मोहन मोरे चषक बीपीएल क्रिकेट स्पर्धा


क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित मोहन मोरे बेळगाव प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्पोर्ट्स ऑन संघाने के. आर. शेट्टी संघाचा 5 गडय़ांनी तर सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखानाने साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाचा सुपरओव्हरमध्ये पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. दीपक नार्वेकर स्पोर्ट्स ऑन, निलेश पाटील जिमखाना यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने 19.5 षटकात सर्व बाद 92 धावा केल्या. 9 बाद 49 अशी नाजुक स्थिती असताना फरहान पाटील व स्वयम अप्पण्णावर यांच्या दहाव्या गडय़ासाठी 43 धावांच्या भागीदारीमुळे 92 धावांपर्यंत मजल मारली. फरहान पाटीलने 28, स्वयम अप्पण्णावरने 17 धावा केल्या. स्पोर्ट्स ऑनतर्फे दीपक नार्वेकरने 12 धावात 4, तेज पवारने 8 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्पोर्ट्स ऑन संघाने 15.5 षटकात 5 बाद 94 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. आकाश कटांबळेने 1 षटकार, 3 चौकारासह 36 तर रोहित देसाईने 1 षटकार, 1 चौकारासह 18 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे पुनित दीक्षितने 12 धावात 2, स्वयम अप्पण्णावरने 14 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखानाने 20 षटकात 8 बाद 159 धावा केल्या. निलेश पाटीलने 5 षटकार, 5 चौकारासह 72, रोहित पाटीलने 2 षटकार, 2 चौकारासह 37 तर अमर घाळीने 14 धावा केल्या. साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्सतर्फे नंदकुमार मलतवाडकरने 23 धावात 3 तर भरत गाडेकरने 24 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्सने 20 षटकात 8 बाद 159 धावा केल्याने सामना टाय झाला. यश कळसण्णावरने 1 षटकार, 5 चौकारासह 57, सर्फराज मुल्लाने 2 षटकार, 4 चौकारासह 52 धावा केल्या. जिमखानातर्फे रोहित पाटीलने 15 धावात 3 गडी बाद केले. सामना टाय झाल्याने पंचांनी सुपरओव्हर नियमाचा वापर केला. त्यामध्ये साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्सने 6 चेंडूत बिनबाद 14 धावा केल्या. स्वप्निल हेळवेने 10 धावा केल्या. त्याला उत्तर देताना सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखानाने 0.5 षटकात 1 गडी बाद 15 धावा करून सामना जिंकला. केतज कोल्हापूरने 8 धावा केल्या. 2 चेंडूत 6 धावांची गरज असताना दीपक राक्षेने षटकार मारून सामना जिंकून दिला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे समिर लोकूर, संजय पोतदार, सुधाकर पाटणकर यांच्या हस्ते सामनावीर दीपक नार्वेकर, इम्पॅक्ट खेळाडू तेजस पवार, सर्वाधिक षटकार रोहित देसाई, उत्कृष्ट झेल फरहान पाटील यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे रोहन दळवी, मनीश ठक्कर, रोहित पोरवाल यांच्या हस्ते सामनावीर निलेश पाटील, इम्पॅक्ट खेळाडू यश कळसण्णावर, सर्वाधिक षटकार निलेश पाटील, उत्कृष्ट झेल गौस हाजी यांना चषक देवून गौरविण्यात आले.
सोमवारचे सामने : एक्सेस डेव्हलपर्स वि. सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना सकाळी 9 वा., मोहन मोरे वि. विश्रुत स्ट्रायकर्स दुपारी 1 वा.