Tarun Bharat

हात जोडतो, आम्हाला गावी जाऊ द्या…

Advertisements

यात्रोत्सवावेळी खेळणी लावण्यासाठी आलेले विजापूर, सोलापूरचे व्यावसायिक अडकले बेळगावात

अनंत कंग्राळकर/ बेळगाव

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ केली आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगार आणि व्यावसायिकांची परिस्थिती बिकट बनली आहे. शासनाकडून तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. पण आम्हाला चिंता आहे आमच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची…. त्यामुळे आम्ही हात जोडून विनंती करतो…. प्रशासनाने आम्हाला आमच्या गावी जाण्याची परवानगी द्यावी, अशा प्रतिक्रिया प्ररप्रांतीय कामगार आणि व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत असून बेळगाव जिल्हय़ातील कोरानाग्रस्त रुग्णांची संख्या 17 वर प्नाहोचली आहे. कोरोनाची धास्ती निर्माण झाल्यानंतर प्रारंभीपासूनच आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. देशासह राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करून नागरिकांना विषाणूची लागण होऊ नये, याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. नागरिक एकत्र येऊ नयेत याकरिता सर्व यात्रा आणि कार्यक्रम आयोजित करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. यामुळे दरवषी आयोजित करण्यात येणाऱया यात्रा, महोत्सव यावर्षी रद्द केले आहेत. पण बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणाऱया यात्रांमध्ये झोपळे, मिनी ट्रेन असे विविध लहान मुलांच्या मनोरंजनाचे खेळ मांडण्यात येतात. त्यामुळे यात्रा कालावधीत मनोरंजनाचे साहित्य मांडून आपला उदरनिर्वाह चालविणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. महाशिवरात्रीनंतर गावांमध्ये विविध यात्रा आयोजित करण्यात येतात. यात्रांमध्ये मनोरंजनाचे साहित्य लावण्यासाठी विजापूर आणि सोलापूर अशा विविध भागांमधून झोपाळे लावणारे व्यावसायिक बेळगावात दाखल झाले होते. काही गावांमध्ये लक्ष्मीयात्रा आयोजित करण्यात येणार होत्या. दरवषी ग्राम देवतांची यात्रा आयोजित करण्यात येते. त्यामुळे यात्रांमध्ये झोपाळे व मनोरंजनाचे साहित्य लावण्याच्या अपेक्षेने काही व्यावसायिक आले होते. पण कोरोनामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

जुने बेळगाव येथील कल्मेश्वर यात्रेनिमित्त आवश्यक तयारी केली होती. खेळाच्या साहित्याची मांडणी करीत असतानाच कोरोनाची वार्ता सर्वत्र पसरली. पाहता-पाहता लॉकडाऊनची घोषणा केली गेली. यामुळे कल्मेश्वर मंदिर ट्रस्टने यात्रा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खेळाच्या साहित्याचा काहीच उपयोग झाला नाही. संचारबंदी केल्याने नागरिकांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे यात्रेकरिता लावण्यात आलेले झोपाळे, मिनी टेन आदींसह सर्व खेळांचे साहित्य काढून ठेवण्यात आले. दि. 31 मेपर्यंत कोणत्याच यात्रा आणि महोत्सव साजरे करू नयेत, असा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावल्याने आगामी काळातील यात्रा लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती व्यावसायिकांना मिळाली. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय घेऊन जोडण्यात आलेले खेळाचे साहित्य आणि झोपाळे काढण्यात आले. पण लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद केल्याने जायचे कसे, असा मुद्दा या व्यावसायिकांसमोर निर्माण झाला. त्यामुळे साहित्य लावण्यासाठी विजापूर व सोलापूर अशा दोन ठिकाणांहून आलेले हे व्यावसायिक 20 माणसांसमवेत महिन्यापासून बेळगावात अडकून पडले आहेत. सध्या जुने बेळगाव येथील कल्मेश्वर मंदिर परिसरात त्यांनी आसरा घेतला आहे. पण लॉकडाऊन कधी संपणार आणि आम्हाला आमच्या गावी जायला भेटणार, असा मुद्दा त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. 

अशा परिस्थितीत घरी जाणेच योग्य     

बेळगावात विविध यात्रा भरविण्यात येतात. त्यामुळे व्यवसायानिमित्त आलो होतो. पण सध्या कोरोनामुळे बंद ठेवण्यात आले आहे. यात्रेनिमित्त झोपाळे आणि खेळाचे साहित्य लावले होते. मात्र काही वेळातच अधिकाऱयांनी येऊन बंद करण्याची सूचना केली. यात्रा आयोजित करता येणार नसल्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला सर्व खेळाचे साहित्य बंद ठेवून खोलून ठेवावे लागले. दोन महिने यात्रा भरविता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याने गावाकडे जायचा निर्णय घेऊन सर्व साहित्य खोलून जमा केले. पण वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने साहित्यासह आम्ही सर्व अडकलो असल्याची माहिती सोलापूर येथील खेळणीवाले सिद्राम शिंदे यांनी सांगितली. आमचे कुटुंबातील सर्व सदस्य गावाकडे असल्याने चिंतेमध्ये आहेत. साहित्य घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळत नाही. चिकोडी, महानिंगपूर तसेच हुबळी अशा विविध ठिकाणी सोलापूर परिसरातील खेळणीवाले व्यवसायानिमित्त आले होते. पण तेथील तहसिलदारांनी त्यांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली असल्याने ते सर्वजण सुरक्षित पोहोचले आहेत. मात्र, आम्हाला परवानगी मिळत नसल्याने अडकून पडलो आहे. शासनाकडून जेवण आणि आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. मात्र, हातामध्ये पैसे नाहीत, व्यवसाय नाही अशा परिस्थितीत घरी जाणे योग्य वाटत आहे. त्यामुळे आम्हाला गावी जाण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी विनंती सिद्राम शिंदे यांनी केली.

पण फक्त जेवणावर भागत नाही… आमच्याबरोबर लहान मुलेही आहेत…

जुने बेळगाव येथील यात्रेनिमित्त खेळाचे साहित्य घेऊन विजापूरच्या खेळणीवाल्या कमलाबाई भोसले यांच्यासह 10 कामगार बेळगावात अडकून पडले आहेत. व्यवसायानिमित्त विविध गावांमध्ये यात्रेवेळी खेळाचे साहित्य बसवितो. पण यंदा कोरोनाचा फैलाव झाल्याने आमचा व्यवसाय बंद करावा लागला असल्याची माहिती कमलाबाई भोसले यांनी दिली. घर सोडून दीड महिना झाला असून बेळगावात येऊन महिना होत आला. प्रशासनाकडून जेवण देण्यात येत आहे. जुने बेळगाव परिसरातील नागरिकांनीदेखील आमच्या पोटाची काळजी घेतली आहे. पण फक्त जेवणावर भागत नाही, कारण आमच्याबरोबर लहान मुले आहेत. त्यांना दूध, बिस्किटे लागतात. हातामध्ये असलेले पैसे संपले. तसेच वळीव पाऊस येत असल्याने पाणी साचण्याचा धोका असून पावसामुळे साहित्य खराब होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पण प्रशासनाकडून परवानगी मिळत नाही. जर शासनाने परवानगी दिल्यास आम्ही आमच्या साहित्यासह घरी सुखरुप जावू शकतो. त्यामुळे हात जोडून विनंती करतो की…. आम्हाला गावी जाण्याची परवानगी द्या, अशी विनंती कमलाबाई भोसले यांनी केली. 

Related Stories

यल्लम्मा देवस्थानतर्फे पुजाऱयांना किट

Amit Kulkarni

15 शाळांमध्ये सॅनिटेशन क्लबची स्थापना

Amit Kulkarni

जिल्हय़ात ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ

Amit Kulkarni

शर्यतीच्या आणखी एका बैलाचा मृत्यू

Amit Kulkarni

कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट बोर्डने थकविले 2 कोटी 41 लाखाचे वीजबिल

Patil_p
error: Content is protected !!