दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य लोक चिंतेत
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यात गुन्हेगारीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतानाच मंगळवारी दुपारी हणजूण येथील कर्लीज हॉटेलजवळ एका रुममध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला. त्यामुळे हणजूण पोलीस पुन्हा एकदा कर्लीजमुळे चर्चेत आले आहेत. दिवसाढवळय़ा होणाऱया वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसही हतबल झाले असून राज्याचे नाव या गुन्हेगारीमुळे बदनाम होत चालले आहे. या सर्वांना कुठेतरी फुलस्टॉप मिळणे आवश्यक आहे, अशी एकच चर्चा राज्यात सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनाली फोगट खून प्रकरण राज्यभर गाजत असतानाच मंगळवारी प्राईजवाडा हणजूण येथे कर्लीज बारच्या बाजूला अज्ञाताचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा मृतदेह सुमारे 6 महिन्यापूर्वीचा आहे. या खोलीत फक्त सांगाडाच राहिला होता. घर मालकाने आपल्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला. याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले असले तरी शवचिकित्सा अहवालानंतर सर्व काही स्पष्ट होणार आहे.
हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नीरज देवीदास यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सासाठी बांबोळी येथे शवागृहात पाठवून दिला आहे. अलिकडेच हडफडे येथेही अशा प्रकारे एका विदेशातून आलेल्या स्थानिकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृत्यू कसा झाला हे कुणालाच माहीत नसताना शवचिकित्सा अहवालानंतर त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी दोघांना आपल्या ताब्यात घेतले आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्था ढासाळली : विजय सरदेसाई


राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासाळली आहे. खून होत चालले असून मृतदेह सापडत आहेत. या खुनांचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. राज्य प्रशासन याबाबत योग्यरित्या धोरण आखण्यास तसेच योग्य लिडरशीप ठरविण्यातही अपयशी झाले आहे. या तिन्ही गोष्टी डॉ. प्रमोद सावंत यांच्या दारावर जाऊन बंद पडतात, अशी टीका गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी तरुण भारतशी बोलताना केली.
संशयित एडवीन नुनीसच्या कोठडीबाबात आज निर्णय
सोनाली मृत्यू प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले व संशयित आरोपी एडवीन नुनीस, दत्तप्रसाद गावकर व रामदास मांद्रेकर या तिघांचीही सुनावणी पूर्ण झाली असून त्यांच्या सुनावणीवर बुधवारी निर्णय होणार आहे. दरम्यान मुख्य संशयित आरोपी सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांच्या कोठडीत आणखी दोन दिवस वाढ करण्यात आली आहे.