Tarun Bharat

स्पुतनिक-5 अन् कोविशिल्डचे संयुक्त परीक्षण

लस अधिक प्रभावी ठरण्याची तज्ञांना अपेक्षा : मिश्र डोसचे परीक्षण जाहीर : भारतालाही लाभ होणार :

ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस कोविशिल्ड परीक्षणादरम्यान 70-90 टक्क्यांपर्यंत प्रभावोत्पादक आढळून आली आहे. तर स्पुतनिक-5 ही लस 92 टक्के प्रभावोत्पादक असल्याचा रशियाच्या संस्थेचा दावा आहे. दोन्ही लसींच्या निर्मात्यांनी आता यांच्या मिश्र डोसच्या परीक्षणाची घोषणा केली आहे. यामुळे लस अधिक प्रभावी ठरणार असल्याची अपेक्षा तज्ञांना आहे. जर असे घडले तर याचा लाभ भारतालाही मिळणार आहे.

लवकरच परीक्षण सुरू

चालू वर्षाच्या अखेरपर्यंत परीक्षणास प्रारंभ होणार आहे. दोन्ही लसींना मिळून नव्या प्रकारची लस तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरी लस स्पुतनिक-5 आणि कोविशिल्डहून अधिक प्रभावी असेल अशी अपेक्षा असल्याचे उद्गार रशियन यंत्रणा आरडीआयएफने काढले आहेत. तर एस्ट्राजेनेकानेही मिश्र डोसच्या परीक्षणाची घोषणा केली आहे.

दोन्ही लसींचा आधार समान

कोविशिल्ड आणि स्पुतनिक-5 दोन्हीही सर्वसामान्य सर्दीच्या विषाणूवर आधारित आहेत. यात नुकसान न पोहोचविणऱया एडिनोवायरसचा वापर करण्यात आला आहे. जो कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी पेशींना प्रोटीनच्या निर्मितीचे निर्देश देतो. इबोला विषाणूच्या लसीतही याचा वापर करण्यात आला आहे. याचमुळे यांचा मिश्र प्रयोग निश्चितपणे अधिक यशस्वी ठरण्याची अपेक्षा दोन्ही कंपन्यांना वाटत आहे. एस्ट्राजेनेका कंपनीने लवकरच गॅमलिया इन्स्टीटय़ूटची लस स्पुतनिक-5 सोबत परीक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ब्रिटनमध्ये कोविशिल्ड या लसीच्या आपत्कालीन वापराचा विचार सुरू असून अमेरिकेत याचे परीक्षण जानेवारीपर्यंत संपुष्टात येणार आहे. रशियात स्पुतनिक-5 चा वापर सुरू झाला आहे.

पुढील वर्षी परीक्षण

स्पुतनिक-5च्या दोन पैकी एक वेक्टरचा वापर करत एस्ट्राजेनेकाकडून क्लीनिकल ट्रायल सुरू करण्याचा निर्णय स्वागतयोग्य असल्याचे विधान आरडीआयएफचे प्रमुख किरिल दमित्री यांनी केले आहे. यातून लसी अधिक प्रभावी ठरण्याची अपेक्षा असून अन्य कंपन्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विविध प्रकारच्या लसींचा संयुक्त प्रयोग पुढील वर्षापासून सुरू करणार असल्याचे ब्रिटनच्या लसविषयक कृतिदलाचे प्रमुख कॅट बिंघम यांनी सांगितले आहे.

स्पुतनिक-5 ला लाभ

रशियात स्पुतनिक-5 चा वापर सुरू झालेला असला तरीही अद्याप त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली नाही. एस्ट्राजेनेकासोबत प्रयोगाच्या भागीदारीने स्पुतनिक-5 ला किमान ब्रिटनसारख्या महत्त्वपूर्ण देशात स्वीकारार्हता मिळण्याची अपेक्षा आहे. पाश्चिमात्य देशांच्या काही वैज्ञानिकांनी स्पुतनिक-5 च्या वापरावर चिंता व्यक्त केल्याने नवे परीक्षण उपयुक्त ठरू शकते.

रशियात रुग्ण वाढतेच

रशियात कोरोनाचे संक्रमण वाढतेच आहे. मागील 24 तासांमध्ये 28 हजार 137 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 26 लाखांच्या पार गेली आहे. रशियात लसीकरण सुरू झाले असले तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने त्याच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Related Stories

ब्रिटन : निर्बंध राहणार

Omkar B

पाकिस्तानी विद्यार्थ्यांचे भवितव्य चीनमुळे टांगणीला

Amit Kulkarni

समुद्रकिनारी जाणाऱया श्वानांचा होतोय मृत्यू

Patil_p

एकेकाळी मोलकरीण आता टीव्हीवर सूत्रसंचालिका

Patil_p

लसीशिवाय नष्ट होईल कोरोना व्हायरस : डोनाल्ड ट्रम्प

Tousif Mujawar

मुशर्रफना फाशी सुनावणाऱ्या न्यायाधीशाचा कोरोनाने मृत्यू

Omkar B