Tarun Bharat

सैन्य माघारीवर एकमत

Advertisements

सीमेवर तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम : भारत-चीन विदेश मंत्र्यांमध्ये रशियात द्विपक्षीय चर्चा

मॉस्को, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन दरम्यान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताकडून तणाव कमी करण्यासाठी सततच चर्चेचे प्रयत्न होत असले तरी चीनच्या कुरापती सुरूच आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्कोत द्विपक्षीय चर्चा पार पडली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांच्यासोबत तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पाच कलमी कार्यक्रमावर एकमत झाले. तसेच दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू राहणार असून सैनिकांची संख्या कमी करण्याच्या प्रक्रियेतही गती आणण्यावर या बैठकीत चर्चा झाली.

सीमेवर सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी आणि सीमेवरील सैनिकांना हटवण्यासंदर्भात एस. जयशंकर आणि वाँग यी यांच्यादरम्यान गुरुवारी रात्री उशिराने बैठक पार पडली. दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोमध्ये दाखल झाले होते. भारत आणि चीन या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध विकसित करण्यासाठी नेत्यांच्या सहमतीवरून मार्गदर्शन घ्यावे आणि दोन्ही देशांतील मतभेदांचे रुपांतर वादात होऊ नये, असेही या बैठकीत ठरवण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयतर्फे सांगण्यात आले. 

लडाखमधील भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पाच कलमी कार्यक्रमावर सहमती झाली आहे. तणावग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यास भारत आणि चीन दोन्ही देश तयार झाले आहेत. दोन शेजारी देश असल्या कारणाने भारत आणि चीनमध्ये काही मुद्यांवर असहमती असू शकते. पण ही असहमती योग्य संदर्भात पाहायला हवी, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर येऊन थांबले आहेत. पण जोपर्यंत दोन्ही देश आपल्या संबंधांना योग्य दिशा देतील, तोपर्यंत कोणतीही अडचण येणार नाही. अशा स्थितीत कोणत्याही आव्हानातून मार्ग काढता येऊ शकतो, असेही चीनने म्हटले आहे. सीमेवरील तणाव कमी करण्याचे भारताचे प्रयत्न आहेत, चीनच्या प्रति भारताचे धोरण यापुढेही समानच राहील, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी गेल्या आठवडय़ात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांशीसुद्धा चर्चा केली होती. ही बैठकसुद्धा मॉस्कोमध्येच झाली होती. त्यावेळीसुद्धा तणाव कमी करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली होती. गुरुवारची बैठक भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री उशिराने सुरू होऊन सुमारे तीन तास चालली. परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात या पाच कलमी कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

पाच कलमी कार्यक्रम…

1. सीमाभागाविषयीच्या मतभेदांचे रुपांतर वादात न होऊ देण्यासाठी भारत-चीन संबंध विकसित करण्याच्या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या सहमतीतून मार्गदर्शन घ्यावे

2. सीमाभागातील सद्यस्थिती कोणत्याही देशाच्या हिताची नाही. त्यामुळे दोन्ही देशाच्या सैन्याने एकमेकांशी संवाद चालू ठेवावा, एकमेकांपासून योग्य अंतर राखावे आणि तणाव कमी करावा.

3. दोन्ही देशांनी सद्यस्थितीतील सगळे करार आणि चीन-भारत सीमाविषयक नियमांचे पालन करावे. सीमाभागात शांतता राखावी आणि तणावामध्ये वाढ होईल अशी कोणतीही कारवाई टाळावी.

4. भारत-चीन सीमाप्रश्नावर विशेष प्रतिनिधी यंत्रणेमार्फत संवाद सुरू ठेवावा. या संदर्भात भारत-चीन सीमाप्रश्नावरील सल्लामसलत व समन्वय कार्य मंडळाने बैठकी चालू ठेवाव्यात.

5. सीमाभागात परिस्थिती जसजशी सामान्य होईल, तसतसे या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजनांची अंमलबजावणी वेगाने करावी.   एलएसीबाबत लष्करी चर्चा सुरू ठेवावी.

उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरूच

पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील स्थितीसंदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीत लडाख सीमेवरील स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. या बैठकीला लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि एनएसए अजित डोवालही उपस्थित होते. यापूर्वी गुरुवारी दोन्ही सैन्यात ब्रिगेडीयर पातळीवरील बैठक पार पडली. याआधी दोन्ही देशांमध्ये लेफ्टनंट जनरल किंवा कोअर कमांडर पातळीवर अनेकवेळा चर्चा झाली. पण तणाव कमी करण्याच्या दृष्टीने कोणतीच घडामोड घडताना दिसली नाही.

Related Stories

अमेरिकेच्या सैन्याला इराणने ठरविले दहशतवादी

Patil_p

इम्रान खान राजवटीत पाक जनता ‘गॅस’वर

Patil_p

कोरोना काळात ब्लड गॅस टेस्ट आवश्यक

Patil_p

अँथोनी फुकी यांच्याकडून क्षमायाचना

Patil_p

पुतीनसमर्थक व्हिक्टर ओर्बन हंगेरीत विजयी

Patil_p

रशिया-क्रिमियाला जोडणारा पूल भस्मसात

Patil_p
error: Content is protected !!