प्रतिनिधी / सातारा :
हिंदूस्तानला इतिहास आहे. थोरल्या शाहू महाराजांनी दिल्लीलाही घाम फोडला होता. साताऱ्यातून शाहू पर्व सुरु झाले आहे. हे पर्व संपूर्ण राज्यभर सुरु व्हावे. आज किल्ले अजिंक्यताऱ्याची परिस्थिती तितकी चांगली नाही. मराठय़ांची अस्मिता जपण्यासाठी आपण सगळय़ा शिवभक्तांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजममुंडे यांनी केले. दरम्यान, स्वाभिमान दिनी किल्ले अजिंक्यताऱ्यावरील राजसदरेवरुन 2032 च्या सोहळय़ांचा संकल्प करण्यात आला.
राजसदरेवरुन मराठय़ांनी अटकेपार झेंडे लावले. त्याच राजसदरेचे हिंदूनृपती छत्रपती शाहु महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळय़ास सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजममुंडे, कन्हैय्यालाल राजपुरोहित, संतोष शेडगे, दत्ताजी भोसले, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, संग्राम बर्गे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, सुदाम गायकवाड, निलेश झोरे, सचिन जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडाच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शाहु महाराजांची पालखी फुलांच्या उधळणीत हलगीच्या वाद्यात राजसदरेवर नेण्यात आली.


त्यानंतर बोलताना श्रमिक गोजममुंडे म्हणाले, शाहु पर्वाची सुरुवात साताऱ्यातून होत आहे. शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर यांनी दुर्ग संमेलन घेतले. अनेक शिवभक्त उभे राहिले. त्यांनी सुरु केलेले हा सोहळा राज्यव्यापी व्हावा, असे सांगत पुढे ते म्हणाले, गतवर्षी पावसाळय़ात प्रतापगड बुरुजाची तटबंदीचा पाया ढासळला होता. ज्या बुरुजाने अफझल खानाचा वध पाहिला. ज्या बुरुजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्यापणा पाहिला. तोच चिलखती बुरुज पुन्हा उभा करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने एकदा आवाहन केले अन् 21 दिवसात 21 लाख जमा झाले. दीपक प्रभावळकर यांच्या माध्यमातून श्री.छ.उदयनराजेंना भेटलो अन् काम सुरु केले. बुरुजाच्या पायाचे काम चांगले करण्यात आले. तसेच वसंतगडाचा बुरुज मागच्या पावसाळ्यात ढासळला. तेथील मावळय़ांनी सांगताच 24 तासात साडेपाच लाख रुपयांचा निधी उभा केला. ते काम अंतिम टप्यात आले आहे. वास्तगडावर बुरुज संवर्धनाचे काम चुन्याच्या घाण्यातून होत आहे. हे काम लोकवर्गणीतून उभं होत आहे. आज अजिंक्यताऱयाची स्थिती चांगली नाही. मी देशातील 2 हजार पेक्षा जास्त किल्ले पाहिले आहेत. महाराष्ट्र मातीतली मराठय़ांची अस्मिता जपण्यासाठी एकत्र येऊ असे आवाहन त्यांनी केले.
राजसदरेवरुन संकल्प अन् उदयनराजेंकडून 1 किलो चांदी अर्पण
गेल्या 12 वर्षापासून सुरु करण्यात आलेला स्वाभिमान दिनाचा सोहळा 2032 साली चांदीच्या पालखीतून सोन्याची मुर्ती काढण्याचा संकल्प राजसदरेवरुन शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक दीपक प्रभावळकर यांनी केल्याचे ऐकताच छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार श्री. छ. उदयनराजेंनी 1 किलो चांदी अर्पण केली. त्यामुळे 2032 चा संकल्प यशस्वी होणार असेही यावेळी स्पष्ट झाले.