Tarun Bharat

हरभजन सिंग सर्व क्रिकेटमधून निवृत्त

कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवणारा एकमेव भारतीय गोलंदाज, सर्वाधिक बळी टिपणारा चौथा भारतीय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर व कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा एकमेव भारतीय गोलंदाज ‘भज्जी’ हरभजन सिंगने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

गेल्या काही वर्षापासून निवृत्ती घेण्याबाबत विचार चालू होता, त्यावर आज निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱया पंजाबच्या या 41 वर्षीय गोलंदाजाने 103 कसोटीत 417, वनडेमध्ये 236 सामन्यांत 269 आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25 बळी मिळविले. सर्वाधिक कसोटी बळी मिळविणाऱया गोलंदाजांत तो 14 व्या क्रमांकावर आहे तर भारतातर्फे तो अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), आर.अश्विन (427) यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे.

‘प्रत्येक चांगल्या गोष्टीचा कधीना कधी शेवट होतोच. मला सर्व काही दिलेल्या या खेळाला मी आज निरोप देताना 23 वर्षाची दीर्घ कारकीर्द सुंदर व संस्मरणीय बनविणाऱया सर्वांचा मी मनापासून आभार मानतो,’ अशा भावना त्याने ट्विटमधून व्यक्त केल्या. जालंधरच्या छोटय़ा गल्ल्या ते टीम इंडियाचा ‘टर्बनेटर’ बनण्याचा गेल्या 25 वर्षाचा हा प्रवास अतिशय सुखकर, आनंददायक होता, असेही तो म्हणाला.

1998 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शारजाह येथे त्याने वनडे पदार्पण केले आणि मार्च 2016 मध्ये ढाका येथे यूएईविरुद्ध त्याने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ‘सर्व क्रिकेटपटूंना वाटते तसे संघाच्या जर्सीमध्येच निवृत्त होण्याचा आपला विचार होता, पण ही इच्छा साकार होऊ शकली नाही. काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि पुढे चालावे लागते. मानसिकदृष्टय़ा मी याआधीच निवृत्त झालो होतो, पण ते जाहीर केले नव्हते. गेल्या काही काळापासून मी क्रिकेटमध्ये सक्रीयही नव्हतो,’ असेही तो म्हणाला.

आयपीएलच्या गेल्या मोसमातील सुरुवातीच्या टप्प्यात तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. पण यूएईमध्ये झालेल्या टप्प्यात तो सहभागी झाला नव्हता. या संघाशी करार केला असल्याने या मोसमात केकेआरकडे राहण्याची इच्छा होती. पण मी निवृत्त होण्याचा अखेर निर्णय घेतला. कोणत्याही संघाकडून खेळताना मी शंभर टक्के योगदान दिले असून माझा संघ अव्वल राहील, असेच मी प्रयत्न केले आहेत,’ असे तो म्हणतो. हरभजनने भारतीय संघासह चेन्नई सुपरकिंग्स, मुंबई इंडियन्स, केकेआर, सरे, इसेक्स या कौंटीकडूनही खेळला आहे.

मार्च 2001 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण पहावयास मिळाला. त्याने मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन कसोटीतच एका हॅट्ट्रिकसह 32 बळी मिळविले. कोलकात्यातील कसोटी विजय हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अनेक संस्मरणीय विजयांपैकी एक मानला जातो.  ‘कोलकाता कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवणे क्रिकेट करियरमधील माझा सर्वात अविस्मरणीय व अत्यानंदाचा क्षण होता. हॅट्ट्रिक नोंदवणारा भारताचा मी पहिला व एकमेव गोलंदाज बनलो, याचा मला खूप आनंद व अभिमान वाटला. 3 सामन्यात 32 बळी घेण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. 2007 व 2011 मधील विश्वचषक विजयही अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा अविस्मरणीय आठवणी आयुष्यभर विसरता येणार नाहीत. हे क्षण माझ्यासाठी किती मोलाचे आहेत, हेही मी शब्दांत सांगू शकत नाही,’ अशा भावना त्याने व्यक्त केला.

त्याने मातापिता, अध्यात्मिक गुरू, पत्नी, मुले यांचे आभार मानले आहेत. क्रिकेटमुळे मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकलो नव्हतो, त्याची भरपाई मी आता करू शकेन. माझ्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मातापित्यांनी खूप परिश्रम घेतले तर पत्नीमुळे आयुष्याला पूर्णत्व आले, असे तो म्हणाला.

त्याच्या कारकिर्दीत मैदानावर काही वादग्रस्त घटनाही घडल्या. त्यात सिडनी कसोटीतील मंकीगेट प्रकरण व 2008 आयपीएलमध्ये एस.श्रीशांतला थोबाडीत मारण्याच्या घटनेचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा सायमंड्स व हरभजन यांच्यात हे मंकीगेट प्रकरण घडले होते. या घटनेमुळे त्याला तीन कसोटी सामन्यांच्या बंदीलाही सामोरे जावे लागले हेते.

1998 ते 2016 या अठरा वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने दोन वर्ल्ड कप जिंकले. 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक आणि 2011 मध्ये वनडे विश्वचषकाचा त्यात समावेश आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेक विद्यमान व माजी खेळाडूंनी त्याला मानवंदना देत पुढील आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या खेळाडूंत शिखर धवन, केएल राहुल, व्हीव्हीएस लक्ष्मण, एस. श्रीशांत, कुलदीप यादव, पार्थिव पटेल, प्रज्ञान ओझा, उमेश यादव, मयांक अगरवाल, सुरेश रैना, सचिन तेंडुलकर व अन्य खेळाडूंचा समावेश आहे.

हरभजनच्या कारकिर्दीतील माईलस्टोन्स

कसोटी पदार्पण- मार्च 1998

विविध देशाविरुद्धची कामगिरी

बळी   विरुद्ध    कसोटी

95      ऑस्ट्रेलिया          18

60      द.आफ्रिका          11

56      विंडीज   11

53      लंका      16

45      इंग्लंड    14.

यशस्वी कसोटी मोसम

वर्ष     बळी      सामने    5 बळी   10 बळी

2002  63        13        5 वेळा   –

2001  60        12        6 वेळा   2 वेळा.

कसोटी डावातील सर्वोत्तम कामगिरी

8-84 वि. ऑस्ट्रेलिया, 18 मार्च 2001, चेन्नई

वनडे पदार्पण ः न्यूझीलंडविरुद्ध एप्रिल 1998, शारजाह

विविध देशांविरुद्धची वनडेतील कामगिरी

बळी   देश        सामने

61      लंका      47

36      इंग्लंड    23

33      विंडीज   31

32      ऑस्ट्रेलिया          35

31      द.आफ्रिका          24.

याशिवाय 28 टी-20 सामन्यांत 25 बळीही त्याने नोंदवले आहेत.

Related Stories

पाकचा उपांत्य फेरीत नाटय़मय प्रवेश

Patil_p

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी लंकन संघात थीक्षणाचा समावेश

Patil_p

तीन दशकानंतर सनीकडून म्हाडाचा भूखंड परत

Patil_p

रियल माद्रिद संघात बेंझेमाचे पुनरागमन

Patil_p

आशियाई वेटलिफ्टींग स्पर्धेत झिलीला सुवर्णपदक

Patil_p

गार्सिया-म्लाडेनोविक, ऍरेव्हालो-रॉजेर दुहेरीत अजिंक्य

Patil_p