तन्मय दाते/ रत्नागिरी :
जर्मनीमध्ये इटलीतून कोरोनाचा प्रसार झाल्याचा अनेकांचा दावा असून येथील लोकप्रिय असलेला स्की हा खेळ व कार्निव्हल्स कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरले आहे. मात्र जर्मन सरकारने अत्यंत चोख व काटेकोर नियोजन केले असून नागरिकही प्रामाणिक साथ देत आहेत. कमी लोकसंख्या व पुरेशा सुविधांमुळे आता कोरोना काहीसा नियंत्रणात आला असला तरी तब्बल 4 हजार लोकांना प्राण गमवावे लागले असल्याचे मुळ रत्नागिरीची सायली पाटील-रेडीज सांगते.
पती ओंकार पाटीलसोबत गेले 4 वर्षे सायली दक्षिण जर्मनीमधील म्युनिच शहरात राहते. सायली सॉफ्टवेअर इंजिनियर असून Flixmobility GMBH या कंपनी मध्ये नोकरी करते. ओंकार Valeo-Siemens eAutomotive कंपनी मध्ये नोकरी करतो. हे दांपत्य रत्नागिरीतीलच असून सायली तेली आळी परिसरातील तर ओंकार साळवी स्टॉप जवळील आहे.
अन्य युरोपीय देशांप्रमाणे जर्मनीमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांचे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत 1,43,000 लोकांना लागण झाली असून जवळपास 4 हजार लोकांना प्राण गमवावा लागला आहे. आम्ही ज्या राज्यात राहतो (Bayern State) इथे जर्मनीमधील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पण रोगमुक्त झालेल्या लोकांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. सुमारे 88 हजार रूग्ण यातून पूर्णपणे बरे झाल्याचे सायली सांगते.
जर्मनीत सशक्त यंत्रणा कार्यरत
जर्मनी हा जगातल्या सर्वाधिक चाचण्या करणाऱया देशांपैकी एक आहे. 17 लाखांहून अधिक चाचण्या येथे केल्या गेल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना शोधण्यासाठी आणि उपचारासाठी एक पूर्ण यंत्रणा काम करते आहे. हेल्पलाईन नंबर्स, स्थानिक डॉक्टर्स आणि दवाखाने यांच्या मदतीने कोरोना संशयीत रुग्णाला चाचणी आणि उपचार करून घेणे खूप सोयीचे आहे. काही कंपनीमध्ये स्वतःच्या यंत्रणा आहेत, ज्या त्यांच्या कर्मचाऱयांना चाचणी आणि उपचार यासाठी मदत करतात. देशाकडे वाढत्या प्रसाराला सामोरे जाण्यासाठी पुरेसे व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन युनिट आहेत. राज्याचे आणि देशाचे प्रमुख याबाबतचे तपशील वारंवार देत असतात. त्यामुळे परिस्थिती सरकारच्या नियंत्रणामध्ये आहे याची खात्री मिळत असते.
कोरोनाचा प्रसार ‘स्कि’ अन् कार्निव्हलमुळे
इटलीतील उत्तर प्रातांमध्ये काही चिनी प्रवाशांकडून या संसर्गाची सुरुवात झाली. सीमा खुल्या असल्यामुळे इटलीच्या शेजारील जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड आदी देशांमध्ये याचा प्रादुर्भाव फारच सहजपणे झाल्याचा अनेकांचा दावा आहे. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रिया, इटलीच्या पर्वतीय प्रदेशात असलेल्या ‘स्कि रिसॉर्ट्स’मध्ये युरोप मधील वेगवेगळ्या देशातील माणसे स्कि (Ski) खेळासाठी मोठय़ा संख्येने येतात. या लोकांमार्फतसुद्धा तो अनेक ठिकाणी पसरला. जर्मनी बद्दल बोलायचे झाले तर फेब्रुवारीमध्ये कार्निव्हलच्या निमित्ताने हजारो माणसे एकत्र येतात, त्यातूनही प्रसार वाढला.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
सध्या जर्मनीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. निर्बंधांची अंमलबजावणी पायरी पायरीने करण्यात आली. देशाच्या बाह्य सीमा नियंत्रित, रेस्टॉरंट बंद, प्रेक्षणीय स्थळे बंद करणे अशा गोष्टींपासून सुरुवात केली गेली. 20 मार्चच्या सुमारास पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, पाळणाघरे बंद करण्यात आले. कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 2 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आणि याचे उल्लंघन केल्यास भरघोस दंडाची रक्कम भरायला लागणार होती. पण हे सर्व असताना सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक सुविधा सुरळीतपणे चालू आहेत. घरपोच सेवासुद्धा चालू आहेत. कुटुंबियांसोबत उद्यानामध्ये चालण्यासाठी किंवा धावण्यासाठी जाण्याची परवानगी आहे. वयोवृद्ध माणसांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडायला लागू नये यासाठी मदत गट आहेत. लवकरच संचारबंदी शिथिल करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत.
नियमांचे काटेकोर पालन
जर्मनीमधील माणसे नियमांच्या बाबतीत तत्पर असतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून लोक दैनंदिन व्यवहार चालू ठेवत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात संचारबंदीमुळे गर्दी कमी झाली आहे. पण छोटय़ा छोटय़ा उद्यानामध्ये 2-3 च्या गटांमध्ये बरेच लोक बाहेर पडलेले दिसतात. सुपर मार्केटमध्ये लोक एकमेकांपासून लांब राहून खरेदी करतात. खूप माणसे मास्क व ग्लोव्हजचा वापर करताना आढळतात. नियमभंग झाल्याच्या फारच कमी घटना कानावर आहेत.