Tarun Bharat

स्वॅब तपासणीला ‘मिरज’ चा नकार

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून चाकरमानी व अन्य संशयितांचे स्वॅब नमुने घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, रत्नागिरीतून वाढत्या संख्येने पाठवण्यात येणारे स्वॅब तपासणी करण्यास मिरज येथील सरकारी मेडिकल कॉलेजच्या लॅबने नकार दिला आहे. सोमवारी सकाळपासून मिरजमध्ये स्वॅब स्वीकारण्यात आले असल्याने रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पर्यायी व्यवस्था म्हणून कोल्हापूर, पुणे याठिकाणी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हय़ात पुणे, मुंबई व इतर जिल्हय़ातून येणाऱया चाकरमान्यांची संख्या प्रचंड वाढली असून दररोज 300 हून अधिक स्वॅब तपासणीसाठी पाठविले जात आहेत. मात्र मिरज येथील लॅबमध्ये रत्नागिरी बरोबरच सांगलीसह अन्य  जिल्हय़ातील स्वॅब तपासणीसाठी येतात. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रयोगशाळेवरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे वेळेत स्वॅब तपासणी शक्य नसल्याचे सांगत नवे स्वॅब स्वीकारण्यात नकार दिला असल्याची माहिती डॉ. बोल्डे यांनी दिली. त्यामुळे आता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या सूचनेनंतर स्वॅब पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तसेच कोल्हापूर येथेही स्वॅब चाचणी सेंटर सुरू झाले असून काही स्वॅब याठिकाणीही पाठविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

मिरज प्रयोगशाळेवरील वाढता ताण व नवे स्वॅब स्वीकारण्यास दाखवलेली असमर्थता यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील स्वॅब अहवाल पेंडिंग राहण्याचे प्रमाण  वाढले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून त्वरीत मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

स्वॅब किट, पीपीईचा तुटवडा नाही

रत्नागिरी जिल्हय़ात सर्व ग्रामीण रूग्णालयांमध्ये दररोज स्वॅब घेतले जातात.  या आठवडय़ात कशेडी घाट, साखरपासह चार नवीन स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात येत असल्याची माहिती डॉ. बोल्डे यांनी दिली. जिल्हय़ात स्वॅब कीटचा कोणताही तुटवडा नाही. एक ते दोन हजार जादा कीट उपलब्ध आहेत.  पीपीईसुध्दा पुरेसे असून मंगळवारी आणखी 5 हजार नवीन पीपीई कीट उपलब्ध होणार असल्याची माहिती बोल्डे यांनी दिली.

रेड झोनमधून येणाऱयांचे स्वॅब

रत्नागिरी जिल्हय़ात रेड झोनमधून येणाऱया व्यक्तींचे स्वॅब घेवून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. ग्रीन व ऑरेंज झोनमधून आलेल्या प्रवाशांना होम क्वारंटाईन केले जात आहेत. त्यांच्या पाठपुरावा आरोग्य सेविकांकडून केला जात असल्याची माहितीही डॉ. बोल्डे यांनी दिली.

Related Stories

देवगडमधील इंटरनेट सेवा बारा तासाहून अधिककाळ ठप्प

NIKHIL_N

विमा कंपनीची मुजोरी तात्काळ थांबवावी- विवेक कुबल

Anuja Kudatarkar

रत्नागिरी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Archana Banage

आंतरराष्ट्रीय कॉलचे पाकिस्तान कनेक्शन उघड

Patil_p

भोगवेतील नवविवाहितेचा गोव्यात अपघातात मृत्यू

NIKHIL_N

एसटी चालक-वाहकांना प्रवाशांकडून धक्काबुक्की!

Patil_p
error: Content is protected !!