कच्च्या तेलाचा पुरवठा कायम ठेवणार
रियाध –
जगातील सर्वात मोठा कच्चे तेल उत्पादक देश असलेल्या सौदी अरेबियाने भारताला मोठा दिलासा दिला आहे. सौदी अरेबियाने 4 उत्तर आशियाई देशांसाठी क्रूड ऑइलच्या पुरवठय़ात 15 टक्क्यापर्यंत कपात केली आहे. तर भारताचा पुरवठा मात्र कायम ठेवला आहे. ओपेक आणि त्याच्या सहकारी देशांनी उत्पादनातील कपात एप्रिलपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाची सरकारी कंपनी सौदी अराम्कोने भारतासाठी एप्रिलमध्ये पुरवठा वाढविण्याच्या मागणीला नकार दिला असला तरीही विद्यमान पुरवठा कमी न करणार नसल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाने चीनच्या रिफायनरींसाठी पुरवठा कमी केला आहे. तर जपानच्या खरेदीदारांसाठी प्रमाणात 10-15 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. सौदी अरेबियाने मार्च महिन्यात काही आशियाई खरेदीदारांसाठी पुरवठय़ात कपात केली नाही. पण फेब्रुवारीत एक चर्तुंथाशने पुरवठा कमी केला होता. भारत सरकारने अलिकडेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे ओपेक प्लस देशांकडे त्याचे उत्पादन वाढविण्याची मागणी केली होती. ही मागणी नाकारण्यात आली असली तरीही विद्यमान पुरवठा कायम ठेवल्याने दिलासा मिळणार आहे. सध्या बेंट पूड 69.44 डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास उपलब्ध होत आहे. भारत जगातील तिसऱया क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे.