Tarun Bharat

स्पोर्ट्स MANIA

Advertisements

रॉजर फेडरर परिकथेतील राजकुमारा…

@ 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा, 5 हंगामात अव्वलस्थान काबीज करणारा आणि टेनिसला ग्लोबल स्टारडम मिळवून देणारा रॉजर फेडरर वयाच्या 41 व्या वर्षी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होतो आहे. नितांतसुंदर सर्व्हिस, लाजवाब फूटवर्क, अप्रतिम फोरहँड व एकहाती व्हिपलॅश बॅकहँडच्या फटक्यांनी आपली खेळी सजवणारा फेडरर रॉड लेव्हर चषक स्पर्धेनंतर पुन्हा कोर्टवर दिसणार नाही. पण, तरीही एखाद्या परिकथेतील राजकुमाराला साजेशी त्याची कारकीर्द युवा पिढीसह अवघ्या क्रीडा वर्तुळासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत राहील.

2004 ते 2009 हा फेडररचा सुवर्णकाळ. या कालावधीत त्याने 24 पैकी 14 ग्रँडस्लॅम जिंकले, 6 वेळा फायनलपर्यंत पोहोचला तर तीनवेळा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. फक्त एकदाच त्याचे आव्हान तिसऱया फेरीत संपुष्टात आले. आपल्या एकंदरीत कारकिर्दीत त्याने 8 वेळा विम्बल्डन, 6 वेळा ऑस्ट्रेलियन, 5 वेळा अमेरिकन तर एकदा प्रेंच ग्रँडस्लॅमवर आपली मोहोर उमटवली.

1998 मध्ये एटीपी पदार्पण करणाऱया फेडररने सप्टेंबर 1999 पर्यंत पहिल्या 100 मध्ये धडक मारली. त्यानंतरही त्याचा धडाका अव्याहतपणे सुरु राहिला. त्याने 2003 मध्ये विम्बल्डनच्या रुपाने पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. एकेरीत 1251 विजय, 275 पराभव व 103 एटीपी टायटल्स ही त्याची कामगिरी खूप काही सांगून जाणारी.

रॉजरचे वडील स्विस-जर्मन तर त्याची आई दक्षिण आफ्रिकेची. त्यामुळे, फेडररकडे स्विस व द. आफ्रिकन असे दोन पासपोर्ट आहेत. स्विस जर्मन, स्टँडर्ड जर्मन, इंग्लिश, प्रेंच यासह फंक्शनल इटालियन व स्विडीश भाषेत त्याला अस्सल्खित बोलता येते. स्विस इनडोअर स्पर्धेत 1992 व 1993 मध्ये त्याने बॉलबॉय म्हणून काम केले आणि इथूनच तो टेनिसशी जोडला गेला.

ऑगस्ट 2022 मध्ये तो सर्वोच्च कमाई करणारा टेनिसपटू बनला. त्याची एकत्रित कमाई 90 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 718 कोटी रुपयांच्या आसपास राहिली. ही कमाई एजंटचे मानधन व कर वगळून आहे. जाहिराती, व्यवसाय व काही कार्यक्रमात सहभागी होऊन त्याने सदर उत्पन्न मिळवले.

2016 नंतर विविध दुखापती, शस्त्रक्रिया यामुळे तो काहीसा मागे टाकला गेला आणि तेथूनच निवृत्तीचे विचार त्याच्या मनात घर करुन राहिले. आजच्या घडीला नदाल व जोकोविच त्याच दमाने खेळत असताना फेडरर निवृत्तीच्या पडद्याआड जातो आहे. पण, यादरम्यान त्याने खेळाला मिळवून दिलेला ग्लोबल स्टारडम हेच त्याच्या कारकिर्दीचे खरेखुरे, निर्भेळ यश!

20 वर्षांपासून फेडररचा सामन्यापूर्वी एकच डाएट, पास्ता वुईथ लाईट सॉस!

प्रत्येक खेळाडूचे काही ना काही प्री-मॅच रुटीन असते, या प्री-मॅच रुटीनशिवाय खेळाडूंना सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे, असे वाटत नाही आणि फेडरर देखील त्याला अपवाद नाही. फेडररने 20 वर्षांपासून स्वतःला अशीच एक सवय लावली आहे, ती म्हणजे सामन्यापूर्वी तो पास्ता वुइथ लाईट सॉस असा डाएट घेतो आणि हे रुटिन त्याने कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यापर्यंत जैसे थे राखले आहे! सामन्याला दोन तासांचा अवधी असताना फेडरर पास्ता वुईथ लाईट सॉस खातो.

