Tarun Bharat

स्थलजलभ्रांति झाली पाहीं

Advertisements

त्या खांडव वनात मयासुर नावाचा अत्यंत पराक्रमी व बलाढय़ दैत्य वस्ती करून होता. जेव्हा खांडव वन अग्नीच्या भक्षस्थानी पडले त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी मयासुर कृष्णार्जुनांना शरण गेला. कृष्णाने त्याला जीवदान दिले व सुरक्षित बाहेर जाऊ दिले. खांडव वन जाळून टाकून एक मोठा मुलूख पांडवांच्या राज्यास वसाहतीस व शेतीस मोकळा झाला, तेव्हा त्यांच्या राज्याची अधिक भरभराट झाली.

अग्नीपासूनि वांचविला । म्हणोनि उपकारें दाटला ।

प्रत्युपकरणा अर्पिता जाला । सभा निर्मूनि निजसखया ।

मय असुराचा विश्वकर्मा । तेणें सभा परमोत्तमा ।

गौण जियेपुढें सुधर्मा । हेमललामात्मक अवघी ।

असुरांचा विश्वकर्मा असलेल्या मयासुराने कृतज्ञतेने एक दीव्य सभा पांडवांकरिता इंद्रप्रस्थात बांधून दिली. तिचे सहस्त्र स्तंभ स्फटिकाचे असून फारच शोभायमान दिसत होते. सभेच्या पुढे स्फटिकांची व इंद्रनीळ मण्यांची निरनिराळय़ा रत्नांनी सुशोभित केलेली सुवर्ण कमलांनी भरलेली पुष्करणी त्याने तयार केली. त्या सभेत त्याने निरनिराळय़ा प्रकारच्या कारागिरीच्या मौजाही केल्या. पाणी असेल तेथे जमीन दिसावी, जमीन असेल तेथे पाणी दिसावे, दरवाजा असेल तेथे भिंत दिसावी, भिंत असेल तेथे दरवाजा दिसावा अशी कित्येक आश्चर्याची कामे त्याने त्या सभेत तयार केली.

दुर्योधनासि जिये ठायीं । स्थलजलभ्रांति झाली पाहीं ।

पतन होतां नृप सर्वही । ललनादिकांहीं स्मय केला ।

हास्य करितां लहान थोर । तेणें सलज्ज धार्तराष्ट्र ।

कांति उतरोनि काळें वस्त्र । कांपेपरि तो हृदयीं सशल्य जाला ।

जेंवि कां सर्पें डाव धरिला । तेंवि दु:खाला विसरेना ।

या सभेमुळे इंद्रप्रस्थाची कीर्ति भरतखंडात दुमदुमू लागली व पांडवांच्या पराक्रमाची ख्याति चोहोकडे पसरली. त्याच सभागृहात दुर्योधनाला पाण्याच्या ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास होऊन तो घसरून पडला. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित राजे व स्त्रिया त्याला हसल्या. ते हसे ऐकून दुर्योधन आधी लाजला आणि मग क्रोधाने थरथरा कापू लागला. पांडवांनी पाहुणा म्हणून आलेल्या दुर्योधनाचा सन्मान केला. तरी तो त्याच्या फजितीचे शल्य विसरू शकला नाही. साप जसा डूख धरून राहतो असे म्हणतात, तसा दुर्योधन मनात या अपमानाचे शल्य धरून राहिला.

अरोग केला जो कृशान । तो होऊनि संतुष्टमान ।

पार्थालागीं गाण्डीवसंज्ञ । देता जाला कोदंड ।

क्षीरोदसंभव अश्व रत्ना । समान जवीन क्रमिती गगना । दिव्य तुरंग ते स्यंदना । सहित अर्जुना समर्पी ।अक्षयसायकमंडित तूण । अभेद्यचर्म म्हणिजे वोडण । परशरघातें नोहे भिन्न । इत्यादि अर्पण करूनियां ।

यानंतरें श्रीभगवान । मय पावक दोघे जण ।

विसर्जूनियां सभासदन । पाहोनि संपूर्ण संतोषे ।

म्हणे मज तुमचा उपकार फार । उत्तीर्ण नोहें मी अणुमात्र । येथूनि तुमचा आज्ञाधर । स्मरतां तत्पर सेवेसी ।ऐसी ऐकोनि पावकवाणी । पाण्डव आणि चक्रपाणि । पावकालागीं मधुरवचनीं । गौरवूनियां बोळविला ।

देवदत्त परुळेकर

Related Stories

ब्रह्मज्ञानाची अखेरची स्थिती म्हणजेच शांती होय

Patil_p

भद्र पौर्णिमा माहात्म्य

Patil_p

जीवेत् शरद: शतम् मोदीजी

Patil_p

मोदीजी: हीच ती वेळ, चीनला धडा शिकवा

Patil_p

योग्य ‘व्यक्ती’ची योग्य निवड…

Patil_p

‘क्वाड’चे फलित

Amit Kulkarni
error: Content is protected !!