Tarun Bharat

स्पर्धकांना पूर्ण वेळ मास्कची सक्ती

टोकियो ऑलिम्पिक पदक वितरण सोहळय़ाची मार्गदर्शक तत्वे जाहीर, पोडियमवर ग्रुप फोटो घेण्यास परवानगी नाही, पोडियम मोडय़ूलमध्येही अंतर राखणार

वृत्तसंस्था /टोकियो

ऍथलिट्स, प्रेझेंटर्स व स्वयंसेवकांना पदक वितरण सोहळय़ादरम्यान पूर्ण वेळ मास्कची सक्ती असेल. त्याचप्रमाणे पोडियमवर ग्रुप फोटो घेण्यास परवानगी नसेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गुरुवारी जाहीर केले. कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक निर्बंध लादले गेले असून त्याचा हा एक भाग आहे.

ऍथलिट्स व मेडल पेझेंटर्सना पूर्ण वेळ मास्कची सक्ती असणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्वानुसार, प्रत्येक पदकासाठी स्वतंत्र पोडियम मोडय़ूल्स असतील आणि यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार आहे. पदक वितरण सोहळय़ात पदके ट्रे मध्ये घेऊन येणाऱया पेझेटर्न्सचे पूर्ण लसीकरण झालेले असेल. शिवाय, प्रत्येक इव्हेंटसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा एक सदस्य व आंतरराष्ट्रीय फेडरेशनचा एक सदस्य उपस्थित असणार आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेसाठी या उपाययोजना लागू केल्या गेल्या आहेत, असे आयओसीने (आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती) पत्रकातून जाहीर केले.

सर्व ऍथलिट, मेडल प्रेझेंटर्स व स्वयंसेवकांना मार्गदर्शक तत्त्वांविषयी प्रत्येक इव्हेंटनंतर थोडक्यात माहिती दिली जाईल आणि त्याचे काटेकोर पालन होईल, याकडे लक्ष पुरवले जाईल, असेही आयओसीने याप्रसंगी स्पष्ट केले.  

जिंका आणि स्वतःच पदके स्वीकारा!

आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱया खेळाडूंना पदके ट्रे मधून स्वतःच घ्यावी लागतील आणि स्वतःच ती परिधान करावी लागतील, असे यापूर्वी म्हटले होते. त्याचा या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्राधान्याने उल्लेख आहे. त्यामुळे, पदके जिंकणाऱया ऍथलिट्सना स्वतःच ट्रे मधून पदके घ्यावी लागतील आणि स्वतःच गळय़ात परिधान करावी लागतील. अशा प्रकारे बक्षीस वितरण सोहळा घेण्याची ही ऑलिम्पिक इतिहासातील पहिलीच वेळ असेल.

अगदी अलीकडे, युफा अध्यक्ष अलेक्झांडर सेफेरिन यांनी फायनल झाल्यानंतर विजेत्या संघातील खेळाडूंना स्वतः पदके प्रदान केली होती. त्यांनी इटालियन गोलरक्षक जियानलुईगी याच्याशी हस्तांदोलन देखील केले होते. पण, येथे सोहळय़ादरम्यान कोणीही हस्तांदोलन करणार नाही किंवा आलिंगनही देणार नाही, असे बाक यांनी स्पष्ट केले.

एरवी ऑलिम्पिक पदकविजेत्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्य किंवा त्या खेळातील सर्वोच्च संघटनेचा एखादा पदाधिकारी यांच्या हस्ते पदक प्रदान केले जाते. ती परंपरा देखील या ऑलिम्पिकमध्ये खंडित होणार आहे. टोकियोमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले असताना व आणीबाणी लागू असताना या प्रतिकूल वातावरणात दि. 23 जुलैपासून यंदाच्या ऑलिम्पिकला साधेपणाने सुरुवात होत आहे. ही स्पर्धा दि. 8 ऑगस्टपर्यंत चालेल.

केनिया ऑलिम्पिक संघातील 2 धावपटूंना डच्चू

नैरोबी : टोकियो ऑलिम्पिकला अवघ्या आठवडाभराचा कालावधी बाकी असताना केनियाला आपल्या पथकातील 2 धावपटूंना उत्तेजक चाचणीवरुन डच्चू द्यावा लागला आहे. या 2 धावपटूंनी डोपिंग टेस्टमध्ये पुरेशा प्रमाणात भाग घेतला नसल्याने ही कारवाई केली गेली. 10 महिन्यात किमान 3 वेळा आऊट ऑफ कॉम्पिटिशन टेस्ट घेण्याचा नियम या ऍथलिटनी पाळला नव्हता.

स्टीपलचेस वर्ल्ड व ऑलिम्पिक चॅम्पियन कन्सेस्लस किप्रुतोला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन आपले जेतेपद कायम राखता येणार का, याबद्दल सध्या साशंकता आहे. किप्रुतो सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. शिवाय, केनियात त्याच्यावर एका गुन्हय़ाबद्दल शिक्षाही ठोठावली गेली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. 18 वर्षीय इतियांगवर देखील यंदाच्या पथकातून बाहेर होण्याची नामुष्की आली आहे.