टेनिसपटू सामन्यादरम्यान फक्त केळीच का खातात?

टेनिसचा सामना कोणताही असो. टेनिसपटू आपल्या ब्रेकदरम्यान एखाद-दुसरे केळे खाताना दिसून येतात आणि म्हणूनच प्रश्न निर्माण होतो, सामन्यादरम्यान ते फक्त केळीच का खातात? याचे कारण असे आहे की, कोर्टवर एक्स्ट्रा एनर्जी मिळण्यासाठी केळी हाच क्विक सोर्स ठरतो आणि त्या दृष्टीने केळी खाण्याकडे टेनिसपटूंचा कल असतो.

असे असते फेडररचे डाएट

 • ब्रेकफास्ट : होममेड वॅफल्स वुईथ प्रूट कम्पोट, ऑरेंज ज्यूस, कप ऑफ कॉफी, शॉट ऑफ ऍपल सायडर व्हिनेगर.
 • स्नॅक : प्रोटीन बार्स, अनसॉल्टेड नट्स.
 • लंच : बाऊल ऑफ पास्ता वुईथ चिकन स्ट्रीप्स, प्रेश लिफी ग्रीन सॅलड.
 • स्नॅक : बनाना, प्रेश बेरीज, प्रोटीन शेक.
 • डिनर : मीट किंवा फिश मेन कोर्स, हिरव्या भाज्या, आईस्क्रीम.

असे आहे फेडररचे ट्रेनिंग शेडय़ूल

टेनिस बॉल ताकदीने फटकावता यावा, यासाठी शरीर मजबूत तर हवेच. पण, त्याचवेळी वजन वाढू नये, हे देखील तितकेच महत्त्वाचे! अशीच तारेची कसरत टेनिसपटूंना करावी लागते. हा समतोल साधण्यासाठी फेडरर आपले प्रशिक्षक पिएरे यांच्यासमवेत आपला वर्कआऊट आखत आला आहे.

टेनिस कोर्टवर फोरहँड व बॅकहँड फटक्यांवर वरचष्मा गाजवणारा फेडरर आपल्या फटक्यांवर मेहनत घेतो, हे साहजिकच. पण, वर्कआऊटमध्ये देखील तो फारसा मागे नाही. जॉगिंग स्टेप्स, जम्परोपपासून साईडलाईन स्प्रिन्ट, बट किक्सपर्यंत ओल्ड फॅशन्ड वार्मअप रुटीनवर त्याचा भर असतो. या वॉर्मअपनंतर तो फुल बॉडी स्ट्रेचिंग रुटिन सुरु करतो. मेडिसिन बॉल लंग्ज, मेडिसिन बॉल शफल स्टेप्स व रेझिस्टन्स बँड वर्कआऊट्सच्या माध्यमातून तो स्ट्रेंथ वर्कआऊट रुटिन पूर्ण करतो.

कोर्टवर वेगवान खेळ साकारण्यासाठी वेग सर्वाधिक महत्त्वाचा आणि यासाठी तो कोन ड्रिल्स व रॅकेट ड्रिल्सचा सराव करतो. त्यानंतर त्याच्या हाय इन्टेन्सिटी इटर्व्हल ट्रेनिंगला सुरुवात होते. पूशअप्स, स्क्वॅट्स, स्क्वॅट जम्पिंग जॅक्स, लेग रेजिस, ऍब क्रन्चेस, जम्प रोप, लेटरल रेजिस व चिन-अप्स या एक्सरसायजेसनी त्याच्या ट्रेनिंगची सांगता होते.

फेडरर पोस्ट तिकीटावर आणि नाण्यावर सुद्धा!

ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड या ठिकाणी पोस्ट तिकीटावर फेडररचे छायाचित्र समाविष्ट केले गेले आहे. जुलै 2021 मध्ये बीबीसीने फेडररचा महान खेळाडू म्हणून गौरव केला. इतकेच नव्हे तर 20 स्विस प्रँक नाण्याच्या एका बाजूला देखील फेडररचे छायाचित्र मुद्रित करण्यात आले आहे.

जोकोविच-नदालविरुद्ध खेळले 90 सामने

फेडररने 22 ग्रँडस्लॅम जिंकणाऱया नदालविरुद्ध 40 सामने खेळले असून यात 16 विजय व 24 पराभव अशी त्याची कामगिरी राहिली. याशिवाय, जोकोविचविरुद्ध खेळलेल्या 90 सामन्यात त्याची कामगिरी विजय, 27 पराभव अशी राहिली आहे. 2012 ते 2021 या कालावधीत फोर्ब्सच्या पहिल्या 10 श्रीमंत खेळाडूंमध्ये फेडररचा समावेश राहिला. फक्त 2020 मधील त्याची कमाई तब्बल 848 कोटी इतकी होती.

