्रीने या अंतिम सामन्यात एक गोल नोंदवित अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लायोनेल मेसीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये सुनील छेत्री दुसऱया स्थानावर आहे. नवे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅकच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघाचे हे पहिले प्रमुख जेतेपद आहे. विदेशी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत तीनवेळा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. 1993 साली जेरी पिसेक, 2015 साली स्टीफेन कॉन्स्टेनटाईन आणि 2021 साली स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.

या अंतिम सामन्यात खेळाच्या पूर्वार्धात नेपाळच्या भक्कम गोलरक्षणामुळे भारतीय संघाच्या गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या. मध्यंतराला एक मिनिट बाकी असताना उजव्या बगलेतून मिळालेल्या पासवर कर्णधार छेत्रीचा फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेला. पण, उत्तरार्धातील नवव्या मिनिटाला छेत्रीने हेडरद्वारे गोल नोंदवित भारताचे खाते उघडले. भारतीय संघातील सुरेश सिंगने 50 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. त्यानंतर जवळपास 39 मिनिटांच्या कालावधीत नेपाळच्या आघाडी तसेच बचावफळीने भारताला आघाडी वाढविण्यापासून रोखले. सामन्यातील शेवटच्या मिनिटाला सेहल अब्दुल समादने नेपाळच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारत गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचा तिसरा आणि शेवटचा गोल नोंदविला. या सामन्यानंतर कर्णधार स्टिमॅक यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.

सॅफ फुटबॉल स्पर्धेतील जेतेपदाचे सर्व श्रेय कर्णधार छेत्रीने संघातील युवा फुटबॉलपटूंना दिले आहे. 2021 सॅफ फुटबॉल स्पर्धेत कर्णधार छेत्रीची कामगिरी दर्जेदार झाली असून त्याने या स्पर्धेत पाच गोल नोंदविले आहेत. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत भारतीय फुटबॉल क्षेत्राला दर्जा मिळवून देणाऱया 37 वर्षी छेत्रीने या अंतिम सामन्यात एक गोल करून अर्जेंटिनाच्या मेसीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. आता मेसी आणि छेत्री यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये प्रत्येकी 80 समान गोल नोंदविले आहेत.

छेत्रीने यापूर्वीच ब्राझीलचे फुटबॉल सम्राट पेले यांना मागे टाकले आहे. छेत्रीने 2011 आणि 2015 साली भारतीय फुटबॉल संघाला सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली आहे. 2021 सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताने एकूण आठ गोल नोंदविले आहेत. शनिवारच्या अंतिम सामन्यानंतर सुरेश सिंग आणि सेहल अब्दुल समाद यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. भारतीय फुटबॉल संघाने मिळविलेला सॅफ फुटबॉल चषक संघातील दोन जखमी फुटबॉलपटू फारूख चौधरी आणि बेंडॉन फर्नांडिस यांना समर्पित केला आहे.

Related Stories

अष्टपैलू बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

एचएस प्रणॉयची बॅडमिंटन संघटनेकडे क्षमायाचना

Patil_p

सर्वोत्तम ऍथलिट्स पुरस्कारासाठी महिला, पुरुषांची यादी जाहीर

Patil_p

शेष भारत संघाची वाटचाल जेतेपदाकडे

Patil_p

कोरोनाग्रस्तांसाठी साथियनकडून 1 लाखाची मदत

Patil_p

‘हिटमॅन’ रोहित शर्माकडून 80 लाखांचा निधी

Patil_p