प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तहसील कार्यालयापाठोपाठ कुर्डुवाडीच्या दोन शासकीय कार्यालयात कोरोनाचा आज गुरुवारी शिरकाव झाला असून नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातील एक सफाई कामगार बाधित झाल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष अडागळे यांनी सांगितले तर माढा तालुका पंचायत समितीतील प्रशासन विभागातील एक कारकून बाधित असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी सांगितले. आज एकाच दिवशी दोन शासकीय कार्यालयात कोरोनाचा प्रवेश झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली.
माढा तालुक्यातील कुर्डुवाडी, माढा शहरासह ग्रामीण भागातील विविध गावांतही कोरोनाची संख्या वरचेवर वाढत चालली असून माढा तहसील कार्यालयातील एक अधिकारी व एक लिपिक पॉझिटिव्ह आल्यानंतर येथील काही आपत्कालीन विभाग वगळता संपूर्ण तहसील कार्यालय दोन तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर गुरुवारी कुर्डुवाडी शहरातील माढा पंचायत समितीच्या कार्यालयात आणि नगरपालिका कार्यालयातही कोरोना बाधीत आढळले. शुक्रवारी सकाळी पंचायत समिती व नगरपालिकेतील त्या बाधितांच्या हाय रिस्क संपर्कातील कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. गुरुवारच्या आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार माढा तालुक्यात उपळाई बु. ३, मोडनिंब ( पं.समिती मधील कारकून) १, माढा येथे १ व कुर्डुवाडी (न.पा सफाई कामगार) १ असे एकूण ६ कोरोना बाधीत रुग्ण तालुक्यात आढळले आहेत.तालुक्यात आजपर्यंत ३६८ जण कोरोनाबाधित असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
उद्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चाचणीनंतर कार्यालय चालू ठेवण्याबाबत काय तो निर्णय घेण्यात येईल असे गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील यांनी सांगितले.


previous post