15 सप्टेंबरपर्यंत परवानगी न दिल्यास 16 सप्टेंबरपासून शेतात गांजा लागवड करणार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सध्या कोणत्याही पिकाला हमीभाव नाही, त्यामुळे शेतकरी वैतागला आहे. गांजा लावल्यास त्याला भाव मिळतो म्हणून गांजा लागवडीस परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे शिरापूरच्या शेतकऱ्याने केले.


अनिल आबाजी पाटील (रा. शिरापूर, ता. मोहोळ) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. अनिल पाटील हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत गोंधळ घातला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलेल्या पत्रात पाटील यांनी म्हटले, शिरपूर या गावात माझ्या स्वतःची दोन एकर जमीन आहे. त्यामध्ये गांजा लागवडीला परवानगी द्यावी. कारण सध्या कोणत्याही पिकाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गांजा लावल्यास त्याला भाव मिळतो. शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील म्हणून गांजा लागवडीस परवानगी द्यावी. 15 सप्टेंबर 2021 पर्यंत आपण मला परवानगी द्यावी अन्यथा 16 सप्टेंबरपासून आपली परवानगी मिळाली असे गृहीत धरून मी गांजा लागवड करेन. पुढे जे होईल त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील, असा इशारा अनिल पाटील यांनी पत्रामध्ये दिला आहे.