Tarun Bharat

स्फोटाचे कारस्थान ‘जैश उल हिंद’चे

संघटनेने स्विकारली जबाबदारी- संशयितांचा शोध घेण्यासाठी यंत्रणांकडून तपासाला गती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्लीतील इस्त्रायली दुतावास परिसरात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटामागे ‘जैश-उल-हिंद’ या संघटनेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याबद्दल तपासाने गती घेतली असली तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सोशल मीडियातील चॅटमधून काही धागेदोरे हाती लागले असून तपास यंत्रणांकडून शहानिशा केली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी सापडलेल्या लिफाफ्यातील मजकुरावरूनही सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता सदर हल्ला दहशतवाद्यांनीच केला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

इस्त्रायली दुतावासाजवळ झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून हा स्फोट म्हणजे काही मोठय़ा कटाची चाचणी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज, अर्धा जळालेल्या गुलाबी रंगाचा स्कार्फ आणि इस्त्रायल राजदूताला उद्देशून लिहिलेला लिफाफा मिळाला आहे. घटनास्थळापासून 12 यार्ड अंतरावर लिफाफा सापडला आहे. घटनास्थळाजवळ पार्क केलेल्या अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा खराब झाल्या आहेत. त्यावरुनही पोलिसांनी स्फोटाचे सँपल गोळा केले असून त्याचे पृथक्करण करण्याचे काम फॉरेन्सिक टीम करीत आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांना सोशल मीडियामधील संवादातून या स्फोटाचे धागेदोरे सापडले आहेत. त्यानुसार ‘जैश-उल-हिंद’ने दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या चॅटमध्ये दहशतवादी संघटना हल्ल्यावर अभिमान व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, यंत्रणांकडून ‘जैश-उल-हिंद’कडून करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केली जात आहे. तसेच आता प्रत्यक्ष घटनास्थळावरून प्राप्त झालेल्या साक्षी-पुराव्यांच्या आधारेही तपास केला जात आहे. शनिवारी परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱयांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक टॅक्सी दिसून आली आहे. या टॅक्सीमधून दोघेजण या परिसरात उतरल्याचे दिसून आले आहे. त्यांना उतरल्यानंतर टॅक्सी तेथून निघून जाताच संशयित दोघे घटनास्थळाच्या ठिकाणी पायी चालत जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

संशयितांची रेखाचित्रे तयार

सीसीटीव्हीतील माहितीच्या अनुषंगाने स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून, दोन्ही व्यक्तींची रेखाचित्रे तयार केली आहेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना काही साहित्य मिळाले असून, त्यात एका बंद लिफाफ्याचाही समावेश आहे. लिफाफ्यातील चिठ्ठीत ‘हा तर फक्त टेलर आहे’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा हुतात्मा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. दोघांचीही गेल्या वषी हत्या करण्यात आली होती.

अमोनियम नायटेटचा स्फोटासाठी वापर

फॉरेन्सिक टीमने स्फोट झालेल्या परिसराची तपासणी केली आहे. या स्फोटासाठी अमोनियम नायटेटचा वापर झाल्याचा पुरावा मिळाला आहे. ज्या जागेवर हा स्फोट झाला. तेथे छोटा खड्डा पडला आहे. आरडीएक्सचा वापर झाला असता तर त्याचा परिणाम जास्त झाला असता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

इस्त्रायलच्या मोसाद यंत्रणेची तपासात मदत

इस्त्रायल दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे इराण कनेक्शन समोर आल्यानंतर स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. स्फोटानंतर पोलिसांकडून आता इराणी नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. त्याचसोबत सर्व हॉटेलांशी संपर्क साधून तिथे राहणाऱया इराणी नागरिकांबाबत चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, जगातील सर्वात ताकदवान गुप्तचर संस्था मोसाद या प्रकरणाच्या चौकशीत भारताला मदत करणार आहे. इस्त्रायलने सुरुवातीलाच हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला होता.

Related Stories

कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून सीएसआयआरच्या बैठकीत कौतुक

Archana Banage

टेलिग्राम चॅनेलवर हिंदू महिला टार्गेट

Patil_p

गेहलोत सरकारने जिंकला ‘विश्वासदर्शक ठराव’

Tousif Mujawar

‘वंदे भारत’ : मालदीवमधील 588 भारतीय मायदेशी

Tousif Mujawar

अलकनंदा नदीचे अलौकिक सौंदर्य

Patil_p

पंतप्रधान मोदी अन् जिनपिंग भेट लवकरच

Patil_p