Tarun Bharat

स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’लाही मंजुरी

Advertisements

‘भारत बायोटेक’च्या निर्मितीला मोठे यश : आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची तज्ञ समितीची शिफारस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ला अनुमती दिल्यानंतर दुसऱयाच दिवशी हैदराबादस्थित ‘भारत बायोटेक’निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ या लसीलाही तज्ञ समितीने तातडीच्या वापरासाठी मंजुरी दिली आहे. या लसीच्या मंजुरीमुळे कोरोनाविरुद्धच्या लढय़ात देशाला दुसरी मोठी भेट मिळाली. ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसी आता अंतिम मंजुरीसाठी देशाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल अर्थात ‘डीसीजीआय’कडे पाठविल्या जाणार आहेत. मात्र, तज्ञ समितीच्या मंजुरीमुळे पुढील प्रक्रियाही आता सुकर झाली आहे.

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) कोरोना विषयावरील विषय तज्ञ समितीने भारत बायोटेकची देशी कोविड लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी तज्ञ समितीने सीरम संस्थेच्या कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. हैदराबादस्थित भारत बायोटेकला शनिवारी दुपारी दीड वाजता कोरोना विषाणूच्या लसींचे मूल्यांकन करणाऱया तज्ञांच्या समितीने बैठकीला बोलावले होते. सायंकाळपर्यंत चाललेल्या वैद्यकीय तज्ञांच्या बैठकीत लसीसंबंधीच्या विविध मुद्दय़ांवर विचारविमर्ष करण्यात आला. त्यानंतर ‘कोव्हॅक्सिन’ या लसीलाही आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘सीरम’व्यतिरिक्त भारत बायोटेक आणि फायझर यांनी देशातील कोरोना लसीच्या तातडीच्या वापरासाठी अर्ज केला होता.

पुढील प्रक्रियेला गती

भारत सरकारच्यावतीने लस देण्याची तयारी जोरात सुरू आहे. आता पुढील प्रक्रियेसाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. तसेच देशात शनिवारी रंगीत तालीमही (ड्राय रन) यशस्वीपणे पूर्ण झाल्याने वैद्यकीय यंत्रणाही सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्ष लसीकरण कसे असेल आणि लसीची किंमत किती असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यतः 3 कोटी कोरोनायोद्धय़ांना लस देण्याचे लक्ष्य आहे. त्यानुसार आरोग्य कर्मचारी, पोलीस, कोरोना वॉरियर्स, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि आजारी असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाणार आहे.

error: Content is protected !!