Tarun Bharat

स्मार्ट सिटीचा ड्रीम प्रोजेक्ट स्मार्ट कधी?

लोंबकळणाऱया विद्युत वाहिन्यांमुळे जीव धोक्यात : भूमिगत वाहिन्या घालूनही सुरू करण्यास विलंब : शहरात वीजवाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर

प्रतिनिधी / बेळगाव

शहराची निवड स्मार्ट सिटीमध्ये झाल्यानंतर शिवबसवनगर येथील केपीटीसीएल रोडवर ड्रीम प्रोजेक्ट उभारण्यात आला. स्मार्ट सिटीचा हा ड्रीम प्रोजेक्ट सध्या नागरिकांच्या जीवावर उठला आहे. वीजपुरवठा करणाऱया वाहिन्या लोंबकळत असून त्यांचा केव्हा शॉक लागेल, याची शाश्वती नाही. भूमिगत वीजवाहिन्या घातलेल्या असतानाही त्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नसल्याने खांबांवरूनच वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा ड्रीम प्रोजेक्ट फेल ठरला का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत केपीटीसीएल रोडचे व्हाईट टॅपिंग करण्यात आले. यामुळे रस्त्याची उंची तब्बल 3 ते 4 फुटांनी वाढविण्यात आली. या रस्त्याशेजारी भूमिगत केबल घालण्यात आल्या आहेत. तारांचे जंजाळ कमी होण्यासाठी हेस्कॉमने ट्रान्स्फॉर्मरपर्यंतच्या युजी केबल घातल्या आहेत. हे काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. अद्यापही या भागात विद्युत खांबांवरूनच वीजपुरवठा सुरू आहे.

रस्त्यांची उंची वाढल्यामुळे विद्युत वाहिन्या हातांना लागतील इतक्या उंचीवर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मोठी अवजड वाहने या ठिकाणी आल्यास त्यांना या विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आदेशाच्या प्रतीक्षेत

याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता, स्मार्ट सिटीकडून जोवर भूमिगत वीजवाहिन्या सुरू करण्याचा आदेश मिळत नाही तोवर विद्युत खांबांवरूनच वीजपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा हा ड्रीम प्रोजेक्ट फेल ठरत आहे का? असा प्रश्न रहिवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

रस्त्यांची उंची वाढल्याने समस्येत वाढ

शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत काँक्रीटचे रस्ते केले जात आहेत. यामुळे रस्त्यांच्या उंचीत वाढ झाली आहे. उंची वाढल्यामुळे शहरात सर्वत्रच वीजवाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यांची उंची वाढली तरी विद्युत खांब व वाहिन्या तेथेच असल्यामुळे विद्युत वाहिन्या व रस्त्यांमधील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे हे प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत.

Related Stories

बससेवेसाठी आंदोलन करून घरी परतणारी विद्यार्थिनी ठार

Amit Kulkarni

जत-जांबोटी रोडवरील खोकी हटाव मोहिमेला गती

Omkar B

‘त्या’ रस्त्याची जबाबदारी आता पंचायतराज विभागाकडे

Amit Kulkarni

शॉर्टसर्किटने फुलबाग गल्ली येथील घराला आग

Amit Kulkarni

बसथांब्याअभावी बेळगुंदी भागात जाणारे प्रवासी रस्त्यावर

Patil_p

नुकसान भरपाई द्यायची नाही तर घोषणा कशासाठी?

Patil_p