Tarun Bharat

स्मृती इराणींवरील आरोपप्रश्नी काँग्रेस नेत्यांना समन्स

दिल्ली उच्च न्यायालयाची फटकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर करण्यात आलेल्या आरोपप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना शुक्रवारी कडक शब्दात फटकारले. स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने जयराम रमेश, पवन खेडा आणि नेट्टा डिसोझा या काँग्रेस नेत्यांना समन्स बजावले. तसेच न्यायालयाने त्यांना संबंधित ट्विट तत्काळ डीलीट करण्याचा आदेश देत 18 ऑगस्टपूर्वी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार नावाचे रेस्टॉरंट चालवणाऱया स्मृती इराणी यांची मुलगी जोश इराणी हिच्याकडे बेकायदेशीर परवाना असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. ज्या मालकाच्या नावाने दारू परवान्याचे नूतनीकरण केले होते, त्याचा 13 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. या संदर्भात वकील इरेझ रॉड्रिग्ज यांनी तक्रार केली होती. स्मृती इराणी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांच्या खोडसाळ आणि अपमानास्पद आरोपांमुळे आपली बदनामी होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांनी स्मृती इराणी यांच्यावर आरोप करताना त्यांनी तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावे अशी मागणीही केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यानंतर आता न्यायालयाने काँग्रेसच्या या तिन्ही नेत्यांना समन्स बजावले आहे. स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांना नोटिसा बजावल्या होत्या. आपल्या मुलीवर निराधार आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी देखील त्यांनी केली होती. जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही आणि आरोप मागे घेतले नाहीत तर दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू करू असा इशारा देखील स्मृती इराणी यांनी दिला होता. स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीवर काँग्रेस पक्षाकडून होत असलेल्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली आहे. राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या आपल्या मुलीवर गांधी घराण्याच्या सूचनेवरून चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. आपल्या मुलीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

आरोपांमुळे इराणींची प्रतिमा मलीन ः हायकोर्ट

स्मृती इराणी यांची मुलगी जोश हिच्यावर तथ्यांची पडताळणी न करताच हे आरोप करण्यात आले आहेत, असे न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या एका न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे. या आरोपांमुळे केंद्रीय मंत्र्यांचीही प्रतिमा  खराब झाली आहे. इराणी यांना कधीही परवाना देण्यात आलेला नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 24 जुलै रोजी स्मृती इराणी यांनी काँग्रेस आणि पक्षाच्या तीन नेत्यांविरुद्ध 2 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता.

आम्ही सत्य न्यायालयासमोर आणू ः जयराम रमेश

समन्सच्या वृत्तानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या प्रकरणावर औपचारिक उत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आम्हाला नोटीस बजावली आहे. आम्ही सत्य बाजू न्यायालयासमोर मांडण्यास तयार आहोत. आम्ही इराणी यांचा दावा अयोग्य ठरवून त्यांना पुन्हा आव्हान देऊ, असे जयराम रमेश म्हणाले.

Related Stories

डॉक्टर, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : अझरुद्दीन

prashant_c

भारताला दिवाळीची भेट – कॉव्हॅक्सिनला मान्यता

Patil_p

महागाईचा भडका! काय आहेत आजचे पेट्रोल- डिझेलचे दर?

Tousif Mujawar

पंजाबमध्ये 140 नवे कोरोनाबाधित

Tousif Mujawar

श्रीकांत त्यागीच्या घरावर ‘बुलडोझर’ कारवाई

Patil_p

मराठा आरक्षणाचा विषय सुटत असेल तर आम्ही त्यांच्याकडे शिकवणी लावू -संजय राऊत

Archana Banage