‘बिग थ्री’मधील एक खांब निखळला…

रॉजर फेडरर, राफेल नदाल व जोकोविच या त्रिकुटाने अवघ्या जागतिक टेनिसवर साम्राज्य गाजवले. ग्रँडस्लॅमसह अनेक प्रतिष्ठेची जेतेपदे याच त्रिकुटात राहायची आणि यामुळे या तिघांना बिग थ्री असे संबोधले जाऊ लागले. एकवेळ तर या तिघांमध्ये प्रचंड चुरस रंगत राहिली. अलीकडील काही वर्षात मात्र फेडररच्या कामगिरीला ओहोटी लागली आणि तो नदाल-जोकोविचच्या तुलनेत मागे पडत गेला. आपले शरीर साथ देत नाही, हे लक्षात येताच त्याने टेनिस वर्तुळातून लवकरच बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आणि बिग थ्रीमधील एक महत्त्वाचा खांब निखळला…

दृष्टिक्षेपात फेडरर

 • पूर्ण नाव : रॉजर रॉबर्ट फेडरर
 • जन्म तारीख : 8 ऑगस्ट 1981
 • जन्म ठिकाण : बॅसेल, स्वित्झर्लंड
 • उंची : 6 फुट 1 इंच
 • सर्वोच्च मानांकन : 1 (2 फेब्रुवारी 2004)

ग्रँडस्लॅम विजेतेपदे

 • ऑस्ट्रेलियन ओपन : 2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018.
 • प्रेंच ओपन : 2009
 • विम्बल्डन : 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017.
 • अमेरिकन ओपन : 2004, 2005, 2006, 2007, 2008.

खेळ जुनाच, ओळख नवी! गोळाफेक

ऍथलेटिक्समध्ये ताकद पणाला लागते, असा आणखी एक इव्हेंट म्हणजे गोळाफेक. या इव्हेंटमध्ये महिला गटातील गोळय़ाचे वजन 4 किलो तर पुरुष गटातील गोळय़ाचे वजन 7.26 किलोग्रॅम असते. स्वतःभोवतीच अर्धी किंवा दीड गिरकी घेऊन शक्य तितके लांब गोळाफेक करण्यात कौशल्य कमालीचे पणाला लागते! आज थोडेसे याच खेळाविषयी…

गोळाफेकीत वापरला जाणारा गोळा प्रामुख्याने ब्रास किंवा लोखंड यापासून तयार केला जातो.

महिला गटातील गोळय़ाचे वजन : 4 किलोग्रॅम

पुरुष गटातील गोळय़ाचे वजन : 7.26 किलोग्रॅम

लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णजेता ऍथलिट तोमास्ज मॅजेव्स्की (पोलंड)

उच्च स्तरीय स्पर्धेत गोळाफेकीसाठी दोन स्वतंत्र स्टाईल विकसित झाले आहेत.

सर्कल : 2.135 मीटर्स वाईड

ग्लाईड : थ्रोअर ऍथलिट रियर ऑफ सर्कलला हाफ टर्न घेतो आणि वेगाने गोळाफेक करतो.

स्पिन : थ्रोअर ऍथलिट दीड वर्तुळ टर्न घेतो आणि वेगाने गोळाफेक करतो.

टो बोर्ड : 10 सेंटीमीटर्स उंच

28 वर्षांपासून स्केटिंग प्रशिक्षणाचा वसा जपणारे सूर्यकांत हिंडलगेकर

स्केटिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत युवा पिढीला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे मिशन घेऊन अहोरात्र झटणारे बेळगावचे दिग्गज स्केटिंग प्रशिक्षक म्हणजे सूर्यकांत हिंडलगेकर! बेळगावसह हुबळी, धारवाड, बैलहोंगल, निपाणी, संकेश्वर, गोकाक आदी विविध ठिकाणी ते प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिले असून स्केटिंग रुजवण्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली आहे. एकापेक्षा एक सरस, असे हजारो स्केटिंगपटू घडवण्याचा हा वसा जपत असतानाच भविष्यात आणखी महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्याचा मानस त्यांच्यासमोर आहे.

