Tarun Bharat

स्पोर्ट्स mania

रोनाल्डो…‘गोलमशिन’ !

क्रिस्तियानो रोनाल्डो उर्फ ‘सीआर सेव्हन’…2002 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी त्यानं पोर्तुगालच्या ‘स्पोर्टिंग सीपी’तर्फे वरिष्ठ स्तरावर पदार्पण केलं तेव्हा तो सर्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवेल याची कुणी कल्पना केली होती का ?…रोनाल्डो ‘स्पोर्टिंग सीपी’ तसंच ‘युवेंतस’कडून खेळताना देखील चमकलेला असला, तरी त्याचं नाव घेतल्यानंतर प्रामुख्यानं डोळय़ांसमोर उभी राहते ती ‘रेयाल माद्रिद’ आणि खास करून ‘मँचेस्टर युनायटेड’मधील त्याला ‘सुपरस्टार’ बनविणारी कारकीर्दच…

स्तियानो रोनाल्डो दोस सांतोस आवेरो…पोर्तुगालच्या मदेरा बेटावर 5 फेब्रुवारी, 1985 रोजी जन्मलेला हा खेळाडू जेव्हा 2003 मध्ये 18 व्या वर्षी नामवंत ‘मँचेस्टर युनायटेड’मध्ये त्याचे प्रशिक्षक सर ऍलेक्स फर्ग्युसन यांच्यामुळं दाखल झाला तेव्हा गोल करण्याच्या कौशल्यासाठी मुळीच ओळखला जात नव्हता. त्याऐवजी प्रसिद्ध होता ‘ड्रिब्लिंग’ नि खेळण्याच्या सहजसुंदर शैलीसाठी. तो गोल नोंदविण्यासाठी झपाटय़ानं गाजू लागला 2006 पासून…

रोनाल्डो पदरी असताना ‘मँचेस्टर युनायटेड’नं सलग तीन ‘प्रीमियर लीग’ किताब, ‘चॅम्पियन्स लीग’ आणि ‘फिफा क्लब विश्वचषक’ देखील जिंकला. त्यानं पहिल्यांदा ‘बॅलन डी’ऑर’ पुरस्कार पटकावला त्यावेळी त्याचं वय 23…2009 साली ‘रेयाल माद्रिद’नं 80 दशलक्ष पौंड मोजून क्रिस्तियानोला आपल्या ताफ्यात खेचलं तेव्हा ते फुटबॉलमधलं सर्वांत महागडं हस्तांतरण ठरलं होतं…त्याच्या मुक्कामात ‘रेयाल माद्रिद’नं दोन ‘ला लीगा’, दोन ‘कोपा डेल रे’ अन् चार ‘चॅम्पियन्स लीग’ विजेतेपदांसह 15 चषक खात्यात जमा केले आणि रोनाल्डो बनला क्लबचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू. ‘बार्सिलोना’तर्फे खेळणाऱया लायोनेल मेस्सीला त्याचा प्रतिस्पर्धी मानलं जाऊ लागलं ते तेव्हापासून…

2018 साली रोनाल्डोनं 100 दशलक्ष युरोंच्या बदल्यात ‘युवेंतस’मध्ये उडी मारली तेव्हाही तो एखाद्या इटालियन क्लबनं करारबद्ध केलेला सर्वांत महागडा खेळाडू ठरला. 30 पेक्षा जास्त वयाच्या एखाद्या खेळाडूसाठी मोजलेली ही सर्वांत मोठी रक्कम…तिथं देखील त्याच्या बळावर संघानं मोठी भरारी घेतली…गेल्या वर्षी ‘मँचेस्टर युनायटेड’मध्ये परतण्याचा निर्णय त्यानं घेतला खरा, पण तो फळाला आला नाही अन् नुकतीच प्रशिक्षक हॅग यांचा समाचार घेत त्यानं वेगळी वाट पकडलीय (क्रिस्तियानोनं ‘रेयाल माद्रिद’ सोडून ‘युवेंतस’मध्ये जात असल्याची घोषणा केली होती ती अशीच रशियातील विश्वचषक स्पर्धा चालू असताना). त्यामुळं सध्याच्या घडीला रोनाल्डो विश्वातील कुठल्याच क्लबमध्ये नाहीये…

त्यानं पोर्तुगालतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले ते 2003 मध्ये 18 व्या वर्षी. तेव्हापासून 190 पेक्षा जास्त सामने खेळलेला रोनाल्डो त्या देशाचा सर्वांत जास्त लढती खेळलेला खेळाडू बनलाय. शिवाय तो पोर्तुगालचा सर्वोच्च गोल करणारा खेळाडू…क्रिस्तियानोनं पोर्तुगीज संघातून पहिला आंतरराष्ट्रीय गोल नेंदविला तो 2004 च्या ‘युरो’ मध्ये. तिथं त्यानं संघाला अंतिम फेरी गाठण्यास मदत केली…जुलै, 2008 मध्ये राष्ट्रीय संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपविण्यात आलं अन् 2015 साली क्रिस्तियानो रोनाल्डोला पोर्तुगीज फुटबॉल महासंघानं ‘सर्वकालीन सर्वोत्कृष्ट पोर्तुगीज खेळाडू’ म्हणून घोषित केलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यानं पोर्तुगालला ‘युरो 2016’मध्ये त्यांचा पहिल्या मोठय़ा स्पर्धेचा किताब, तर 2019 साली आरंभीच्या ‘युएफा नेशन्स लीग’चं विजेतेपद मिळवून दिलं…2020 च्या ‘युरो चषक’ स्पर्धेत सर्वांत जास्त गोलांसाठीचा ‘गोल्डन बूट’ मिळाला तो रोनाल्डोलाच…आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत क्रिस्तियानो रोनाल्डो जिथं जिथं खेळला तिथं तिथं त्यानं विक्रम मोडले अन् आता वयाच्या 37 व्या वर्षीही तो इमाने इतबारे करतोय तेच काम !

विक्रमवीर…

 • रोनाल्डोला पाच वेळा ‘बॅलन डी’ऑर’ पुरस्कार आणि ‘युरोपियन गोल्डन बूट’ युरोपियन खेळाडूंचा विचार करता सर्वाधिक म्हणजे चारदा प्राप्त झालाय…
 • त्याच्या कारकिर्दीत तो ज्या संघांतर्फे खेळला त्यांनी मिळून उचललेत एकूण 32 चषक…यात सात लीग किताब, पाच ‘युएफा चॅम्पियन्स लीग’ जेतेपदं नि एक ‘युएफा युरोपियन स्पर्धे’चं विजेतेपद यांचा समावेश…
 • रोनाल्डोच्या नावावर विसावलेत अनेक विक्रम…तो ‘चॅम्पियन्स लीग’मध्ये सर्वाधिक 183 सामने खेळलेला अन् सर्वांत जास्त 140 गोल नोंदविणारा खेळाडू.. युरोपियन स्पर्धेत सर्वाधिक गोलांबरोबर (14) आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल नोंदविण्याच्या बाबतीत देखील तोच अग्रक्रमांकावर (118 गोलांची नोंद)…खेरीज त्याच्याइतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लढती (193) कुठलाच युरोपियन खेळाडू खेळलेला नाही…
 • आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत 1,100 हून अधिक सामने खेळलेल्या अन् वरिष्ठ स्तरावर क्लब व देशासाठी मिळून 800 हून अधिक गोल केलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो.
 • पाच विश्वचषक स्पर्धांत गोल करणारा रोनाल्डो हा एकमेव पुरुष खेळाडू. त्यानं हा मान मिळविला सध्या चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत घानाविरुद्ध…

