तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून दक्षता घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागावरील अधिकचा ताण कमी करण्यासाठी तसेच कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत हंगामी कालावधीसाठी विविध प्रवर्गातील तीन हजार 824 पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
शासनाकडून आलेल्या प्रस्तावानुसार मानधनावर हंगामी कालावधीकरिता ही भरती केली जात आहे. कोविड निगा केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्र, समर्पित कोविड रुग्णालयात विविध पदांसाठी रिक्त पदांची भरती होणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी 454 पदे, फिजिशियन 104, भूलशास्त्रज्ञ 71, आयुष वैद्यकीय अधिकारी 443, आरोग्य सेवक 2 हजार 683 तर एक्स-रे तंत्रज्ञाच्या 69 पदांची भरती होणार आहे. 17 ते 75 हजार रुपयांपर्यंत पदानुसार यासाठी मानधन दिले जाणार आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या www.zpsolapur.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह स्कॅन करून पीडीएफमध्ये कोविड सोलापूर @ २०२०@ जीमेल.कॉम या ईमेल आयडीवर १३ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावा. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व त्यासंदर्भात आवश्यक माहिती उपलब्ध आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करून कोविड योद्धा म्हणून देशासाठी योगदान द्यावे, योग्य उमेदवारांची निवड समितीकडून निवड केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.


previous post