Tarun Bharat

हळदोणा सरपंचांवरील खुनीहल्ला पूर्ववैमनस्यातून

हल्ल्यासाठी 5 लाखांची सुपारी, एकाला अटक, मुख्य हल्लेखोर अद्याप फरारीच, हल्ल्यामागे राजकीय हात असल्याचा नाईक कुटुंबियांचा आरोप

प्रतिनिधी /पणजी

गाळवार कारोणा येथे एका मद्यालयात हळदोणाचे सरपंच प्रणेश नाईक यांच्यावर झालेला खुनीहल्ला हा पूर्ववैमनस्यातूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यासाठी मारेकऱयांना रु. 5 लाखांची सुपारी दिली होती. या हल्ल्यातील संशयित आरोपी  यापूर्वी बेटींग तसेच अन्य गुन्हेगारी स्वरुपाच्या गुन्हय़ात सामील असल्याची माहिती हाती आली आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. या हल्ल्यामागे राजकीय वजन असल्याचा आरोप नाईक कुटुंबियांनी केला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.

चार महिन्यांपूर्वी एका पार्टीत प्रणेश नाईक व निखील पणजीकर हे एकत्रित आपापल्या मित्रांसोबत बसले असता त्यांच्यामध्ये हाणीमारीची घटना घडली होती. हे प्रकरण राजकर्त्यांच्या मध्यस्थीने पांगविण्यातही आले होते. त्या रागाच्या भरातच हा खुनीहल्ला झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने दिली आहे.

दरम्यान म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी हळदोणा येथील निखील पणजीकर या संशयित आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी विजय कारबोटकर व इतर सात जणांविरोधात 307 (खुनीहल्ला) प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी 3.45 वा. च्या सुमारास घडली होती. प्रणेश नाईक व त्याचा मित्र फिर्यादी व्यंकटेश दोडामणी (रा. नास्नोळा) हे दोघे रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी संशयित दिल्ली पासिंगची इनोव्हा गाडी घेऊ आले. त्यांनी रेस्टॉरंटमध्ये घुसून कोयता, चाकू व हॉकीस्टीकने प्रणेशवर खुनीहल्ला केला.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणेशवर हल्ला चढविण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली होती. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. चार महिन्यांपूर्वी प्रणेश व त्याचा मित्र निखील पणजीकर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. हे प्रकरण हाणीमारीपर्यत गेले होते. त्यावेळी प्रणेश नाईक हे आमदार ग्लेन टिकलो यांचे  समर्थक असल्याने त्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविले होते. मात्र सध्या प्रणेश नाईक यांनी सध्या माजी आमदार किरण कांदोळकर यांच्याशी जवळीकर साधली आहे. त्यामुळे आमदार टिकलो दुखावले होते, असे पोलीस चौकशी आढळून आले आहे.

पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर

दरम्यान आयपीएस पोलीस अधीक्षक सुबीत सक्सेना यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पोलीस टीम करून वेगवेगळय़ा दिशेने आरोपीच्या शोधात पाठविले आहे. अन्य दोघांच्या संपर्कात पोलीस असून त्यांना अटक करण्यात येईल. या खुनीहल्ल्यामागील मास्टरमाईंट निखील असून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे. मात्र हिस्ट्रीशिटर विजय कारबोटकरच्या मागावर पोलीस आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

संशयिताला दहा दिवसांची पोलीस कोठडी

हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर इनोव्हा गाडीने घटनास्थळावरून पाच मिनीटातच फरार झाले. यातील निखील पणजीकर याला अटक करण्यास म्हापसा पोलिसांना यश आले आहे. त्याला रिमांडसाठी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रणेश यांच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू असून तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

या हल्ल्यानंतर हळदोणा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व्यवस्था बिघडली असल्याचा आरोप करीत संशयित आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करावी, अशी मागणी हळदोणावासीयांनी केली आहे. हळदोणाचे सरपंच प्रणेश नाईक यांच्यावरी हा हल्ला राजकीय पूर्ववैमनस्यातून झाल्याचा आरोप माजी आमदार किरण कांदोळकर यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

Related Stories

भक्तीच्या माध्यमातून केलेल्या देशसेवेला विशेष महत्त्व

Amit Kulkarni

म्हापशात शटर तोडून चोरटय़ांनी रोख व सामान मिळून 2 लाख लांबविले

Omkar B

करमल घाटात अपघातः वाहतूक खोळंबली

Amit Kulkarni

एकतानगर म्हापसा साई मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

Amit Kulkarni

लोकमान्य टिळक-थिवी रेल्वे सेवेत वाढ

Amit Kulkarni

राजीव गांधी यांच्या योगदानाचे स्मरण ठेवावे

Patil_p
error: Content is protected !!