इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील प्रकार : नगरसेवकांच्या आक्रमतेनंतर स्वॅब घेवून केले क्वारंटाईन
प्रतिनिधी / इचलकरंजी
येथे सताऱ्याहून आलेल्या एका युवतीला आयजीएममध्ये स्वॅब देण्यासाठी तब्बल २८ तास प्रतीक्षा करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. योगायोगाने या युवतीची फरफट एका नगरसेवकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा पाठपुरावा केला, त्यानंतर संबंधीत युवतीचा स्वॅब घेवून तिला संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले. पण यामुळे इचलकरंजीतील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील गावभागात राहणारी एक युवती लॉकडाऊनमुळे साताऱ्यापासून २० किलोमीटरवर असलेल्या एका गावामध्ये पाहुण्यांकडे अडकून पडली होती.
शुक्रवार १५ मे रोजी ती इचलकरंजी येथे आल्यानंतर सकाळी ११ वाजता तिला आयजीएम रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. पण डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करुनही कोणीही तिची दखल घेतली नाही. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे तिला संजय घोडावत येथील क्वारंटाईन केंद्रात जाण्यास सांगण्यात आले. पण रात्रीची वेळ असल्याने त्या मुलीने तेथे जाण्यास व घरी परत जाण्यासही नकार दिला. त्यानंतर अखंड रात्र तिने आयजीएम रुग्णालयात घालवली.
शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आयजीएम रुग्णालयात एका व्यक्तिस घेवून गेलेले नगरसेवक इकबाल कलावंत यांना तेथे उपस्थित पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने त्या युवतीच्या हेळसांडीची माहिती दिली. त्यांनी त्या युवतीशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी याची माहिती नगरसेवक प्रकाश मोरबाळे,, राजू आलासे यांना दिली. ते दोघेही तात्काळ त्या ठिकाणी आले, पण सकाळी येथे कोणीही डॉक्टर उपस्थित नसल्याचे त्यांना दिसून आले.
यानंतर नगरसेवकांनी पालिका आरोग्याधिकाऱ्यांना फोन लावला पण त्यांनी उचलला नाही. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत तेथे आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्या युवतीनेही स्वॅब घेतल्याशिवाय कोठेही जाणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर त्या युवतीचा फॉर्म भरून घेण्यात आला. काही वेळातच झालेल्या पदाधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समोर हा विषय आला. पण आयजीएममध्ये क्वारंटाईन केलेल्या रूग्णांची क्षमता संपल्याने हा विलंब झाल्याचे सांगण्यात आले. अखेर शनिवार दुपारी ३ वाजता या युवतीचा स्वॅब घेण्यात येवून तिला डीकेटीई येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले. पण या प्रकारामुळे इचलकरंजी येथील ढिसाळ आरोग्य यंत्रणा व त्याचा नागरिकांना बसत असलेला फटका पुन्हा एकदा समोर आला आहे.


previous post