Tarun Bharat

स्वच्छतेत बेळगावला 228 वे स्थान

Advertisements

विभागनिहाय शहरांचे स्थान :

1 ते 10 लाख लोकसंख्या

1. अंबिकापूर (छत्तिसगड) 2. म्हैसूर (कर्नाटक) 3. नवी दिल्ली महापालिका.

कॅन्टोन्मेंट बोर्ड

1. जालंधर 2. दिल्ली 3. मिरत

1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या

1. इंदोर 2. सुरत 3. नवी मुंबई 4. विजयवाडा 5. अहमदाबाद

1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या

1. कराड 2. सासवड 3. लोणावळा

स्वच्छ शहरांची क्रमवारी…

1. इंदोर (मध्यप्रदेश)

2. सुरत (गुजरात)

3. नवी मुंबई (महाराष्ट्र)

4. अंबिकापूर (छत्तिसगड)

5. म्हैसूर (कर्नाटक)

6. विजयवाडा (आंध्रप्रदेश)

7. अहमदाबाद (गुजरात)

8. नवी दिल्ली (दिल्ली)

9. चंद्रपूर (महाराष्ट्र)

10. खारगोने (मध्यप्रदेश)

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान-2020’मध्ये बेळगाव शहर राष्ट्रीय पातळीवर 228 व्या तर, कर्नाटकात 10 व्या स्थानावर राहिले. मागील वर्षी 277 व्या स्थानी असलेल्या बेळगाव शहराने चालू वर्षीच्या क्रमवारीत किंचित सुधारणा केल्याचे दिसून येत आहे. कॅन्टोन्मेंट विभागामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड हे 38 व्या स्थानी असून 2019 च्या सर्वेक्षणात 44 व्या स्थानी होते. तर 2018 साली 51 व्या स्थानी होते. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या क्रमवारीतही सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये इंदोरला देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये प्रथम स्थान मिळाले आहे. सलग चौथ्या वषी इंदोरने प्रथम क्रमांकाचे मानांकन जिंकले आहे. यापूर्वी 2017, 2018 आणि 2019 मध्येही इंदोरने पहिला क्रमांक पटकावला होता. आपले हे अव्वल स्थान इंदोरने कायम ठेवले आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत गुजरातमधील सुरत शहर दुसऱया तर नवी मुंबई तिसऱया क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील नाशिक 11 व्या, पुणे 15 व्या तर नागपूर 18 व्या स्थानी आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छता सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर केला. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. विविध विभागातील 129 पुरस्कार विजेत्यांची नावे त्यांनी जाहीर केली. देशभरातील 4 हजार 242 शहरे, 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि 97 गंगा टाऊन्सनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020’ हे 28 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले होते. स्वच्छता ऍपवरुन 1 कोटी 87 लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन 11 कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला होता. स्वच्छ भारत सर्वेक्षणचे हे पाचवे वर्ष आहे.

राज्यांमध्ये छत्तिसगड अव्वल, महाराष्ट्र दुसरे

‘स्वच्छ राज्यां’च्या क्रमवारीत छत्तिसगड राज्य अव्वल ठरले असून महाराष्ट्र दुसरे आणि मध्यप्रदेश तिसऱया स्थानावर आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला ‘बेस्ट गंगा टाऊन’चा पहिल्या क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. त्याखालोखाल कानपूर, मुंगेर, प्रयागराज आणि हरिद्वार या शहरांना क्रमांक देण्यात आले आहेत. जनतेकडून आलेल्या अभिप्रायांच्या माध्यमातून ग्रेटर हैदराबाद शहराची ‘बेस्ट मेगा सिटी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

इंदोरमध्ये विजयोत्सव

कचरा प्रकल्प व व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम, कंपोस्ट खत प्रकल्प, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन आदी विविध उपाययोजनांच्या यशस्वी कामगिरीमुळे या यादीत इंदोरला पहिले स्थान टिकवता आले. सलग चौथ्यांदा अव्वल स्थान मिळवल्यामुळे गुरुवारी इंदोरमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. संध्याकाळी घरोघरी दीप प्रज्वलन करुन शुक्रवारी सकाळी घरी येणाऱया सफाई कर्मचाऱयांचा सन्मान करा, असे आवाहन खासदार शंकर लालवाणी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनीही शहरवासियांचे अभिनंदन केले.

पुणे 15 व्या, मुंबई 35 व्या स्थानी

स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक 11, ठाणे 14, पुणे 15, नागूपर 18, कल्याण डोंबिवली 22, पिंपरी चिंचवड 24, औरंगाबाद 26, वसई-विरार 32 आणि मुंबई 35 व्या क्रमांकावर आहे. गतवषी ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविले होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱया राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले होते.

Related Stories

पीडीओ गणेश यांचा बेंगळूर येथे सन्मान

Omkar B

अयोध्यानगर येथे कचराकुंडी नसल्याने परिसर अस्वच्छ

Amit Kulkarni

गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्याचे पोलीस उपायुक्तांकडून कौतुक

Amit Kulkarni

अनगोळ करेव्वा देवीची यात्रा आजपासून

Amit Kulkarni

धामणेतील बसवाण्णा मंदिरात घातला अभिषेक

Patil_p

तुरमुरी ग्रा. पं. अध्यक्षपदी वैशाली खांडेकर यांची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!