Tarun Bharat

हाय परफॉर्मन्स डायरेक्टर व्होकर हर्मन यांचा राजीनामा

Advertisements

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय ऍथलेटिक्स फेरडेशनचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर व्होकर हर्मन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 2024 ऑलिम्पिकपर्यंत त्यांच्या करारात वाढ केली होती. या पदावर असताना स्वतःच्याच अपेक्षा पूर्ण करण्यास आपण असमर्थ आहोत, असे वाटल्याने हे पद सोडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या (एएफआय) सूत्राने सांगितले की, हर्मन यांनी काही आठवडय़ांपूर्वीच राजीनामा दिला होता. पण त्यांनी पद सोडण्याचे निश्चित कारण दिले नव्हते. जर्मनीच्या हर्मन यांना जून 2019 मध्ये टोकियो ऑलिम्पिकपर्यंत काम पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. गेल्या सप्टेंबरमध्ये क्रीडा मंत्रालयाने 2024 ऑलिम्पिकपर्यंत त्यांच्या करारात मुदतवाढही केली होती. मात्र त्यांनी नव्या करारावर स्वाक्षरी केली नव्हती, असे या सूत्राने सांगितले. ‘भारतामध्ये जवळपास दीड वर्ष प्रेरणादायक आणि फलदायक कालावधी घालविल्यानंतर, या पदावर असताना मी स्वतःहून काही अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या मी पूर्ण करण्यास मी असमर्थ आहे, हे लक्षात आल्यामुळे तीन आठवडय़ांपूर्वी मी या पदाचा राजीनामा दिला,’ असे हर्मन यांनी आपल्या फेसबुक पेजवर म्हटले आहे.

‘क्रीडा क्षेत्रात हाय परफॉर्मन्स पदावर काम करताना अपेक्षाही त्याच दर्जाच्या केल्या जातात. प्रशिक्षक व त्यांच्या साहायकांच्या मदतीने जगभरातील अनेक ऍथलेट्स आणि संघ एखाद्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय बाळगून येत असतात आणि त्यापैकी फक्त एकच खेळाडू ध्येय गाठण्यात यशस्वी ठरतो,’ असे सांगत त्यांनी भारतातील ऍथलेटिक्सला उज्ज्वल भविष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

हर्मन हे भारताचे दुसरे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर आहेत. त्याआधी अमेरिकेच्या डेरेक बुसी यांनी पहिले एचपीडी म्हणून अल्प (2015)काळासाठी काम पाहिले होते.

रिओ ऑलिम्पिकआधी ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पण सात महिने काम पाहिल्यानंतर त्यांनी पद सोडले होते.

 भारतात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांना व प्रशिक्षकांना साहाय्यक ठरतील, अशा पायाभूत सुविधांची येथे आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर यशस्वी ठरण्यासाठी खेळाडूंत दृढ आत्मविश्वास, कणखर व स्वतंत्र मानसिकता असण्याचीही गरज आहे, असेही ते म्हणाले.

एएफआयने पद न सोडण्याबद्दल  हर्मन यांचा पाठपुरावा केला. पण त्यांनी ते मनावर घेतले नसल्याचेही सूत्राने सांगितले. ‘त्यांनी पद सोडण्याचे कोणतेही कारण दिले नव्हते. त्यांना पद सोडून मायदेशी परतण्याची इच्छा होती. एएफआयने त्यांना ऑलिम्पिकपर्यंत थांबण्याचा आग्रह केला. पण त्यांनी ते मानले नाही. आपण परत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यात व एएफआय किंवा साई यांच्यात कोणतीही तक्रार किंवा मतभेद नव्हते,’ असे या सूत्राने पुढे सांगितले. हर्मन यांनी भविष्यात सल्लागार म्हणून भारतात काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे एएफआयचे अध्यक्ष ऍडिले सुमरिवाला यांनी सांगितले. जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा फेडरेशन निश्चितच त्यांच्यासमवेत काम करेल, असे सुमरिवाला म्हणाले.

‘व्होकर हर्मन हे युवा आणि मेहनती व्यावसायिक मार्गदर्शक असून त्यांनी देशातील प्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्याच्या प्रक्रियेत मोठे योगदान दिले आहे.  आमच्यासमवेत राहून काम करण्यासाठी आम्ही त्यांची मनधरणी केली. पण त्याचा उपयोग झाला नाही, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. मायदेशी परतण्याचा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून आम्ही त्याचा आदर करतो. आता त्यांच्या जागी आम्हाला नव्या हाय परफॉर्मन्स डायरेक्टरचा शोध घ्यावा लागणार आहे, असेही सुमरिवाला
म्हणाले.

हर्मन यांनी, भारतातील वास्तव्याने आपण अनेक अर्थाने समृद्ध झाल्याचे आणि सकारात्मक दृष्टीनेच त्याकडे नेहमी पाहत राहणार असल्याचे म्हटले आहे. हर्मन हे भारताचे दुसरे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर आहेत. त्याआधी अमेरिकेच्या डेरेक बुसी यांनी पहिले एचपीडी म्हणून अल्प काळासाठी काम पाहिले होते. रिओ ऑलिम्पिकआधी ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पण सात महिने काम पाहिल्यानंतर त्यांनी पद सोडले होते.

Related Stories

गोल्फपटू लाहिरीचेही 7 लाख रुपयांचे योगदान

Patil_p

विजय हजारे करंडकाचे आज उपांत्य सामने

Amit Kulkarni

मराठा इन्फंट्रीमधील 51 जवान देशसेवेत रुजू

Patil_p

कोरोनामुळे फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे निधन

prashant_c

जपान, स्पेन, ब्राझील, मेक्सिको उपांत्य फेरीत

Patil_p

ब्लॉकबस्टर फिनिश! पोलार्ड जिंकला!

Patil_p
error: Content is protected !!