मूळचे चव्हाट गल्ली व सध्या खासबाग येथे राहणारे सूर्यकांत हिंडलगेकर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंगपटू घडवण्यात, हा खेळ इकडे रुजवण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. सूर्यकांत यांनी कोल्हापुरातील वि. स. खांडेकर प्रशालेच्या आवारात जवळपास 6 वर्षे स्केटिंग प्रशिक्षण दिले असून त्यानंतर बेळगावात त्यांनी स्केटिंग प्रशिक्षणाचा वसा अव्याहतपणे जपला. शिस्त, समर्पण, कठोर मेहनतीच्या बळावर त्यांनी असंख्य स्केटिंगपटू घडवले. त्यांचे प्रशिक्षण लाभलेले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्यात यशस्वी ठरले आहेत. शिवाय, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे मानकरी देखील ठरले आहेत.

सुदृढ शरीरसंपदा हे ध्येय नजरेसमोर ठेवत ते आपल्या विद्यार्थ्यांना, युवा खेळाडूंना आदर्श जीवनशैलीवर भर देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे स्केटिंगपटू घडवण्याबरोबरच विविध स्केटिंग रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करत असताना त्यांनी स्वतः 58 वेळा रक्तदान केले आहे.

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या माध्यमातून व प्रशिक्षणाच्या माध्यमातून जोडले गेलेले स्केटिंगपटू, पालक, सहकारी व हितचिंतक या सर्वांचा आजवरच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात. सूर्यकांत यांचे प्रशिक्षण लाभलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रोहन कोकणे याला लिम्बो स्केटिंगची प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी जर्मनी, चीन, हाँगकाँग येथे निमंत्रित करण्यात आले होते. प्रशिक्षक या नात्याने सीबीएसई नॅशनल पदकविजेते, केव्ही झोनल पदकविजेते, कर्नाटक राज्यस्तरीय पदकजेते, ऑल इंडिया रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप विजेते, नॅशनल इनलाईन हॉकी पदकजेते संघ घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

अन् म्हणूनच सूर्यकांत हिंडलगेकर स्केटिंग प्रशिक्षणाकडे वळले!

सूर्यकांत हिंडलगेकर स्केटिंगमधील 11 प्रकारात प्रशिक्षण देत आले असून यात स्पीड स्केटिंग, आर्टिस्टिक, रोलर हॉकी, इनलाईन हॉकी, इनलाईन फ्री स्टाईल, इनलाईन ऍल्पाईन, इनलाईन डाऊनहिल, रोलर डर्बी, रोलर फ्री स्टाईल, स्केट बोर्डिंग, स्कूटर याचा समावेश होतो. प्रशिक्षणासाठी, कारकिर्दीसाठी स्केटिंगच का निवडले, यावर ते म्हणतात, ‘कोल्हापुरात असताना सुहास कारेकर या मित्रामुळे मला स्केटिंगची आवड निर्माण झाली. पहिली 6 वर्षे एक खेळाडू या नात्याने घडण्यावर भर होता. पुढे, स्वतः घडल्यानंतर त्यात दुसऱयांनाही घडवावे, हा उदात्त विचार मनात आला आणि मी त्याक्षणी स्केटिंग प्रशिक्षणाकडे वळलो’!

स्केटिंगमुळे उघडले जगाचे दरवाजे!

मागील 28 वर्षांच्या प्रशिक्षण कारकिर्दीत सूर्यकांत हिंडलगेकर यांनी विविध राष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून सारा देश पिंजून काढला. चंदिगढ, विशाखापट्टणम, नोएडा, बेंगळूर, फरिदाबादसारख्या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी आपले संघ उतरवले. याशिवाय, विविध भूमिका पार पाडल्या. प्रशिक्षक म्हणून त्यांनी जर्मनी व हाँगकाँग दौरा केला. शिवाय, त्यांच्या तालमीत घडलेल्या स्केटिंगपटूंनी आजवर इस्तंबूल, तुर्की, ब्राझील, अर्जेन्टिना, नेपाळ, पोर्तुगाल, इटली, जर्मनी, हाँगकाँग आदी देशांचा दौरा केला आहे. सूर्यकांत हिंडलगेकर सकाळी 6 ते 9 या वेळेत व सायंकाळी 4.30 ते रात्री 9 या वेळेत गोवावेस स्केटिंग रिंकवर स्केटिंगचे धडे देतात.

Related Stories

ओसाकाचे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद

Patil_p

सचिनचा पुन्हा मदतीचा हात

Patil_p

जोकोव्हिच- सिटसिपेस अंतिम लढत

Patil_p

रोहितने ‘इंडिया क्रिकेटर’चे संबोधन का हटवले?

Omkar B

राजस्थान रॉयल्सला दिलासा त्या महागडय़ा खेळाडूचा सराव सुरू

Patil_p

नव्याने प्रारंभासाठी चेन्नई, लखनौ महत्त्वाकांक्षी

Patil_p
error: Content is protected !!