Tarun Bharat

स्मार्ट सिटीतील ट्रफिक सिग्नल पुन्हा बंद

विविध चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांची गैरसोय :  सिग्नल सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध चौकात ट्रफिक सिग्नल उभारण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेले ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते. मात्र, काही आठवडय़ातच सदर सिग्नल बंद पडले असून विविध चौकात वाहतूक कोंडीची पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर ट्रफिक सिग्नल शोभेसाठी बसविण्यात आले आहेत का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. विविध चौकात डिजिटल फलक आणि ट्रफिक सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. शहर-उपनगरांतील 16 चौकात ट्रफिक सिग्नलची उभारणी करण्यासाठी निधी खर्च करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही बसवून स्मार्ट सिटीच्या कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटरला जोडण्यात आले आहे. या अंतर्गत विविध चौकांतील ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते. पण काही दिवसांतच सर्व ट्रफिक सिग्नल बंद पडले असून विविध चौकात पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे आणि विकासाचे काम सुरू असल्याचे कारण सांगून ट्रफिक सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. पण शहरातील बहुतांश रस्त्यांचे काम पूर्ण झाले असताना ट्रफिक सिग्नल बंद ठेवण्याचे प्रयोजन काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

वाहनधारकांची गैरसोय

बसवेश्वर चौक, आरपीडी क्रॉस, डॉ. राजेंद्र प्रसाद चौक, राणी चन्नम्मा चौक, आरटीओ सर्कल व कॅम्प येथील ग्लोब थिएटरजवळील ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते. पण यापैकी केवळ राणी चन्नम्मा चौकातील ट्रफिक सिग्नल सध्या सुरू आहेत. अन्य ठिकाणचे ट्रफिक सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत.

त्यामुळे चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ट्रफिक सिग्नल बंद असल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण सदर रहदारी पोलीस वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी दंड वसुली करण्यातच मग्न असतात. परिणामी वाहनधारकांना ये-जा करताना अडचण भासत आहे. रहदारी पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, तसेच बंद ठेवण्यात आलेले ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

पाणीपातळी घटली, पाणी जपून वापरा

Omkar B

दसऱयासाठी बाजारात ऊसाची विक्री

Patil_p

मटका अड्डय़ावर धाड; 21 जणांना अटक

Tousif Mujawar

नूतन शैक्षणिक धोरण परिवर्तन घडविणारे

Amit Kulkarni

‘त्या’ 38 जणांवर कारवाईची टांगती तलवार

Patil_p

शहर-तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni