Tarun Bharat

‘स्लो स्टार्टर्स’ मुंबई आज केकेआरविरुद्ध लढणार

चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर विजयी घोडदौड कायम राखण्याचा

चेन्नई / वृत्तसंस्था

सनरायजर्स हैदराबादविरुद्ध तंत्रशुद्ध खेळीसह विजय संपादन करणाऱया केकेआरसमोर आज (मंगळवार दि. 13) पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. मागील सलग दोन हंगामात केकेआरला प्ले-ऑफ फेरी गाठता आलेली नाही. ती कसर यंदा भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आजची लढत सायंकाळी 7.30 पासून खेळवली जाईल.

केकेआरला मागील सलग दोन हंगामात लवकर गाशा गुंडाळावा लागला असला तरी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध त्यांनी नव्या तडफेने खेळ साकारत विजय खेचून आणला होता. तोच धडाका ते मुंबईविरुद्ध कायम राखणार का, हे आजच्या लढतीत स्पष्ट होईल.

मॉर्गनच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाने कात टाकली असल्याचे पहिल्या लढतीत स्पष्ट झाले. या संघाची आघाडी फळी यशस्वी ठरली. शिवाय, दिनेश कार्तिकने देखील नेहमीचा आक्रमक बाणा दाखवून दिला. मॉर्गनचा सुनील नरेनला वगळण्याचा निर्णय योग्य ठरला तर नितीश राणा-शुभमन या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. आंद्रे रसेल, कार्तिक, मॉर्गन यांच्यामुळे या संघाची मध्यफळी देखील भक्कम आहे. शकीब हसनचा समावेश करत त्यांनी आपल्या गेमप्लॅनची प्रचिती दिली आहे.

मुंबईसाठी स्वतःला सिद्ध करण्याची वेळ

मुंबई इंडियन्सला यापूर्वी आरसीबीविरुद्ध आयपीएल सलामीच्या लढतीत दोन गडय़ांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, आता ते उसळून वर येण्यासाठी प्रयत्नशील असतील. केकेआरला हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडणे सहज शक्य झाले. पण, बुमराह-बोल्टसारख्या कसलेल्या गोलंदाजांना ते कसे सामोरे जाणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. विशेषतः शुभमन गिल या उभय गोलंदाजांना कसे सामोरे जाईल, हे औत्सुक्याचे असेल.

स्लो स्टार्टर्स म्हणून ओळखला जाणारा मुंबई इंडियन्सचा संघ यापूर्वी आरसीबीविरुद्ध हर्षल पटेल व एबी डीव्हिलियर्स यांच्या भरीव योगदानामुळे पराभूत झाला. आता ती बाजी पलटवणे शक्य होणार का, हे आजच्या लढतीत स्पष्ट होईल. क्विन्टॉन डी कॉक अद्याप क्वारन्टाईन कालावधी पूर्ण करत असून त्यामुळे मुंबई ख्रिस लिनलाच सलामीला उतरवेल, असे संकेत आहेत. सूर्यकुमार यादव, इशान किशन व हार्दिक-कृणाल हे पंडय़ा बंधू मागील सामन्यात अपयशी ठरले होते. त्याची भरपाई करण्याचे त्यांचे आज लक्ष्य असू शकते.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाईट रायडर्स ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शकीब हसन, शेल्डॉन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.

मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रित बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मोहसीन खान, हार्दिक पंडय़ा, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विन्टॉन डी कॉक, आदित्य तरे, ऍडम मिल्ने, नॅथन काऊल्टर नाईल, पीयूष चावला, जेम्स नीशम, युद्धवीर चरक, मार्को जान्सेन, अर्जुन तेंडुलकर.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.

कोटस

आमची फलंदाजी लाईनअप भरभक्कम आहे. प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्यावर आमचा भर असेल आणि आज मुंबई इंडियन्सविरुद्ध देखील आम्ही तोच कित्ता गिरवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत.

-केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन

वर्कलोड मॅनेजमेंटचा मुद्दा समोर ठेवून आम्ही मागील लढतीत हार्दिक पंडय़ाकडून गोलंदाजी करवून घेतली नाही. त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या वनडेत 9 षटके टाकली होती. त्याचा आम्ही विचार केला. लवकरच तो गोलंदाजी करताना दिसेल.

-मुंबईचे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक झहीर खान

Related Stories

ऋषी सुनक यांचा ब्रिटनचे पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर; बोरिस जॉन्सन यांची माघार

Archana Banage

आशिया चषक स्पर्धेचे आयोजन सप्टेंबरमध्ये

Amit Kulkarni

पाकमध्ये पडलेल्या क्षेपणास्त्राबाबत राज्यसभेत निवेदन सादर; संरक्षणमंत्री म्हणाले…

datta jadhav

अल्कारेझ-रुड, स्वायटेक-जेबॉर अंतिम फेरीत

Patil_p

व्ही. प्रणव तामिळनाडूचा नवा बुद्धिबळ चॅम्पियन

Patil_p

कोरोनाशी मिळून सामना करू : पंतप्रधान

prashant_c