शिवाजी महाराजांचा फायबर पुतळा खास आकर्षण : मुंबईचे स्वराधीश ढोल पथक लक्षवेधी


प्रतिनिधी /म्हापसा
स्वराज्य गोमंतकतर्फे स्वराज्य गोमंतक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाळके यांच्या अध्यक्षतेखाली व म्हापसा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने म्हापशात तिथीनुसार व वार्षिक पारंपरिक सहावी शिवजयंती यात्रा मोठय़ा उत्साहाने साजरी करण्यात आली. म्हापसा बोडगेश्वर मंदिर ते म्हापसा टॅक्सी स्थानक दरम्यान भव्य मिरवणूक व चित्ररथ काढून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ व ढोल ताशांच्या गजराने म्हापसा परिसर दुमदुमून गेला. सुमारे पाच फुट फायबरची शिवाजी महाराजांची मूर्ती यंदा या यात्रेचे खास आकर्षण ठरले.
म्हापसा बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर, तारक आरोलकर, अध्यक्ष प्रशांत वाळके सिद्धार्थ मांद्रेकर, अमेय नाटेकर, जयेश थळी आदींच्या उपस्थितीत नवीन आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फायबर पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. लहान मुलांनी केलेला मलबारी खेळ त्यात दानपट्टा आदी आकर्षित व सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. म्हापसा गांधी चौक, म्हापसा मारुती मंदिर, टॅक्सी स्थानकावर हे खेळ करून दाखविण्यात आले. हे खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावर्षी मार्शल आर्ट हे खास आकर्षण ठरले.
शिवाजी महाराजांची फायबरची मूर्ती रॅलीचे खास आकर्षण
सिद्धार्थ मांद्रेकर म्हणाले की, यावर्षी सहावी रॅली आम्ही आयोजित केली होती. यंदा बोडगेश्वर मंदिराकडून रॅलीची सुरुवात झाली. स्वराधीश ढोल पथक मुंबई हे यावर्षीचे खास आकर्षण ठरले. त्यात डीजे साऊंड व शिवाजी महाराजांची मिरवणूक झाली. बेळगावहून शिवाजींची खास फायबर मूर्ती लक्षवेधी ठरली. बोडगेश्वर मंदिर, मारुती मंदिर व नंतर टॅक्सी स्थानकावर त्यांचे प्रदर्शन झाले. यामध्ये मलबारी खेळ त्यात दानपट्टा झाला. रॅली सुरू झाल्यावर टॅक्सी अश्वघोटे आम्ही प्रथम आणले असून यात मावले सहभागी झाले होते.