Tarun Bharat

स्वयंशिस्त-सजगता कोरोनाविरुद्धची मोठी ताकद!

ओमिक्रॉन व्हेरियंटवर संशोधन सुरू : ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात कोरोनाचा संसर्ग सध्या नियंत्रणात असला तरी ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या धास्तीनंतर पंतप्रधानांनी देशवासियांना सतर्क करताना स्वयंशिस्त आणि सजगता हीच कोरोनाविरुद्धची मोठी ताकद असल्याचा दावा केला. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटवर अजूनही संशोधन सुरू असून त्याचा वैद्यकीय तज्ञांकडून अभ्यास केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनवर सध्या संशोधन सुरू असल्याचे सांगितले. ओमिक्रॉनवर आपले संशोधक रिसर्च करत आहेत. रोज नवीन डेटा येत आहे, त्यावर सल्ले, सूचना घेतल्या जात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची असून कोरोना नियमावलीचे कडक पालन करण्याची सूचना त्यांनी केली. आपली सामूहिक ताकद कोरोनाला नक्की पराभूत करेल, असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरात लसीकरणात आपण मोठी आघाडी घेतलेली आहे. आता आपल्याला 2022 मध्ये प्रवेश करायचा आहे. भविष्यात कोरोनाशी सामना करताना लसीकरण आणि कोरोना नियमावली पाळली तर आपण भविष्यातील आव्हानांचाही समर्थपणे सामना करू शकणार, असे पंतप्रधान म्हणाले.

‘स्क्रीन टाईम’ऐवजी पुस्तकवाचन वाढवा!

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितले.  पुस्तके ज्ञान देण्याबरोबरच व्यक्तिमत्व, आयुष्य घडवण्याचेही काम करतात. पुस्तके वाचण्याच्या छंदामुळे एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते. सध्याच्या काळामध्ये आपला ‘स्क्रीन टाईम’ थोडा जास्तच वाढला आहे. त्यामुळे स्क्रीन टाईमऐवजी पुस्तक वाचनाला जास्तीत जास्त लोकप्रिय बनवले पाहिजे, असे मोदी म्हणाले. वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून, एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगतानाच त्यांनी काही उदाहरणेही दिली. आता नवीन वर्ष सुरू होणार असून या वर्षात पुस्तक वाचनासंबंधी देशवासियांनी नवनवे संकल्प करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Stories

उत्तरप्रदेशातील भीषण दुर्घटनेत 14 जण ठार, 30 जखमी

Amit Kulkarni

अमेठीत काँग्रेसला झटका देणार सप

Patil_p

स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ कोरोनाच्या 617 प्रजातींवर भारी

datta jadhav

राष्ट्रकुल सुवर्णजेती झुबेची उत्तेजक चाचणीत दोषी

Patil_p

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांचा राजीनामा

Patil_p

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांना वेग

Patil_p