काम पूर्ण होण्यास तब्बल पाच वर्षाहून अधिक कालावधी : मे अखेरपर्यंत पूर्ण होणार : लवकरच प्रवाशांसाठी खुले


प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकाच्या स्मार्ट बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी पाच वर्षांहून अधिक काळ लागला असला तरी संपूर्ण इमारतीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सर्वसामान्य प्रवाशांची स्मार्ट बसस्थानकातून प्रवास करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. आधुनिक बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करून बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी देखील प्रवाशांतून होत आहे.
स्मार्ट बसस्थानकाचा कोनशिला कार्यक्रम 2016 मध्ये झाला. मात्र प्रत्यक्षात कामाला 2017 मध्ये सुरुवात झाली. दरम्यान, बसस्थानकाचे काम एक वर्षात पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तब्बल पाच वर्षांनंतर बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बसस्थानकाला भेट देऊन काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या होत्या. मात्र अद्याप काम सुरूच आहे. मागील पाच वर्षांपासून काम संथगतीने सुरू असल्याने काम पूर्णत्वाकडे येण्यासाठी मोठा कालावधी लागला आहे.
तब्बल 30 कोटी रुपयांच्या निधीतून हे सुसज्ज बसस्थानक
तब्बल 30 कोटी रुपयांच्या निधीतून हे सुसज्ज बसस्थानक उभे करण्यात येत आहे. बसस्थानकाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत भागातील पेव्हर्स, फरशी, आसन व्यवस्था, बस फलक, आदी कामे देखील अंतिम टप्प्यात आली आहेत. बसस्थानकातील अंतर्गत भागात आसन व्यवस्था, विजेची, फिटिंग, कार्यालयाचे फर्निचर यासह विविध प्रकारच्या सुशोभीकरणाचे कामदेखील पूर्ण झाले आहे. तसेच इमारतीच्या दर्शनी बाजूच्या खिडक्मया व ग्रीलचे काम देखील पूर्ण झाले असून रंगरंगोटीचे काम शिल्लक आहे. गतवषी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन ते अडीच महिने काम ठप्प झाले होते. त्यानंतर सुरू झालेले कामदेखील संथगतीने झाल्याने काम पूर्ण होण्यास उशिर झाला आहे.
तात्पुरत्या बसस्थानकात असुविधा
या स्मार्ट बसस्थानकाच्या कामामुळे प्रवाशांसाठी तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी प्रवाशांना सोयीपेक्षा गैरसोयींचाच अधिक त्रास सहन करावा लागत आहे. तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या बसस्थानकात जागेअभावी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तातडीने नवीन स्मार्ट बसस्थानकाचे काम पूर्ण करून बसस्थानक प्रवाशांसाठी खुले करावे, अशी मागणी होत आहे. बसस्थानकात स्थानिक बससह लांब पल्ल्यांच्या हजारो बसची ये-जा सुरू असते. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांनी नेहमी गजबजलेले असते. मात्र तात्पुरत्या उभारलेल्या बसस्थानकात सुविधांपेक्षा प्रवाशांना असुविधांचाच सामना करावा लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात सीबीटी व मध्यवर्ती बसस्थानक जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भुयारी मार्गाचे काम देखील पूर्णत्वाकडे आले असून हा मार्ग लवकरच प्रवाशांना खुला केला जाणार आहे.