Tarun Bharat

हायकमांडने सूचना दिल्यास राजीनामा

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विधानाने उलटसुलट चर्चा : मंत्री, आमदारांकडून नेतृत्त्वाचे समर्थन

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात मागील आठवडय़ात नेतृत्त्व बदलाच्या मुद्दय़ावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना हायकमांडचा विश्वास असेपर्यंत आपण मुख्यमंत्री पदावर राहणार आहे. हायकमांडकडून ज्या दिवशी सूचना मिळेल त्यादिवशी मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्यास तयार आहे, असे विधान मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले असून मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱयांनी येडियुराप्पा हेच आपले मुख्यमंत्री आहेत. राज्यात मुख्यमंत्री बदल होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात नेतृत्त्व बदलासंबंधी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान हायकमांडने यापुढेही येडियुराप्पाच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे येडियुराप्पांना विरोध करणाऱया भाजपमधील नेत्यांना चपराक बसली होती. दरम्यान, रविवारी सकाळी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पा यांनी पक्षाच्या हायकमांडचा विश्वास असेपर्यंत आपण मुख्यमंत्री पदावर राहणार आहे. ज्या दिवशी सूचना मिळेल त्यावेळी आपण पदाचा त्याग करून राज्याच्या विकासासाठी काम करेन, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंत्री, आमदार नेतृत्त्व बदलाविषयी करीत असलेल्या विधानाविषयी आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. आपण विचलित झालेलो नाही. आपण राज्याच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले. राज्यात नेतृत्त्वासाठी पर्यायी नेता नसल्याविषयी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, नेतृत्त्वासाठी राज्यात पर्यायी व्यक्ती नसल्याचे आपल्याला मान्य नाही. देश आणि राज्यात कोणत्याही पदासाठी पर्यायी व्यक्ती असतात, त्याप्रमाणे कर्नाटकातही पर्यायी व्यक्ती आहेत. हायकमांडचा आपल्यावर जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळेन, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

येडियुराप्पा यांनी केलेल्या विधानाबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. आपल्याविरोधात भूमिका घेणाऱयांची तोंडे बंद करण्यासाठी येडियुराप्पा यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हायकमांडचे अभय असेपर्यंत कोणीही काहीही करू शकत नाही, असा स्पष्ट संदेश येडियुराप्पा यांनी राज्य भाजपातील विरोधकांना दिला आहे.

येडियुराप्पांना हटविण्याचा प्रश्नच नाही

येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याचा प्रश्नच नाही. तसा प्रस्तावही हायकमांडसमोर नाही. कोरोना संकटकाळात येडियुराप्पा यांनी अत्यंत कृतीशील राहून जबाबदारी पार पाडली आहे.

-प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री

नेतृत्त्व बदल नाहीच

राज्यात नेतृत्त्व बदलाचा प्रश्नच नाही. याविषयी चर्चाही झालेली नाही. येडियुराप्पा हेच आपले नेते आहेत. सध्या कोरोना नियंत्रणासाठी पक्ष संघटितपणे काम करत आहे. पक्षात अंतर्गत बंडाळी देखील नाही. मात्र, जे असंतुष्ट आहेत त्यांनी चर्चेसाठी पुढे यावे.

-नलीनकुमार कटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

Related Stories

कारवार-मंगळूर विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी

Amit Kulkarni

बेंगळूर : कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्याने खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल

Archana Banage

नैऋत्य रेल्वे विभागाकडून कोरोना जनजागृती

Archana Banage

बेंगळूर: परिवहन संप: मेट्रो सेवेच्या कालावधीत वाढ

Archana Banage

येडियुराप्पांचा राजीनामा

Amit Kulkarni

ऑनलाईन बेटिंग-गेमिंग बंदीचा आदेश रद्द

Amit Kulkarni