Tarun Bharat

स्मृतीसाठी सरकारला कायद्याची विस्मृती!

Advertisements

काँग्रेसचा हल्लाबोल आसगाव येथील बेकायदेशीर रेस्टॉरंटचे प्रकरण

प्रतिनिधी/ पणजी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येने आसगाव भागात स्थापन केलेल्या रेस्टॉरंटला बारचा परवाना देताना सरकाराने कायद्यालाच नशेच्या धुंदीत ठेऊन दाखविलेले औदार्य आता जगजाहीर झाले असून या प्रकारावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही शनिवारी पणजीत पत्रकार परिषद आयोजित करून भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच या प्रकाराची आता एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महिला बालविकास खात्याच्या मंत्री असलेल्या इराणी यांनी सरकारच्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या घोषवाक्याचा वेगळाच अर्थ काढताना स्वतःच्या ‘बेटी’ च्या ‘बचावा’साठी कायद्याला वाकुल्या दाखवण्यास सरकारी अधिकाऱयांना भाग पाडले. प्रसंगी ’मृत’ व्यक्तीलाही ‘जिवंत’ करून त्याच्या सहीने परवाना नूतनीकरणासाठी अर्जही केला आणि हवे तेवढे परवाने पदरी पाडून घेतले.

मूळ अर्जदार मुंबईस्थित

परंतु ‘अती तेथे माती’ या म्हणीचा प्रत्यय नुकताच त्यांनाही आला. सरकारच्या दोन खात्यांमधील प्रामाणिक अधिकाऱयांनी त्यांचे बिंग फोडले आणि एका पाठोपाठ एक करत सर्व कारनामे उघडकीस आले. त्यातील पहिले प्रकरण अंजुणे पोलीस निरीक्षकाच्या मदतीने म्हापसा उपविभागीय पोलीस कार्यालयाने उघडकीस आणले. त्यात बारच्या परवान्यासाठी अर्ज करणाऱया अँथनी डिगामा या व्यक्तीने स्थानिक असल्याचे भासविण्यासाठी भोवतावाडो आसगाव असा पत्ता दिला होता. प्रत्यक्षात मात्र ते विलेपार्ले मुंबई (पूर्व) येथील रहिवासी असल्याचे आधारकार्डवरून स्पष्ट झाले आहे.

मृत व्यक्ती झाली जिवंत

हे प्रकार एवढय़ावरच न थांबता सदर परवान्यासाठीच्या अर्जासोबत दिलेले घोषणापत्र नोटरीद्वारा अधिमान्य न करताच जोडल्याचे आढळून आले आहे. दरम्यानच्या काळात सदर अर्जदाराचे 17 मे 2021 रोजी निधन झाले. तरीही सुमारे 13 महिन्यांनंतर त्यांच्याच नावाने (दि. 22 जून 2022) नूतनीकरणासाठी अर्ज करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे अबकारी परवाना मिळविण्यासाठी एक मृत व्यक्ती पुन्हा जिवंत कशी होऊ शकते, असा सवाल पाटकर यांनी उपस्थित केला.

एरव्ही मुख्यमंत्री डॉ. सावंत सदैव ‘स्वयंपूर्ण गोवा’ चा मंत्र जपत असतात. त्याच भाजपचा घटक असलेल्या एका बडय़ा राष्ट्रीय नेत्याच्या कुटुंबातील सदस्य मात्र स्वतःच्या फायद्यासाठी येथील कला-संस्कृती, वारसा, पारंपरिक खाद्यपदार्थ यांना बाजूला सारून आंतरराष्ट्रीय पाककृतीला प्रोत्साहन देण्याची वक्तव्ये करत आहेत. यावरून गोव्यात येणारे पर्यटक स्थानिक संस्कृती, वारसा पाहण्यासाठी येतात, येथील पाककृती खाण्यास येतात की आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ खाण्यास येतात, असे सवाल पाटकर यांनी उपस्थित केले आहेत. पर्यटकांना आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ हवे असल्यास त्यांनी महानगरांना भेट देऊन त्यांचा आस्वाद घ्यावा, असे पाटकर म्हणाले.

अबकारी आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस

दरम्यान, या बेकायदेशीर आस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावणाऱया अबकारी खात्यातील प्रामाणिक अधिकाऱयाचे पाटकर यांनी कौतुक केले. प्राप्त माहितीनुसार सरकारने सध्या या अधिकाऱयाचा छळ चालविला असल्याचे ते म्हणाले. परंतु त्या प्रामाणिक अधिकाऱयाला कोणताही त्रास झाल्यास काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा पाटकर यांनी दिला आहे.

राजीनामा द्यावा ः विरियाटो

या पत्रकार परिषदेस उपस्थित पॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांनी बोलताना भाजपचे डबल-इंजिन सरकार देशाचा सर्वनाश करण्यास पुढे सरसावले आहे,  असा गंभीर आरोप केला. या मुद्दय़ाची निःपक्ष चौकशी व्हावी, तसेच त्यासाठी स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली.

Related Stories

फोंडा पालिकेतर्फे विकासकामांना गती

Amit Kulkarni

28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Patil_p

कोरोना महामारी, लॉकडाऊनातही फोंडय़ात अपघाती मृत्यूत वाढ

Patil_p

सहकार खात्यातर्फे 21 रोजी सहकार पुरस्कार सोहळा

Amit Kulkarni

गोमंतक मराठी अकादमीची आमसभेत मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी जोमाने काम करण्याचा निर्णय

Amit Kulkarni

मोरजी गावडेवाडा रस्त्याची चाळण

Amit Kulkarni
error: Content is protected !!