Tarun Bharat

स्वच्छता अभियानावर वास्कोत चर्चा

प्रतिनिधी / वास्को

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी स्वच्छ भारत मोहिमेला पुन्हा गती देण्यासाठी पाऊले उचलली आहेत. गुरूवारी वास्कोतील रविंद्र भवनच्या हॉलमध्ये यासंबंधी आयोजित केलेल्या  बैठकीत आमदारांनी या मोहिमेचा आढावा घेतला. सद्यस्थिती, अडचणी आणि उपाययोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. रस्त्यावर कचरा फेकणाऱयांकडून दंड वसुलीचा कायदा अमलात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीला आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यासह माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, माजी उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर, माजी नगरसेवक यतीन कामुर्लेकर, वंदना सातार्डेकर, पालिका मुख्याधिकारी संतोष कुंडईकर, पालिका अभियंते मनोज आर्सेकर, स्वच्छता निरीक्षक महेश कुडाळकर व पालिकेचे इतर अधिकारी व स्वच्छता संबंधीत कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी यतीन कामुर्लेकर यांनी मुरगाव पालिका आणि स्वच्छता यासंबंधीची माहिती दिली. या कामातील अडचणीही त्यांनी मांडल्या. त्यानंतर आमदार कार्लुस आल्मेदा यांनी बैठकीत विविध प्रश्न उपस्थित करून उपस्थित कर्मचारी व अधिकाऱयांकडून माहिती जाणून घेतली. या बैठकीला घरोघरी कचरा गोळा करणारे कंत्राटदारही उपस्थित होते.

आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मुरगाव पालिका क्षेत्र स्वच्छतेच्या कार्यात सर्वात पुढे होते. स्वच्छ भारत मोहिमेच्या गोव्यातील तत्कालीन दूत माजी राज्यपाल स्व. मृदुला सिन्हा यांच्याकडून मुरगाव पालिकेला पुरस्कारही प्राप्त झाला होता अशी माहिती दिली. स्वच्छतेचे काम त्याच गती पुढे जायला हवे असे ते म्हणाले. त्यांनी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचाऱयांना स्वच्छतेच्या कामासंबंधी प्रश्न केले. अस्वच्छता का, बेजबाबदार लोकांवर कोणती कारवाई केली, कचऱयाच्या पसाऱयाचे किती अड्डे आजही आहेत अशा प्रश्नांना अधिकाऱयांकडे उत्तरे नव्हती. या कामातील तक्रारीसंबंधी त्यांनी जाब विचारला व अधिकाऱयांकडून अडचणींची माहिती जाणून घेतली. कर्मचारी व अधिकाऱयांनी काही वेळा लोकांकडून मिळणारे असहकार्य, ओला व सुका कचरा वेगळा न ठेवण्याचे प्रकार, कचरा रस्त्यावर आणून टाकण्याचे प्रकार अशा समस्यांसंबंधी माहिती दिली. स्वच्छतेचे काम सध्या कशापध्दतीने चाललेय या विषयी त्यांनी माहिती दिली. स्वच्छतेच्या कामात मुख्य भुमिका बजावणारी कचरावाहू वाहने योग्य प्रकारे काम करू शकत नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. वाहनांची समस्या दूर करण्यावर भर देण्याची मागणी आमदारांनी पालिका मुख्याधिकाऱयांकडे केली. त्यावर मुख्याधिकाऱयांनी पालिकेच्या कमकुवत आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधून सद्यस्थितीत ही कामे हाती घेणे कठीण असल्याचे स्पष्ट केले. पडून असलेली वीज खात्याची बीले आणि अन्य लोकांच्या बिलांचाही त्यांनी उल्लेख करून वीज खात्याने वीज खंडीत केली तर काय परिस्थीती उद्भभवेल असेही ते बोलून गेले. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक सुधारणेचा प्रश्नही बैठकीत उपस्थित झाला. यावेळी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी घरोघरी कचरा गोळा करण्याच्या कामात लोकांकडून कंत्राटदार किती पैसा वसुल करतात, एकूण मासिक कमाई किती होते, किती घरांमधून कचरा गोळा करण्यात येतो ही सर्व माहिती गोळा करण्याची सुचना केली. अन्यथा या कामातही आर्थिक घोटाळा होऊ शकतो आणि पालिकेची बदनामी होऊ शकते असे पालिका अधिकाऱयांना बजावण्यात आले.

कचरा गोळा करण्याचे काम करणाऱया कंत्राटदारांनीही या बैठकीत समस्या मांडल्या. काही उपस्थितांनी या कामातील ढिसाळपणावरही टीका केली. माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी कचरा गोळा करण्याचे काम तसेच अस्वच्छतेच्या कामातील ढिसाळपणाला पालिकेच्या पर्यवेक्षकांना जबाबदार धरले. काही जण कामचुकारपणा करतात. कामगारांनी चांगले काम करावे यासाठीच कामगारांना वेतन आयोग करण्यात येतात. मात्र, प्रमाणिकपणे काम होत नाही असा आरोप दीपक नाईक यांनी केला. आर्थिक अडचणी किंवा अन्य काही अडचणी असल्यास मुख्याधिकाऱयांनी त्यातून वाट काढायला हवी. ती त्यांची जबाबदारी आहे असे नाईक म्हणाले.

बैठकीत स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेताना विविध अडचणी, बेर्पाई आणि कोणत्या उपाययोजना करता येतील यावर प्रश्नावर प्रकाश पडल्याने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नरत राहावे. पुढील बैठकीत सर्व प्रश्नांवरील उत्तरे तयार ठेवावीत असे आमदारांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱयांना बजावले. येत्या 16 डिसेंबरला या विषयावर आमदार पुन्हा बैठक घेणार आहेत.

Related Stories

मोतीडोंगरवरील झोपडपट्टीला नेहमीच अभय..!

Patil_p

साखळीत शेतकरी कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन

Amit Kulkarni

हेमा बुगडे यांना ‘राष्ट्रीय कौशल्य चार्य 2020’ पुरस्कार प्राप्त

Patil_p

वखारीतील पाचजण जखमी वखारचालकाची प्रकृती चिंताजनक हणजूण पोलिसांकडून आठ जणांना अटक

Patil_p

क्रांती मैदानावरील जुनी पाटी हटविणाऱयांची चौकशी करा

Amit Kulkarni

शाळा सुरु करण्यास पालक, मंत्री, आमदारांचा विरोध

Patil_p