निर्मितीकार्याचा रविवारी रात्री घेतला आढावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रात्री अचानक नव्या संसद भवनाच्या निर्मिती स्थळाचा दौरा केला आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी रात्री सुमारे 8.45 वाजता नवी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या निर्मिती स्थळावर पोहोचले. अमेरिकेतून परतताच पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टाच्या निर्मितीकार्याचा आढावा घेतला आहे.
या पाहणीदरम्यान मोदींनी संबंधित अधिकाऱयांकडून निर्मितीकार्याची माहिती घेत आवश्यक निर्देश दिले आहेत .मोदींनी प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे तासभर पाहणी केली आहे. कोरोना काळात सेंट्रल व्हिस्टाचे कार्य सुरू ठेवल्याबद्दल विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. हा मुद्दा न्यायालयात पोहोचला होता, पण तेथूनही प्रकल्पाचे कार्य सुरू ठेवण्यास संमती मिळाली होती.


सेंट्रल व्हिस्टाच्या मास्टरप्लॅननुसार जुन्या गोलाकार संसद भवनाच्या समोरील गांधींच्या पुतळय़ाच्या मागील बाजूला त्रिकोणी आकाराचे संसद भवन उभारण्यात येत आहे. नवे संसद भवन 13 एकर जमिनीत निर्माण होणार आहे. यात दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येकी एक इमारत असेल, पण सेंट्रल हॉल निर्माण केला जाणार नाही.
सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पात सीपीडब्ल्यूडीच्या (केंद्रीय लोकनिर्माण विभाग) नव्या प्रस्तावानुसार पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थान कॉम्प्लेक्समध्ये 4मजली 10 इमारती असतील. पंतप्रधानांचे नवे निवासस्थान 15 एकर भूमीवर तयार होणार आहे. तर विद्यमान संसद भवनाचा वापर देखील सुरूच राहणार आहे.
2026 मध्ये लोकसभा मतदारसंघाचे नव्याने परिसीमनाचे काम प्रस्तावित आहे. सभागृहातील खासदारांची संख्या वाढू शकते. वाढीव खासदारांना सामाविण्यासाठी पुरेशी जागा जुन्या इमारतीत नाही. विद्यमान संसदेची इमारत 100 वर्षे जुनी असून सुरक्षासंबंधी समस्या असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते.