Tarun Bharat

हरिकथा श्रवण करत असताना काळाचे भय नसते

अध्याय अकरावा

उद्धवाची स्तुति करायची म्हणून भगवंतांनी तन, मन व प्राण यांनी उद्धवाची मोठय़ा जिव्हाळय़ाने ओवाळणी केली. यावरून उद्धवाची योग्यता लक्षात येते. जे शब्दातून सहज सांगता येण्यासारखे नाही, बुद्धीलाही जे आकलन होण्यासारखे नाही, ते भक्तीच्या प्रेमातील आत्मगुह्य उद्धवाला देण्याकरिता श्रीकृष्णांनी आलिंगनाचे केवळ निमित्त केले. प्रेमळ भक्तांची कथा सांगताना कृष्ण आणि उद्धव यांची एकरूपता होऊन प्रेमाने परस्परांची मिठी पडली होती, ती जगजेठी श्रीकृष्णाने आपणहून सोडविली कारण उद्धव जर आताच कृष्णाशी एकरूप झाला असता तर मग कृष्णाला कथा ऐकवायला उद्धवाएव्हढा भोक्ता दुसरा कोण मिळाला असता ?

भगवंत मनात म्हणाले, माझ्या भक्तिज्ञानाचा विस्तार करावयाला माझ्या भक्तांचा सखा असा एक उद्धवच आहे म्हणूनच खरा आत्मज्ञानाचा बोध करून त्याला ब्रह्मशापापासून विभक्त काढले. भगवंतांनी असा विचार करायचं कारण म्हणजे गुह्यज्ञानाची जितकी म्हणून गोडी आणि भक्तिप्रेमाची आवड उद्धवात होती तितकीच श्रीकृष्णाबद्दलही दृढ गोडी व आवड त्याच्यात होती. भक्तिप्रेमाचा भोक्ता एक श्रीकृष्णच आहे आणि कृष्णाची कृपा भक्तांनाच कळते. ही गोष्ट केवळ अनिर्वचनीय आहे. ती शब्दांनी सांगता येत नाही. कृष्ण उद्धवाला म्हणाले की, आता अगदी सावध हो आणि भक्ताला उपयोगी अशी पुढची कथा ऐक. फलाचा त्याग करून सर्व कर्म मला अर्पण करवत नसेल तर, प्रेमलक्षणाचे अतिशय सोपे असे निरूपण सांगतो ते लक्षात घे. माझी कथा श्रवण करू लागले असता तेथे काळाचा सुद्धा शिरकाव होत नाही. मग इतरांची कथा काय ? आणि कर्मबंधन तरी तेथे कशाचे ? हरिकथेत जो क्षण जातो, तो काळाला सुद्धा ग्रासून टाकता येत नाही. ह्याकरिता हरिकथा जर श्रद्धेने श्रवण केली, तर त्याचंच नांव ‘काळाची सार्थकता’ असे समजावे. आता कथेचे माहात्म्य ऐक. श्रद्धायुक्त बुद्धीने जर कथा श्रवण केली, तर तिच्यातील प्रत्येक अक्षराने तिन्ही लोकातील पातकांचे भस्म होऊन जाते. आता श्रद्धा कशाला म्हणतात तेही सांगतो. हरिकथेचे श्रवण करताना ज्याचे अर्थाकडे मन वेधलेले असते, त्यालाच श्रद्धेने श्रवण करणे असे म्हणतात. कथेतील प्रतिपादन ऐकून नास्तिक असतात ते म्हणतात, “देवच मुळी नाही ! देव आहे असे म्हणतात ते केवळ पोटभरू होत, आम्हाला त्याबद्दल मुळीच खात्री वाटत नाही ’’ अशा नास्तिकांच्या बोलण्यावर पाणी सोडून ज्याची आस्तिक्मयबुद्धि वाढत जाते, त्याचे नांव श्रे÷ श्रद्धा आणि तिच्यामध्येच अप्रतिम सुख असते. श्रवणामध्ये किंवा ध्यानामध्ये लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद ह्यांनी विघ्न होत असते. ह्याकरिता हे चारही अपाय टाळावेत. हरिकथा ऐकताना सुद्धा मनाला जर विषय चिंतनाचीच गोडी लागून राहिलेली असेल, तर ती मुळीच श्रद्धा नव्हे. मुख्य विक्षेप तो हाच. स्त्रियांच्या हावभावाचे व नेत्रकटाक्षाचे वर्णन व शृंगारचेष्टांचे वर्णन ऐकले म्हणजे ते ऐकण्यामध्येच ज्याची श्रद्धा असते, त्याचे नांव ‘रसास्वादन’ पुढे ऐक, हरिकथा ऐकत बसलेला दिसतो पण त्या कथेत त्याचे मुळीच लक्ष नसते. चित्त वेडय़ासारखे भलतीकडेच भ्रमण करीत असते. तो ‘मर्कटरूपी’ विक्षेप होय. नाहीतर पाठीमागे अनेक प्रकारचे उद्वेग लागलेले असल्यामुळे, हरिकथा ऐकत असताही तिच्याकडे मन लागत नाही किंवा कथेत झोपच लागते, तो तत्काल ‘लयविक्षेप’ म्हणून समजावा. ऐकावयाला किंवा ध्यान करावयाला बसले असता सगुण किंवा निर्गुण ह्यांपैकी एकही स्वरूप मनात उभे न राहता निळे-पिवळे रंगच डोळय़ांपुढे दिसू लागतात. तिन्ही प्रकारचे प्रेम चतुर लोक ओळखतात. त्यांचे लक्षण सांगतो ऐक. मोठमोठय़ा वीरांचा समरांगणांतील शूरपणा किंवा भयंकर युद्ध यांचे वर्णन ऐकून मन अत्यंत आनंदाने उचंबळून येते ते राजस प्रेम होय. दुखःशोकांचा प्रसंग, किंवा गेल्यामेल्यांची वार्ता, किंवा अत्यंत शोककारक कथा ही ऐकणेही ज्याला सहन होत नाही त्यांतील प्रत्येक प्रसंग ऐकत असतां डोळय़ांतून अश्रृंच्या धारा लागतात, हुंदके देऊन थरथर कापू लागतो, तो खरा तामस होय असे समज.

क्रमशः

Related Stories

निवृत्तीचा काळ सुखाचा

Patil_p

अकर्माचे दुष्परिणाम

Patil_p

गोवा राज्य कृषिसंपन्न होईल काय?

Patil_p

ढग विरतील, प्रकाश पसरेल !

Patil_p

कोरोनाने ग्रासली जागतिक अर्थव्यवस्था

tarunbharat

विद्रोहातून मूल्यवर्धन !

Patil_p