Tarun Bharat

स्मार्ट सिटीने बसविलेले 20 पैकी 10 सीसीटीव्ही बंद

स्मार्ट सिटी योजनेच्या कामकाजाचा बैठकीत आढावा

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील स्वच्छतेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच घरोघरी जाऊन कचऱयाची उचल होते का? याची माहिती घेण्यासाठी आरएफआयडी यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र 20 पैकी 10 सीसीटीव्ही आणि आरएफआयडी यंत्रणा बंद पडली असून, स्मार्ट सिटीचा उपक्रम अपयशी ठरला आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर येथे विविध विभागांची बैठक आयोजित करण्यात आली होती. स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी महापालिकेकडे सोपविण्यात आलेल्या आरएफआयडी यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेऱयांबाबतच्या विषयावर चर्चा झाली. बसविलेले 20 पैकी 10 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले. ठिकठिकाणी कचरा टाकला जातो. रस्त्याशेजारी व खुल्या जागांवर कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केली जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. पण सीसीटीव्ही कॅमेऱयांकरिता वापरलेले विजेचे बिल भरण्यात आले नसल्याने विजपुरवठा खंडित केला आहे. तसेच काही कॅमेरे नादुरुस्त असल्याने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर सीसीटीव्ही महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आल्याने महापालिकेनेच देखभाल करावी, अशी सूचना कार्यकारी संचालकांनी केली. 

तसेच घरोघरी जाऊन कचऱयाची उचल होते का? याची माहिती घेण्यासाठी प्रत्येक घरावर आरएफआयडी यंत्रणेअंतर्गत बारकोड बसविले आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचाऱयांकडे आरएफआयडी स्कॅनर मशीन दिली होती. पण सदर स्कॅनर वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेने स्कॅनर स्मार्ट सिटी कंपनीकडे हस्तांतर केले आहेत. परिणामी आरएफआयडी यंत्रणा कुचकामी बनली आहे. मात्र ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना स्मार्ट सिटीच्या कार्यकारी संचालकांनी महापालिकेच्या अधिकाऱयांना बैठकीवेळी केली. कचरा वाहनांच्या फेऱया आणि कोणत्या मार्गावर कचऱयाची उचल करीत आहे, याची माहिती घेण्यासाठी प्रत्येक कचरावाहू वाहनावर जीपीएस सुविधा बसविली आहे. 138 वाहनांपैकी 106 वाहनांवर ही यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरित 32 वाहनांवरील यंत्रणा बंद आहे. त्यामुळे बंद असलेली जीपीएस यंत्रणा बदलणे किंवा दुरुस्त करण्याची आवश्यकता असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱयांनी दिली. यावेळी स्मार्ट सिटीच्या विविध विकासकामांबाबत चर्चा करून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. यावेळी बैठकीला स्मार्ट सिटीचे अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

ज्येष्ट जलतरणपटूंचा जायंट्सतर्फे गौरव

Amit Kulkarni

त्यांना काळजी आपल्या चिमण्या-पाखरांची

Patil_p

आरटीओचे 2022-23 चे उद्दिष्ट जाहीर

Amit Kulkarni

नवीन बसपास प्रक्रिया ठप्पच

Amit Kulkarni

कर्नाटक सरकार बीसीयूमध्ये इंडो-फ्रेंच इन्स्टिट्यूट स्थापनेसाठी प्रयत्नशील

Abhijeet Khandekar

टिप्परने घेतला शाळकरी मुलाचा बळी

Patil_p