हत्तीपार्क, एलिफंट कॉरिडॉरला लवकरच मंजुरी – पालकमंत्र्यांची ग्वाही
हत्तीबाधित गावांतील नागरिकांशी संवाद तिलारी जंगल सफारी बोटचे उद्घाटन
हत्तीबाधित गावांना ढोल, वाद्यसामग्रीचे वाटप
साटेली-भेडशी / प्रतिनिधी:
तिलारी खोऱयातील हत्ती प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यात येणार आहे. हत्तीपार्क व एलिफंट कॉरिडॉर हे दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवून गेली 18 वर्षे येथील नागरिकांना सतावणारा हत्ती प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढू, अशी ग्वाही हत्तीबाधित गावातील ग्रामस्थांना पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिली. यावेळी तिलारी जंगल सफारी बोटचेही उद्घाटन करण्यात आले. शिवाय हत्तीबाधित गावांना ढोल व वाद्यसामग्री देण्यात आली.
पालकमंत्री सामंत शनिवारी हत्ती प्रश्नासाठीच्या महत्वाच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याकडून सध्या भेडसावणाऱया हत्ती समस्येबद्दल माहिती घेतली.
शेतकऱयांपर्यंत भरपाई पोहोचवा!
यावेळी सामंत म्हणाले, मुख्यमंत्री, स्थानिक आमदार, खासदार येथील शेतकऱयांच्या पाठिशी आहेत. त्याचबरोबर एवढी वर्षे हत्तींचा त्रास सोसूनही येथील ग्रामस्थ वनविभागाला तसेच शासनाला सहकार्य करीत आहेत. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल.
यावेळी खासदार विनायक राऊत, कोल्हापूर परिक्षेत्र मुख्य वनसंरक्षक क्लिमेट बेन, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्कप्रमुख शैलेश परब, विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, प्रभारी तहसीलदार संजय कर्पे, सभापती संजना कोरगावकर, उपसभापती धनश्री गवस, तालुकासंघटक संजय गवस, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस, नगराध्यक्ष लीना कुबल, जि. प सदस्य संपदा देसाई, विनिता गाड, सरपंच सेवा जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस, विभागप्रमुख संतोष मोर्ये, केर सरपंच मीनल देसाई यांच्यासह हत्तीबाधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व अन्य अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
हत्ती प्रश्नाचे गांभीर्य ओळखून गेल्याच आठवडय़ात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाच्या पदाधिकारी व वनविभाग यांची बैठक मोर्ले येथे नुकतीच घेण्यात आली होती. या बैठकीत हत्तीबाधित गावातील ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाप्रमाणे महत्त्वाची बैठक पालकमंत्री, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत आयोजित करू, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार केर येथे शनिवारी ही बैठक घेण्यात आली.
फोनवरून वनमंत्र्यांशी साधला संवाद
बैठकीत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी फोनवरून संपर्क साधत ग्रामस्थांना उद्भवणाऱया समस्यांबाबत माहिती दिली. तसेच वन विभागाकडून योग्य अशी मदत तसेच हत्ती समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी केली.
वन विभागाबाबत नाराजी
गेल्या अठरा वर्षांपासून सुरू असलेल्या हत्ती संकटातून मुक्त करण्यासाठी वनविभाग अपयशी ठरला आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने लाखो रुपये देऊनही वन विभागाने त्याचा योग्य विनियोग केला नाही. त्याचे उदाहरण पाहायला गेल्यास आता हत्ती संरक्षण सौर कुंपण, कॉंक्रिटवॉल, बॅटरी यासाठीचा कोटय़वधी रुपये निधी जमा झाला. मात्र, ही कामे करताना कोरोनाची कारणे पुढे करून निधी अखर्चित ठेवला गेला. तर ही कामे अपूर्ण स्थितीत असल्याबाबत विचारणा केली असता समर्पक उत्तरेही या विभागाला देता आली नाहीत. यावरून येथील वन विभागाचा कारभार महत्त्वाच्या अधिकारी, मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांच्यासमोर आला. त्याचवेळी पालकमंत्री सामंत यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक क्लिमेट बेन यांच्या कामाचे कौतुक करताना बेन ठरणार हत्ती उपद्रव रोखण्यासाठी मार्गदर्शक असे कौतुक ते करीत असलेल्या कामाचे 100 टक्के अनुकरण न करता निदान 25 टक्के तरी अनुकरण करा, असे सामंत यांनी वन विभागाच्या जिल्हय़ासह तालुका पातळीवर अधिकाऱयांना बैठकीत सुनावले.
हत्ती हाकाऱयांना वनविभागच्या सेवेत घ्या!
हत्ती संकटाचा स्थानिक पातळीवर सामना करायचा असेल तर वनविभागाच्या सोबतीला स्थानिक ग्रामस्थ महत्वाचे आहेत. त्यांना तसे मानधन व सेवा देणेही महत्वाचे आहे. त्यामुळे ज्या गावात हत्ती संकट आहे, त्या ठिकाणी नेमण्यात येणारे हत्ती हाकारी यांना वनविभागाच्या सेवेत करार पद्धतीवर घ्यावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केल्यावर त्याला पालकमंत्री, खासदार व मुख्यवन संरक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
असा असेल हत्तीपार्क व एलिफंट कॉरिडॉर
हत्तीपार्क करण्यासाठी कोल्हापूर जिल्हय़ातील घाटकरवाडी, तर सिंधुदुर्गमधील नांगरतास या दोन्ही ठिकाणी एक हजार एकर जमीन वनक्षेत्राची असून त्या ठिकाणी नैसर्गिक डॅम आहे, अशा सुयोग्य ठिकाणी हा हत्तीपार्क होणार असून त्यासाठीची आवश्यक या प्राथमिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. येथील समितीने कर्नाटक येथे जाऊन पाहणी केली असून याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून 68 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. डेहराडून येथील संस्थेने या ठिकाणचा अभ्यास प्राण्यांच्यादृष्टीने करण्यात आला आहे. यासाठी 84 लाख निधी मंजूर असून 58 लाख रुपये एवढा निधीही वर्ग झाला आहे, अशी माहिती समाधान चव्हाण यांनी दिली.
नुकसान भरपाईच्या वाढीव दरासाठी प्रयत्न
वन्यप्राण्यांकडून होणाऱया शेतीचे नुकसान या निकषान्वये यामुळे हत्ती नुकसानीची सर्व भरपाई मिळेल. शिवाय फलधारणा व फलधारणा नसलेली झाडे असे दोनच टप्पे नुकसान भरपाईसाठी होतील. शिवाय आताच्या नुकसान भरपाईपेक्षा वाढीव दर व नुकसान भरपाई समाविष्ट नसलेली झाडे यांना समाविष्ट करण्यात येईल, असे खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले.