Tarun Bharat

स्पोर्ट्स mania

फ्रान्सचा नवा ‘सुपरस्टार’ !

फ्रान्सच्या कीलियन एम्बापेकडे पाहिलं जातंय ते पोर्तुगालचा रोनाल्डो नि अर्जेन्टिनाचा मेस्सी यांचा वारसदार ठरण्याची क्षमता ठासून भरलेल्या खेळाडूंपैकी एक या नजरेतून…अन् ती तुलना किती सार्थ आहे ते त्यानं विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या वाटचालीतून पुरेपूर सिद्ध केलंय…

‘त्याच्या’जवळ आहे क्रिस्तियान रोनाल्डोची अचूकता, लायोनेल मेस्सीची दूरदृष्टी आणि ब्राझीलच्या ‘ओरिजिनल’ रोनाल्डोचा वेग व शक्ती…मेस्सी नि रोनाल्डो यांची ही शेवटची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा असल्यानं फ्रान्स अन् ‘पॅरिस सेंट जर्मेन’च्या (पीएसजी) ‘त्या’ ‘स्ट्रायकर’नं भविष्यातील ‘सुपरस्टार’ कोण ठरणार हे स्पष्टरीत्या कतारमध्ये दाखवून दिलंय…‘त्यानं’ 24 वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच विश्वचषकात 9 गोलांची नोंद केलीय आणि असा मान मिळविणारा ‘तो’ इतिहासातील पहिलावहिला फुटबॉलपटू…सध्या 23 वर्षं 350 दिवस पूर्ण केलेला ‘तो’ अफलातून ‘फॉरवर्ड’ ‘गोल्डन बूट’च्या दिशेनं झपाटय़ानं धावतोय…नाव ः कीलियन एम्बापे…

एम्बापेनं पोलंडच्या अव्वल गोलरक्षकाला सुद्धा अजिबात संधी न देता 74 व्या नि 90 व्या मिनिटाला अक्षरशः तुफानी गतीनं हाणलेले दोन गोल त्याच्या दर्जाची साक्ष ओरडून देत होते. मग फ्रान्सचे प्रशिक्षक देशाँ म्हणाले की, कीलियनकडे क्षमता आहे ती क्षणार्धात संपूर्ण सामन्याचा निकाल बदलण्याची, तर पोलंडचा इंग्लंडच्या ‘ऍस्टन व्हिला’चं प्रतिनिधीत्व करणारा बचावपटू मॅटी कॅशनं सांगितलं, ‘त्याचं ‘फिनिशिंग’ विश्वास न बसण्यासारखंच’…याआधीच विश्वचषक, ‘युएफा नेशन्स लीग’चा किताब यांच्यासह ‘लीग वन’ची पाच विजेतेपदं आणि तीन वेळा ‘कूप डी फ्रान्स’ जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचललेला एम्बापे हा निर्विवादपणे सध्याचा भूतलावरील सर्वांत जास्त चर्चेत असलेला तरुण फुटबॉलपटू…

एम्बापेचे वडील मूळचे कॅमेरूनचे, तर आई अल्जेरियाची. 2015 मध्ये ‘मोनेको’च्या द्वितीय संघात सामील होण्यापूर्वी त्यानं कनिष्ठ कारकिर्दीची सुरुवात केली ती त्याचे वडील प्रशिक्षक असलेल्या ‘एएस बाँडी’ संघातून. तथापि, त्याचं कौशल्य आणि परिपक्वता पाहून त्याला तीन आठवडय़ांतच वरिष्ठ संघात बढती मिळाली…मग तिएरी ऑन्रीचा विक्रम मोडून तो बनला क्लबचा इतिहासातील गोल करणारा सर्वांत तरुण खेळाडू…कीलियाननं क्लबला ‘चॅम्पियन्स लीग’च्या उपांत्य फेरीत पोहोचण्यास तसंच 17 वर्षांत त्यांचं पहिलं ‘लीग वन’ विजेतेपद पटकावण्यास मदत केली. त्यावर्षी त्याला ‘सर्वोत्तम युवा खेळाड’tचा पुरस्कार प्राप्त झाला…

कीलियन एम्बापे या नावानं जगाला प्रभावित करण्यास सुरुवात झाली होती…युरोपियन क्लबांद्वारे मागणी येऊ लागलेला हा खेळाडू 2017 च्या हंगामाच्या अखेरीसपर्यंत ‘मोनेको’सोबत राहिला आणि ‘युएफा’च्या नियमांच्या चौकटीत राहण्यासाठी ‘पॅरिस सेंट जर्मेन’नं ऑगस्ट, 2017 मध्ये 18 वर्षांच्या एम्बापेला एका वर्षाच्या ‘लोन’वर उचललं. त्याच्या पुढील हंगामात ‘पीएसजी’नं त्याला कायमस्वरूपी आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं…

प्रेंच क्लब ‘पॅरिस सेंट-जर्मेन’मध्ये सामील झाल्यापासून कीलियन एम्बापेनं त्याच्या खेळाला एका नवीन उंचीवर नेलंय…अलीकडच त्यानं ‘युएफा चॅम्पियन्स लीग’मध्ये ‘पीएसजी’तर्फे आपला 31 वा गोल नोंदविला. त्यासरशी उरुग्वेच्या दिग्गज खेळाडू एडिनसन कावानीला मागं टाकून तो बनला या स्पर्धेतील त्यांचा आजवरचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू…अन् आता क्लबचा सर्वकालीन सर्वांत जास्त गोल करणारा खेळाडू ठरण्याच्या दिशेनं त्याचा वेगानं प्रवास चाललाय…

एम्बापेनं सलग चार हंगामांत ‘लीग वन’मधील ‘गोल स्कोअरर’च्या यादीत आघाडीचं स्थान सोडलेलं नाहीये. यावेळी देखील त्याचीच पुनरावृत्ती घडवून फ्रान्समधील त्या पहिल्या ‘डिव्हिजन’मध्ये सर्वाधिक वेळा ‘गोल्डन बूट’ पटकावण्याच्या विक्रमाशी त्यानं बरोबरी केल्यास नवल नव्हे…तो दाखल झाल्यापासून ‘पॅरिस सेंट जर्मेन’नं अनेक किताब जिंकण्याबरोबर 2020 मध्ये प्रथमच ‘युएफा चॅम्पियन्स लीग फायनल’मध्ये धडक मारली…

मार्च, 2017 मध्ये फ्रान्सच्या वरिष्ठ संघात वर्णी लागलेला कीलियन एम्बापे हा अशी संधी मिळालेला विस्नीस्कीनंतरचा दुसरा सर्वांत तरुण खेळाडू बनला त्यावेळी तो 18 वर्षे, 3 महिने नि 5 दिवस वयाचा…2018 मधील विश्वचषक पात्रता सामन्यात  नेदरलँडविरुद्ध त्यानं आपला वरिष्ठ स्तरावरील पहिला आंतरराष्ट्रीय गोल नोंदविला…2018 हे एमबाप्पेचं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सुवर्ण वर्ष. त्यानं रशियातील फ्रान्सच्या विश्वचषक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना चार गोल केले आणि त्या सर्वोच्च स्पर्धेतील एका सामन्यात दोन गोल करणारा तसंच अंतिम लढतीत गोल नोंदविणारा महान पेलेनंतरचा तो दुसरा किशोरवयीन खेळाडू बनला. ही कामगिरी त्याला विश्वचषकातील ‘फिफा सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू’सह ‘प्रेंच प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कारही देऊन गेली…

त्यानंतर ‘युरो 2020’ची मोहीम एम्बापेसाठी एक दुःस्वप्नच राहिली. कारण तो चार लढतींत एकही गोल करू शकला नाही आणि महत्त्वाची पेनल्टी देखील त्यानं चुकविली. मात्र त्या वर्षीची ‘युएफा नेशन्स लीग’ जिंकण्यास मदत करून त्यानं काही प्रमाणात कसर भरून काढली. पण पुढच्या वर्षी त्याच स्पर्धेतून गट स्तरावरच बाहेर पडण्याचा प्रसंग फ्रान्सवर ओढवला…असं असलं, तरी कीलियन एम्बापेकडून ज्या अपेक्षा आहेत त्यांना तो कतारमध्ये आतापर्यंत पुरेपूर जागत आलाय !

संघसामनेगोल
पॅरिस सेंट-जर्मेन236190
एएस मोनेको6027
फ्रान्स6333
एकूण359250

लहान वयातच भरारी…

  • ‘प्री-क्वॉर्टरफायनल’ स्तरावर सलग दोन विश्वचषक स्पर्धांत एका सामन्यात प्रत्येकी दोन गोलांची नोंद एम्बापेनं केलीय. यापूर्वी 2018 मध्ये त्यानं अर्जेन्टिनाविरुद्ध याच पायरीवर नोंदवले होते दोन गोल…
  • त्यासरशी एम्बापेनं वयाची चोविशी ओलांडण्यापूर्वी सर्वाधिक गोल नोंदविण्याचा पेलेचा विश्वचषकातील प्रदीर्घ काळ टिकलेला विक्रम (7 गोल) मोडला…
  • विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱयांच्या यादीत त्यानं दिएगो माराडोना आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांनाही मागं टाकलंय. तो आता 9 गोलांसह लायोनेल मेस्सीच्या पंक्तीत जाऊन बसलाय…

कमाईतही उच्चांक…

  • कीलियन एम्बापे हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू ठरलाय. ‘फोर्ब्स’नुसार, मेस्सी किंवा रोनाल्डो सोडून अन्य एखादं नाव या यादीत अव्वल स्थानावर येण्याची मागील आठ वर्षांतील ही पहिली खेप…2022-23 मोसमात एजंट्सच्या शुल्काची कपात करण्यापूर्वी त्याची कमाई 128 दशलक्ष डॉलर्स राहील असा अंदाज असून हा सदर क्रमवारीतील एक उच्चांक…
  • 2017 साली वयाच्या 18 व्या वर्षी ‘पॅरिस सेंट-जर्मेन’कडे 180 दशलक्ष युरोंच्या बदल्यात स्थायी ‘ट्रान्सफर’ करार करून तो सहकारी नेमारनंतरचा दुसरा सर्वांत महागडा खेळाडू अन् सर्वांत महाग किशोरवयीन खेळाडू बनला होता…यंदा कीलियननं ‘पीएसजी’बरोबरचा 2025 पर्यंत वाढविलेला करार त्याला विश्वातील सर्वांत महाग खेळाडू बनवून गेलाय…

तंदुरुस्ती राखणारा आहार…

  • आपला खासगीपणा चांगलाच जपणारा एम्बापे उठून दिसतोय तो वेग, चपळता याबरोबर जबरदस्त शरीरयष्टी नि तंदुरुस्तीसाठीही…तो दिवसाची सुरुवात ‘ड्रील्स’नं करतो. तंदुरुस्त, मजबूत राहण्यासाठी त्याच्याकडून केली जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ‘वेट ट्रेनिंग’…
  • रोनाल्डोप्रमाणंच एम्बापे दिवसाला सहा ‘मिल्स’ घेतो व निर्धारित आहारापासून ढळण्याचा मोह त्याला पडत नाही. त्याच्या जेवणात मुख्यतः कार्बोहायड्रेट्स व प्रथिने असतात. याव्यतिरिक्त फ्रान्सच्या बेंझेमाप्रमाणं तो मांस कमीत कमी खातो…
  • त्याच्या नाश्त्यात समावेश असतो तो अवाकडू वा बदाम बटरसह उकडलेली अंडी, लापशी यांचा. मग प्रोटिन बाररूपी स्नॅक…दुपारच्या जेवणात चिकन किंवा टय़ुना रॅप, कोशिंबीर…संध्याकाळच्या फराळात प्रोटिन शेक, फळे किंवा सुका मेवा, तर रात्रीच्या जेवणात चिकन अथवा मासे, ब्राऊन राईस, भाज्या. त्यानंतर पुन्हा शेक…

