कचऱयाची उचल करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष


प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करून प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. केएलई रुग्णालयसमोर कचराकुंड नसल्याने हॉटेलमधील व टपरीमधील कचरा स्मार्ट बसथांब्यावरील कचराकुंडीत टाकण्यात येत आहे. मात्र सदर कचऱयाची उचल करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच बसथांब्यांवर आसन व्यवस्था, ई-टायलेट, डिजीटल बोर्ड आणि कचरा टाकण्यासाठी कचराकुंड ठेवण्यात आले आहे. मात्र स्मार्ट बसथांब्यावरील कचराकुंडीत साचलेल्या कचऱयाची उचल करण्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्याने बसप्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केएलई रुग्णालय परिसरात विविध कँटीन व चहा टपरी असून परिसरात कचरा टाकण्यासाठी मनपाने कोणतीच सुविधा उपलब्ध केली नाही. त्यामुळे येथील कँटीन व चहा टपरीचालक स्मार्ट बसथांब्यांवरील कचराकुंडीत कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात कचराकुंड ठेवून कचऱयाची उचल वेळेत करणे आवश्यक आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच कचरा टाकण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्मार्ट बसथांब्यांवरील अस्वच्छतेमुळे प्रवाशांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.