चाहते नसतील, पण गोंगाट असेल!

यंदा एकाही ऑलिम्पिक इव्हेंटसाठी प्रेक्षकांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, यामुळे ऑलिम्पिकचा थरार कमी होऊ नये, यासाठी आयोजकांनी इमर्सिव्ह साऊंड सिस्टिमचा विनियोग करणार असल्याचे म्हटले आहे. या साऊंड सिस्टिमनुसार, इव्हेंट सुरु असताना स्टेडियमवर चाहत्यांचा नेहमी गजर असतो, तो सुरु करत वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात थेट प्रक्षेपण केले जात असताना असा प्रयोग राबवला गेला होता.

इतिहासाची पाने उलगडताना…

1904 सेंट लुईस ऑलिम्पिक

  • युरोपच्या बाहेर भरवली गेलेली ही पहिलीच ऑलिम्पिक ठरली. याच स्पर्धेत पहिल्या 3 विजेत्यांना पदके देण्याची प्रथा सुरु झाली आणि याच वेळेपासून पहिल्या क्रमांकाच्या जेत्याला सुवर्णपदकाने गौरवण्याची सुरुवात झाली.
  • मुष्टियुद्ध, डम्बेल्स, फ्री स्टाईल कुस्ती व डेकॅथ्लॉन या खेळांचे 1904 ऑलिम्पिकमध्ये पदार्पण झाले.
  • तरुणपणी रेल्वे अपघातात एक पाय गमावलेल्या अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्ज आयजरने कृत्रिम पाय बसवून या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि या परिस्थितीतही 6 पदके जिंकण्याचा पराक्रम गाजवला. या 6 पैकी 3 सुवर्णपदके होती.
  • रशिया-जपानला युद्धजन्य परिस्थितीमुळे सेंट लुईसला पोहोचणे देखील कठीण होते. अशा परिस्थितीत एकूण 630 ऍथलिट्सपैकी 523 ऍथलिट यजमान अमेरिकेचेच होते. अर्धा डझनपेक्षा अधिक इव्हेंट तर फक्त अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढवले गेले. 

1908 लंडन ऑलिम्पिक

  • प्रारंभी रोममध्ये होणारी ही स्पर्धा आर्थिक कारणांमुळे लंडनला हलवली गेली. ही ऑलिम्पिक चक्क 188 दिवस चालली. रॅकेट इव्हेंट्सच्या माध्यमातून 27 एप्रिलला ऑलिम्पिकला सुरुवात झाली. प्रत्यक्षात त्याचे उद्घाटन मात्र 13 जुलै रोजी झाले. फिल्ड हॉकी फायनलसह 31 ऑक्टोबर रोजी या ऑलिम्पिकची सांगता झाली.
  • ऑलिम्पिक्ससाठी खास स्टेडियम उभे केले गेले, हे या ऑलिम्पिकचे ठळक वैशिष्टय़. व्हाईट सिटी स्टेडियम यामुळे स्पर्धेचे खऱया अर्थाने सेंटर पीस ठरले. या स्टेडियममध्ये केवळ रनिंग ट्रक नव्हे तर स्विमिंग पूल, सायकलिंग ओव्हल व कुस्ती, जिम्नॅस्टिक्ससाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारले गेले होते.
  • याच ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनचे अंतर 195 मीटर्सने वाढवले गेले, जेणेकरुन रेस विंडर कॅसलच्या नर्सरीवर सुरु केली जाईल आणि त्याची फिनिशिंग लाईन स्टेडियमच्या रॉयल बॉक्सजवळ असेल. 42.195 किलोमीटर्सचे हेच अंतर 1924 ऑलिम्पिकपासून कायम ठेवले गेले.
  • जॉन टेलर हा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय ऍथलिट ठरला. याच ऑलिम्पिकमध्ये पुरुषांची 100 मीटर्स धावण्याची शर्यत समाविष्ट केली गेली. 200 मीटर्स, 400 मीटर्स व 800 मीटर्स इव्हेंट देखील समाविष्ट होते. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांनी एकत्रित संघ उतरवला आणि त्यांचे पथक ऑस्ट्रेलिया नावाने ओळखले गेले.

Related Stories

स्पेनची मुगुरूझा एकेरीत अजिंक्य

Amit Kulkarni

झिम्बाब्वेला नमवित भारत उपांत्य फेरीत

Patil_p

मुंबईचा अर्जुन गोव्याकडून खेळणार?

Patil_p

साबा करीम यांचा राजीनामा

Patil_p

भारतीय संघात निवडीविषयी सध्या तरी विचार करत नाही : रिंकू सिंग

Patil_p

विंडीजचा इंग्लंडवर कसोटी मालिका विजय

Patil_p
error: Content is protected !!