– राजू प्रभू

खेळ जुनाच, ओळख नवी : हर्डल्स…

अडथळय़ांची शर्यत म्हणजेच ‘हर्डल्स’ हा ‘ट्रक अँड फिल्ड’ स्पर्धांचा एक महत्त्वाचा भाग. यामध्ये धावपटू अडथळ्यांची मालिका पार करून शर्यत पूर्ण करतो…

सदर अडथळे एका निश्चित अंतरावर ठेवले जातात. धावपटूंनी संपूर्ण शर्यतीत त्यांच्या संबंधित ‘लेन’मध्येच राहणे आवश्यक असते. जरी वरून उडी मारून धावताना अडथळे पडले, तरी ते चालते. परंतु जो धावपटू अडथळय़ाच्या बाजूने पाय काढतो किंवा हाताने अडथळा पाडतो तो अपात्र ठरविला जातो…

पुरुषांसाठी 110 मीटर्स, महिलांसाठी 100 मीटर्स आणि पुरुष नि महिला या दोन्ही गटांसाठी 400 मीटर्स या सुप्रसिद्ध ‘हर्डल्स शर्यती’. त्या उन्हाळी ऑलिंपिक व जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत होतात. ‘स्प्रिंट इनडोअर हर्डल्स रेस’ ही पुरुष आणि महिलांसाठी 60 मीटर्सची असते…

पुरुषांच्या 110 मीटर्स, महिलांच्या 100 मीटर्स व दोन्ही गटांच्या 400 मीटर्स शर्यतीत 10 उंच अडथळे असतात.

महिलांसाठीच्या 100 मीटर हर्डल्स शर्यतीत प्रत्येकी 2 फूट 9 इंच उंचीच्या अडथळ्यांचा समावेश असतो. पहिला अडथळा सुरुवातीपासून 13 मीटर्सवर आणि त्यानंतरच्या अडथळ्यांमधील अंतर 8.5 मीटर्स असते. शेवटचा अडथळा सीमेपासून 10.5 मीटर्सवर…

पुरुषांसाठीच्या 110 मीटर हर्डल्स शर्यतीत प्रत्येकी 3 फूट 6 इंच उंचीच्या अडथळ्यांचा समावेश राहतो. पहिला अडथळा सुरुवातीपासून 13.72 मीटर्स अंतरावर आणि त्यानंतरच्या अडथळ्यांमधील अंतर 9.14 मीटर्स, तर शेवटचा अडथळा सीमेपासून 14.02 मीटर्सवर…

पुरुष नि महिलांसाठीच्या 400 मीटर हर्डल्स शर्यतीत समान अंतरावर ठेवलेले अडथळे असतात. पुरुष गटातील अडथळे प्रत्येकी 36 इंच, तर महिलांच्या गटातील अडथळे 30 इंच उंचीचे असतात…

Related Stories

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा भारत दौरा

Patil_p

झेकच्या क्विटोव्हाची स्पर्धेतून माघार

Patil_p

बोपण्णा-मिडलकुपची विजयी सलामी

Amit Kulkarni

स्टीपलचेसमधील केनियन वर्चस्व संपुष्टात

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये भारत 24 व्या स्थानावर

datta jadhav

डब्ल्यूटीसी फायनलसाठी नेतृत्व विल्यम्सनकडेच

Patil_p