Tarun Bharat

स्वतंत्र पाटबंधारे खाते अन् 80 हजार एकर जमिनीला पाणी !

राजर्षी शाहू महाराजांची जलनीती

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

जागतिक जल दिनाचे औचित्य साधून जल है तो… कल है…. या टॅगलाईनच्या माध्यमातून पाण्याचे महत्वाचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न शासन यंत्रणेबरोबरच पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून दरवर्षी होत असतो. पाण्याच्या बचतीचे, पाणी प्रदूषण रोखण्याचेही आवाहन आणि प्रबोधन केले जाते. पण शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी कोणतीही आधुनिक साधने नसताना पाण्याचे महत्व जाणून आपल्या कोल्हापूर संस्थानचे पाणी धोरण, जलनीती तयार करण्याची दूरदृष्टी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी दाखवली होती. स्वतंत्र पाटबंधारे खाते (इरिगेशन डिपार्टमेंट) आणि सार्वत्रिक पाटबंधारे धोरण (मास इरिगेशन पॉलिसी) तयार करून त्यांनी कोल्हापूर संस्थानातील तब्बल 79 हजार 860 एकर जमीन पाण्याखाली, सिंचनाखाली आणली होती.

6 मे 2022 रोजी शाहू महाराजांचा शंभरावा स्मृती दिन आहे. शाहू स्मृती शताब्दी वर्ष राज्य शासन आणि शाहूप्रेमी कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करणार आहेत. आपल्या उण्यापुऱ्या 48 वर्षांच्या आयुष्यात शाहू महाराजांनी सर्व क्षेत्रात केलेले कार्य सर्वशुत आहे. जलदिनाच्या निमिमाने कृतज्ञता पर्वात शाहूंच्या जलनीतीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

1896-1897 आणि 1897-1898 या वर्षांत पडलेल्या दुष्काळात आपल्या रयतेचे झालेले हाल शाहू महाराजांनी अनुभवले होते. दुष्काळग्रस्तांना त्यांनी आपल्या दरबारच्या खजिन्यातून मदतही केली होती. दुष्काळ निवारणाच्या कामातून 77 हजार 192 तलावांची दुरूस्ती आणि सुधारणा केली होती. नव्या तलावाची बांधणी करण्याचाही महाराज विचार करत होते. पुढे 1902 मध्ये ते युरोप दौऱ्यावर गेले होते. तेथून परतल्यानंतर महाराजांच्या मनात दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी स्वतंत्र असे धोरण आणि अंमलबजाणीसाठी स्वतंत्र खाते आवश्यक असल्याचे विचार सुरू झाले. त्यातून त्यांनी 1902 मध्येच सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर केले. कोल्हापूर संस्थानाची मास इरिगेशन पॉलिसी असे त्या धोरणाला म्हटले गेले. या धोरणातर्गंत स्वतंत्र पाटबंधारे खातेही सुरू झाले. पहिले इरिगेशन ऑफिसर म्हणून शंकर सीताराम गुप्ते यांची निवड झाली. पाटबंधारे खात्याने संस्थानातील जुन्या, नव्या विहिरी, छोटे मोठे तलाव, छोटे मोठे बंधारे यांच्या नोंदी केल्या. सर्व माहिती ऑन-रेकॉर्ड आणली त्यातून विहिरी, तलाव आणि बंधारे दुरूस्तीची कामे सुरू झाली. नवीन कामांनाही प्रारंभ करण्यात आला. गाळ काढण्यासही मदत करण्यात आली.

पाटबंधारे खात्याची कामे सुरू असताना शेतीला कायम स्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे महाराजांनी निश्चित केले. त्यातून नवीन विहिरी खोदण्याची योजना हाती घेण्यात आली. 1905-1906 या काळात कोल्हापूर संस्थानात 11700 विहिरी होत्या. पुढे पंधरा वर्षांत 1920-1921 यावर्षात विहिरींची संख्या 12800 इतकी झाली. नव्या विहिरी काढण्यासाठी तगाईच्या रूपाने दरबारने शेतकऱयांना कर्ज पुरवठाही करण्यात आला. वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रूकडी आदी वीसहून अधिक गावात लहान मोठे तलाव उभारले गेले. भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे येथील मोठ्य़ा तलावांची दुरूस्ती करण्यात आली. पाणी धोरणानुसार तब्बल दीड दशक जलस्त्रोत दुरूस्ती, नवे जलस्त्रोत साकारणे आदी कामे झाली. या तलाव, विहिरींबरोबरच बंधारे देखील महत्वाचे ठरले. जिल्हय़ातील प्रमुख नद्यांचे पाणी रोखून ते शेतीकडे वळविण्यात आले. या सर्वाचा परिपाक म्हणून जिल्हय़ातील हजारो एकर जमिन सिंचनाखाली आली. 1915-1916 या वर्षीच्या कोल्हापूर संस्थानच्या अहवालात जिल्हय़ातील नद्यापासून 39783 एकर जमीन ओलिताखाली आली. विहिरीपासून 39845 एकर जमिनीला पाणी मिळू लागले. तलावाच्या माध्यमातून 232 एकर जमिनीला पाणी पुरवठा होत होता, अशी नोंद आहे. या आकडेवारीच्या माध्यमातून विसाव्या शतकाच्या प्रारंभी शाहू महाराजांनी योजलेल्या जलनीतीचे सकारात्मक परिणाम मिळाले.

राधानगरी धरणाचे स्वप्न
कोल्हापूर संस्थानात पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, तुळशी, कुंभी, कासारी, भोगावती, हिरण्यकेशी या महत्वाच्या नद्यातून पाणी वाहून जात होते. ते रोखून त्याचा वापर शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याचा मानस शाहू महाराजांच्या मनात होता. त्यातून त्यांनी राधानगरी धरण बांधण्याचे स्वप्न पाहले. धरण उभारणीस 1909 मध्ये प्रारंभ झाला. प्रत्यक्षात 1957 मध्ये राधानगरी धरणाचे काम पूर्णत्वाला गेले. शाहू महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनीही या कार्यात मोलाचे योगदान दिले.

राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण हे आपले जीवितकार्य मानले होते. It is my Lifes Work-Life Mission, असे ते म्हणत असत. जीवितकार्याचे स्वप्त साकारण्यासाठी महाराज आपल्या सर्वशक्तीसामर्थ्यानिशी उभे राहिले होते. महात्मा फुलेंच्या शेती आणि शेतकरी संबंधी विचारांना पुढे नेण्याचे कृतीशिल कार्य शाहू महाराजांनी केले.
प्राचार्य डॉ. जे. के. पवार, शाहू अभ्यासक, इतिहास संशोधक

Related Stories

Kolhapur : खुपिरेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Khandekar

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर

Archana Banage

मान्सून अखेर केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची माहिती

Tousif Mujawar

भारतात लवकरच NASAL व्हॅक्सिनची निर्मिती

datta jadhav

बिहारमध्ये आज NDA ची बैठक; मुख्यमंत्र्यांची होणार निवड

datta jadhav

बिहार : लॉकडाऊन हटविले; पण नाईट कर्फ्यू अजूनही जारी : नितीश कुमार

Tousif Mujawar
error: Content is protected !!