व्यायाम नि आहाराच्या बाबतीत काटेकोर…

 • वयाच्या 15 व्या वर्षी हृदयाच्या समस्येमुळे शस्त्रक्रिया करावा लागलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डोचं शरीर आज 37 व्या वर्षी देखील दशकभरापूर्वीप्रमाणं तंदुरुस्त दिसतंय…त्यासाठी तो आठवडय़ाचे पाच दिवस 3-4 तास व्यायाम करतो. यामुळं शरीरातील चरबी कमी ठेवण्यास मदत होते. त्याला जोड दिली जाते ती ‘कार्डिओ’ व्यायामाच्या अनेक सत्रांची…विश्रांतीच्या दिवसांतही तो पोहायला किंवा धावायला जातो अन् रोज 8 तास झोप मिळेल याची काळजी घेतो…
 • 6 फूट 2 इंच उंचीचा, 83 किलो वजनाचा क्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या आहाराकडे खूप गांभीर्यानं पाहतो. ‘चांगल्या व्यायामाला चांगल्या आहाराची जोड दिली पाहिजे’, असं त्याचं मत…रोनाल्डो भरपूर प्रमाणात कार्बोहायडेट्स, फळं नि भाज्यांसह उच्च प्रथिनेयुक्त आहार मिळेल याची काळजी घेतो अन् टाळतो ते साखरयुक्त पदार्थ…
 • क्रिस्तियानो दिवसातून सहा वेळा किंवा दर तीन ते चार तासांनी एकदा अशा प्रकारे लहान ‘मिल्स’ घेतो…त्याला मासे आवडतात अन् तो कधीही ‘फ्रोझन फूड’ खात नाही. आपण जे खाणार ते ताजं असेल याकडे त्याचा कटाक्ष असतो…

वार्षिक उत्पन्न 12 कोटी डॉलर्स

विश्वचषक स्पर्धासामनेगोल
200661
201041
201431
201844
2022 (आतापर्यंत)21

रोनाल्डोची कारकीर्द…

संघसामनेगोल
मँचेस्टर युनायटेड345145
युवेंतस134101
रेयाल माद्रिद438450
स्पोर्टिंग सीपी315
पोर्तुगाल193118
एकूण1141819

‘ट्रक अँड फिल्ड’ हेप्टॅथलॉन…

 • हेप्टॅथलॉन ही ‘ट्रक अँड फील्ड’मधील एक स्पर्धा असून त्यात सात क्रीडाप्रकारांचा समावेश असतो. हे नाव ‘हेप्टा’ या ग्रीक शब्दावरून आलंय. त्याचा अर्थ होतो ‘सात’ आणि ‘एथलॉन’ म्हणजे स्पर्धा…
 • महिला आणि पुरुष गटातील हेप्टॅथलॉनमध्ये असलेले सात क्रीडाप्रकार भिन्न असतात. पुरुषांचे हेप्टॅथलॉन सहसा ‘इनडोअर’मध्ये होते, तर महिलांची ‘हेप्टॅथलॉन’ स्पर्धा मैदानात अयोजित केली जाते. त्यातील पहिले चार प्रकार पहिल्या दिवशी होतात आणि उर्वरित तीन दुसऱया दिवशी…
 • 80 च्या दशकात महिलांच्या हेप्टॅथलॉनची सुरुवात झाली आणि ही स्पर्धा 1984 साली ऑलिम्पिकमध्ये प्रथम झळकली. या स्पर्धेत 100 मीटर हर्डल्स, उंच उडी, गोळाफेक, 200 मीटर धावणे, लांब उडी, भालाफेक आणि 800 मीटर धावणे यांचा अंतर्भाव असतो…
 • पुरुषांच्या ‘इनडोअर’ हेप्टॅथलॉनमध्ये समावेश असतो तो 60 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, उंच उडी, 60 मीटर हर्डल्स, पोल व्हॉल्ट आणि 1000 मीटर धावणे यांचा…
 • दोन्ही गटांतील गुण देण्याची पद्धत कमी-जास्त प्रमाणात समान. स्पर्धकाला प्रत्येक क्रीडाप्रकारातील त्याच्या कामगिरीच्या आधारे गुण प्राप्त होतात. स्पर्धेच्या शेवटी साऱया गुणांची बेरीज करून सर्वाधिक गुण मिळविलेल्या खेळाडूला विजेता घोषित केले जाते…
 • महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये विश्वविक्रम आहे तो महान अमेरिकी ऍथलिट जॅकी जॉयनर केरसी यांच्या नावे. तो मागील 34 वर्षं कुणालाही मोडणं जमलेलं नसून त्यांनी 1988 मध्ये त्याची नेंद करताना मिळविले तब्बल 7291 गुण…

Related Stories

WTC Final: भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाची बॅटिंग; पहिले सत्र रद्द होण्याची शक्यता

Archana Banage

अजिंक्य रहाणेने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस; केले ‘हे’ आवाहन

Tousif Mujawar

मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य

Patil_p

माजी फुटबॉलपटू सईद हकीम यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p

रेऑनिकची ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार

Patil_p

विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिराग यांना कांस्य

Patil_p