प्रतिनिधी / कुर्डुवाडी
दूध म्हणजे शेतकऱ्यांचा आत्मा आहे. शेतकऱ्यांना दूध उत्पादन करण्यासाठी प्रतिलिटर २२ रुपये खर्च येतो. तर ते दुध १८ रुपये प्रति लिटर दराने घेतले जात आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये दर द्यावा यासाठी रासपा ठाम आहे. यामुळे १ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे चंद्रभागेमध्ये दूध अर्पण करून राज्य शासनाला साकडे घालणार असल्याचे माजी दुग्ध व मत्स्य उद्योग मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंढरपूर कडे जाण्यासाठी निघाले असताना कुर्डुवाडी येथील पत्रकारांशी वार्तालाप केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर,सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप गडदे, कुर्डुवाडी शहराध्यक्ष अभिजीत सोलंकर, राज्य कार्यकारिणी सदस्य पोपट शिरसागर, वैभवी भिसे, आजिनाथ गोफणे, शिवाजी सोनवणे, शिवाजी वाघमोडे, रविराज सलगर, विनायक गायकवाड, रोहित पिंजारे आदी उपस्थित होते.
जानकर पुढे म्हणाले दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केले पाहिजे हे शक्य आहे. मी दहा वर्षे मंत्री असतो तर ते करून दाखवले असते.महाराष्ट्रामध्ये दुधाचा एक ब्रँड झाला पाहिजे मात्र राजकारणी ते होऊन देत नाहीत. गाईच्या दुधाला ६५ रुपये प्रति लिटर तर म्हशीला ८५ रुपये दर देणे शक्य आहे.राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा. राज्यामध्ये दूध उत्पादक मोठ्या अडचणीत आला यासाठी साखर लॉबीपेक्षा दुधाची लॉबी मोठी आहे. याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


previous post