Tarun Bharat

सौरभ गांगुलींना हृदयविकाराचा ‘सौम्य’ झटका

Advertisements

कोलकात्यातील वूडलँडस् इस्पितळात अँजिओप्लॅस्टी, प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती

कोलकाता / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरभ गांगुली यांना शनिवारी हृदयविकाराचा ‘सौम्य’ झटका येऊन गेल्यानंतर त्यांच्यावर प्रायमरी अँजिओप्लॅस्टी केली गेली. कोलकात्यातील वूडलँडस हॉस्पिटल या खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सौरभ गांगुली यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाचे पूर्ण लक्ष असल्याचे इस्पितळ सूत्रांतर्फे सांगितले गेले.

‘एक ब्लॉकेज काढण्यासाठी स्टेन्ट घलण्यात आले. त्यावेळी 3 ब्लॉक आढळून आले’, असे गांगुलींवर उपचार करणाऱया डॉ. सरोज मोंडल यांनी नमूद केले. त्यांच्यावर आणखी स्टेन्ट घालायचे का, याचा निर्णय त्यांच्या प्रकृतीवर अवलंबून असल्याचे यावेळी सांगितले गेले.

‘येत्या काही दिवसात त्यांच्या तब्येतीवर पूर्ण लक्ष ठेवले जाणार आहे. त्यांची प्रकृती कशी साथ देते, यावर उपचाराची दिशा अवलंबून असणार आहे. सध्या प्रकृतीत उत्तम प्रगती असून पुढील 3 ते 4 दिवस त्यांना इस्पितळात रहावे लागेल’, असे मोंडल यांनी स्पष्ट केले. गांगुली यांना शनिवारी दुपारी छातीत वेदना जाणवल्यानंतर इस्पितळात तातडीने दाखल करण्यात आले होते.

‘आम्ही तातडीने एमआय स्कॅन केले आणि त्यांच्या हृदयात तीन ब्लॉक असल्याचे आढळून आले. सध्या आम्ही त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टी केली आणि एक स्टेन्ट घातला आहे. त्यांची प्रकृती सध्या पूर्ण स्थिर आहे’, असे मोंडल यांनी येथे सांगितले. ‘जिममध्ये ट्रेडमिल करताना त्यांना वेदना जाणवल्या. यापूर्वी शुक्रवारी देखील त्यांना छातीत दुखत असल्याचे जाणवले’, याचाही त्यांनी उल्लेख केला.

हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाला किंवा त्याची गती कमी झाली तर त्याचा विपरीत परिणाम होतो. हृदय व्यवस्थित कार्यरत राहिले नसेल, हृदयाचे ठोके अचानक थांबले तर रक्ताभिसरणात समस्या निर्माण होते व अशा परिस्थितीत ब्लॉकेजेस आढळून येतात. गांगुली यांच्या कुटुंबियात हृदयविकाराचे बरेच प्रमाण राहिले आहे. सध्या त्यांच्यावर 5 डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे.

ममता बॅनर्जी यांच्याकडून सदिच्छा

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी गांगुली यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. यंदा एप्रिल-मे महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर गांगुली राजकारणात उतरणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून आहे.

राज्यातील सूत्रांनुसार गांगुली भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पण, स्वतः गांगुली यांनी यापूर्वी यावर काहीही जाहीरपणे भाष्य केलेले नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली असून ते नियामक मंडळाचे 39 वे अध्यक्ष आहेत. गांगुली यांनी बंगाल क्रिकेट संघटनेतही अनेक पदे भूषवली. 2014 मध्ये ते संयुक्त सचिव या नात्याने रुजू झाले होते.

Related Stories

हाय व्होल्टेज लढतीसाठी राजस्थान-गुजरात सज्ज

Patil_p

इंग्लंडचा द. आफ्रिकेविरुद्ध डावाने विजय

Patil_p

स्पेनचा क्रेस्पो ओडिशा एफसीशी करारबद्ध

Patil_p

फुटबॉलपटू रॅमोस कोरोना बाधित

Patil_p

इटालियन ब्रिगेड ठरले युरो चॅम्पियन्स!

Patil_p

भाविनाबेन पटेल उपउपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!